Tuesday, 24 November 2020

26 नोव्हेंबरचा लाक्षणिक संप कशासाठी?

26 नोव्हेंबर रोजी शिक्षण विरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशान्वये शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा पाडाव व्हावा म्हणून राज्यात सातत्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे.


मागील काही वर्षांमध्ये शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरणं सातत्याने रावबली जात आहेत. शिक्षणाचं खाजगीकरण, कंपनीकरण सुरू आहे. आणि आता NEP 2020 आलेलं आहे. NEP 2020 मुळे जवळपास 1 लाख अनुदानित शाळा आणि 35 हजार कॉलेजेस बंद होणार आहेत. त्यामुळे अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडकळीस निघणार आहे. त्यामुळे गरीब, वंचित वर्गाचं शिक्षण संकटात येणार आहे. या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी 26 नोव्हेंबरच्या संपात सहभागी व्हायचं आहे. 

दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजीच्या भव्य परिषदेत दहा प्रमुख राष्ट्रीय संघटनांनी सहभाग घेतला होता. या परिषदेला अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत केंद्र व राज्य सरकारांच्या कामगार शेतकरी आणि शिक्षक-शिक्षकेतर विरोधी धोरणांना पायबंद घालण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे.

शिक्षक भारती या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होणार आहे.

प्रमुख मागण्या

1) सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.

2) 100 टक्के अनुदान द्या.

3) व्हॅक्सिन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका. शिक्षकांना 50% उपस्थितीची अट रद्द करा, वर्क फॉर्म होमची परवानगी दया. 

4) कोविड पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी थर्मल स्कॅनर, सॅनिटायझेशन इ. सुविधांसाठी संस्थाना किमान 25 हजार आणि कमाल 1 लाख रुपयांचा निधी द्या.

5) शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरा.

6) सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा. 

7) बक्षी समितीचा खंड 2 तातडीने प्रसिद्ध करा. 

8) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच करा. 

9) विषयांना शिक्षक नाकारणारा 28 ऑगस्ट 2015, कला क्रीडा शिक्षकांना हद्दपार करणारा 7 ऑक्टोबर 2015 आणि  रात्रशाळा संकटात टाकणारा 17 मे 2017 चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय मागे घ्या.

10) वस्तीशाळा शिक्षक आणि अप्रशिक्षित शिक्षण सेवक यांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरा.

11) 20 पटाच्या आतील शाळा बंद करु नका.

12)  सहाय्यक शिक्षक परिविक्षाधिन यांना वेतन श्रेणी लागू करा आणि परिविक्षाधिन कालावधी कमी करा. 

13) अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तासिका तत्त्वावर काम करणारे  सर्वच शिक्षकांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा.

14)  संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान सुरु करा.

15) वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट लागू करा.

16) आयटी विषय शिक्षकांना वेतन मंजूर करा.

17) सावित्रीबाई फुले - फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना लागू करा.

18) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका.

19) केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्ष बालसंगोपन रजा द्या.

20) खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा.

दि. 26  नोव्हेंबर 2020 रोजीच्या लाक्षणिक संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुढाकाराने सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षकांची एमफुक्टो, बुक्टो संघटना आणि महामंडळांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणारं आहेत. 
 
मुंबईसह राज्यातील सर्व विभागिय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सर्व शिक्षक भारतीचे पदाधिकारी शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची ऑनलाईन  सभा घेऊन 26 नोव्हेंबर  रोजी होणाऱ्या लाक्षणिक संपाबाबत माहिती देणार आहेत. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोरदार तयारी करावी.

आयफुक्टो, एमफुक्टो, बुक्टू व शिक्षक भारती या अखिल भारतीय व महाराष्ट्र, मुंबई स्तरावरील शिक्षक (शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे) यांच्या संघटनांनी 26 नोव्हेंबर 2020 रोजी होणार्‍या राष्ट्रीय संपास पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात कामगार संघटना संयुक्त कृती समिती (टीयूजेएसी) आणि सरकारी कर्मचारी संघटनांची समन्वय समिती संप पुकारत आहेत. व त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द करा या आपल्या मागणीला पाठिंबा दिला आहे, कारण...

1) हे धोरण स्वातंत्र्योत्तर भारतातील 1966 च्या कोठारी कमिशनने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अस्तित्वात असलेल्या शिक्षणाची सध्याची रचना पद्धतशीरपणे मोडणारे आणि सार्वजनिक अनुदानित शिक्षणाला तिलांजलि देणारे आहे. हे धोरण आयसीटी आधारित / ऑनलाइन शिक्षण आणि विशेषत: उच्चभ्रू वर्गाला अनुकूल अशी स्वायत्त शिक्षण प्रणाली आणणारे असेल. 

2) हे धोरण घटनात्मक आरक्षण आणि मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यांचे उल्लंघन करणारे आहे. या घटनात्मक संरक्षणामुळेच सद्या शैक्षणिक संस्थांच्या विस्तारासह भारत प्रगती करीत आहे, त्या सर्वसमावेशक शिक्षणामध्ये विशेषत: ग्रामीण, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि इतर उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व समानता सुनिश्चित करीत आहे. 

3) या धोरणानुसार जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांवर जास्त जोर देण्यामुळे, सद्याची हजारो शाळा-महाविद्यालये बंद होण्याचा धोका निर्माण होणार आहे, बहुसंख्य विद्यार्थ्यांना अनौपचारिक / दूरस्थ शिक्षणाकडे ढकलले जाणार आहे. 

4) या धोरणामुळे शालेय आणि उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणात तीव्र वाढ होणार आहे. सद्याच्या लॉकडाउन संबंधित आर्थिक संकटामुळे आधीच मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाबाहेर पडले आहेत आणि या धोरणामुळे ते आणखी तीव्र होणार आहे. त्याचबरोबर, नियमित शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्‍यांऐवजी तातडीने कंत्राटी पद्धतीने नेमणूक प्रक्रियेस गती दिली जाणार आहे.

5) या धोरणामुळे एकूणच घटनात्मक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची पायमल्ली होणार आहे.

मुंबईत आंदोलन कुठे होणार?

शिक्षक भारती, बुक्टू व इतर संघटना 26 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.30 ते 4.00 वेळेत मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, कलिना येथे गेटवर निषेध निदर्शने करून अखिल भारतीय संपास आपला पाठिंबा दर्शवणार आहेत. यावेळी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारती अध्यक्ष अशोक बेलसरे, एमफुक्टोच्या नेत्या डॉ. ताप्ती मुखोपाध्याय, बुक्टूच्या नेत्या मधु परांजपे उपस्थित राहणार आहेत. मुंबई आणि परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी इथे यावं आणि आंदोलनात सहभागी व्हावं. 

राज्यभर इतर ठिकाणी जिल्हाध्यक्ष, राज्य पदाधिकारी आणि प्रमुख पदाधिकारी यांनी ठरवून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच इतर सर्व युनिट यांनी संयुक्तपणे जोरदार आंदोलन करावे. कोविडच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घ्यावी.

ज्या ठिकाणी शाळा, कॉलेज सुरू आहेत, 10 वी / 12 वी परीक्षा केंद्र सुरू आहेत तिथे काळ्या फिती लावून काम करावं आणि आंदोलनात आपला सहभाग नोंदवावा.
जिंदाबाद!
लढूया, जिंकूया!! 

आपला स्नेहांकित, 
सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र

 

Monday, 2 November 2020

आमचा पगार दिसतो पण मग काम का नाही ?

गुहागरचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष डॉक्टर विनय नातू यांनी लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांच्या पगाराचे आणि कामाचे मूल्यमापन करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही बातमी वाचून आश्चर्य वाटले नाही. (विनय नातू यांची या संदर्भातली बातमी https://www.tv9marathi.com/maharashtra/bjp-leader-vinay-natu-send-letter-to-cm-uddhac-thackeray-302092.html ) मागील पाच वर्षात भाजपच्या शिक्षणमंत्र्यांनी व शिक्षण विभागाने दररोज सरासरी एकापेक्षा जास्त जीआर काढून जी वाताहत केली आहे ती सर्वांना माहीतच आहे. भाजपप्रणित संघटना असोत अथवा तत्कालीन शिक्षणमंत्री असोत यांनी नेहमी शिक्षण आणि शिक्षकांच्या विरोधात काम केले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात शिक्षणाचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न इच्छाशक्ती असती तर सोडवता आले असते परंतु तसे न करता त्यांनी केवळ शिक्षकांच्या अडचणीत भर घातली. शिक्षकांना अतिरिक्त करणारे, मुख्याध्यापकांना धमकावणारे जी.आर काढून शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. सत्तेवर आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करू अशी गर्जना करणाऱ्यांनी सत्तेवर येताच वेगळेच रंग दाखवले. त्या धक्क्यातून आजही आम्ही शिक्षक - शिक्षकेतर, मुख्याध्यापक, संस्थाचालक सावरलेलो नाही.

सरकार बदलले ही केवळ भावनिक स्थिती असून व्यवस्थात्मक बदल होत नाही असे शिक्षणतज्ञ किशोर दरक यांनी म्हटले आहे ते खरंच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने प्रश्न न सोडवल्यामुळे भाजप सरकार प्रश्न सोडवेल या मोठ्या आशेने सगळ्यांनी भरघोस मतदान केले. पण शेवटी निराशा झाली. आताही सरकार बदलले पण मंत्रालयातील अधिकारी आणि त्यांची धोरणं तीच आहेत. मागील एका वर्षात माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाने काढलेले शासन निर्णय मागची पुनरावृत्ती असल्यासारखेच आहेत.

कोरोना काळात शिक्षण आणि शिक्षणाचे नियोजन करण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले नाहीत, दहावी-बारावीच्या यावर्षीच्या परीक्षा कधी होणार माहित नाही, शाळा सुरू करण्याबाबत केवळ घोषणा होतात पण ठोस नियोजन नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर अध्ययन-अध्यापन अहवाल मागवले जातात पण जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली नाहीत त्यासाठीचे कोणतेही नियोजन नाही.

ऑनलाइन शिक्षणाचा बागुलबुवा उभा करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेठीस धरण्याची एकही संधी सोडत नाहीत.

कोरोनाचे कारण देवून अनुदानाचा टप्पा मात्र देण्याचे टाळण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. प्रचलित नुसार शंभर टक्के अनुदान द्यायचं तर राहीलच पण 20 टक्के अनुदान देतानाही 18 महिन्यांचा पगार ढापण्यात सरकारने केलेली लबाडी लपून राहिलेली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ ग्रॅज्यूटीचे पैसे आणि सेवानिवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा पहिला हप्ता थांबवण्यात आलेला आहे. सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षणसेवक) आजही केवळ सहा हजार रुपये मानधनात काम करत आहे. बक्षी कमिटीने सुचवलेली आश्वासित प्रगती योजना अद्यापि लागू झालेली नाही. 2004 पासून थांबलेली शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू झालेली नाही. बारा वर्षे व चोवीस वर्षाचे कोणतेही लाभ न घेता हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त होऊन गेलेले आहेत. आजही शिक्षक 27 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामे करत आहेत. शिक्षकांना शाळेमध्ये शिकवू दिले जात नाही. कामाचे मूल्यमापन करण्याची मात्र वारंवार मागणी करणारे आत्ताच्या सरकारमधील आणि मागच्या सरकारमधील एकाच पकडीचे दोन दांडे आहेत.

सार्वजनिक प्रवासाची साधने सुरू झालेली नाहीत, कोरनाचे व्हॅक्सीन अजून आलेले नाही पण पन्नास टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित करण्याचा जीआर मात्र काढलाय. शाळेत मुलं नसताना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचारी यांना बोलवायचे कारण काय? हे मात्र शिक्षण विभागाने सांगितलेलं नाही.

50% शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बाबतच्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे

1) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर असावे.

2) प्रत्येक प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर बसवावे.

3) शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सानिटायझेशन करावे.

4) गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यांचे नियंत्रण करावे.

5) वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे.

6) वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. तसेच मास्क आणि हातमोजांचा वापर करावा.

7) वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करावा.

8) शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करावा.

9) बसने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व बस चालकासाठीही नियमावली देण्यात आली आहे.

10) 20 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.

11) शाळेतील मध्यान्न भोजन सकाळी 10 ते 1 वेळात विद्यार्थ्यांची गट विभागणी करून द्यावे.

12) स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषयक व सर्व सुरक्षा उपायांचे पालन करावे.

13) शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा वापर करावा.

14) स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही असे नियंत्रण करावे.

15) स्वच्छतागृहात मुबलक पाणी, साबण, हॅण्डवॉशचा पुरवठा करण्यात यावा.

16) विद्यार्थ्यांच्या तापमानाची रोज नोंद ठेवावी.

17) शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित परीक्षण व्हावे.

18) शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेचे परीक्षण व्हावे.

हि सर्व व्यवस्था उभी करायला छोट्या शाळांना किमान 25,000 रूपये तर मोठया शाळांना एक लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. व्यावसायिक दराने भरावे लागणारे वीजबील, पाणीबील थकले असताना हा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. 

29 ऑक्टोबर 2020 चा 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचा शासन निर्णय रद्द करणेबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री मा. वर्षाताई यांच्याशी केलेला पत्रव्यवहार.



शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कामाचे मूल्यमापन जरूर करा ...
मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगाराबाबत नेहमीच बोललं जातं. त्यांच्या कामाच्या मूल्यमापन बाबत कोणीही उठून प्रश्न उपस्थित करतो. पण राष्ट्र घडवण्यासाठी खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी-दुर्गम भागामध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये, शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्या वस्त्यांवर जाऊन शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवणाऱ्या शिक्षकाबद्दलचा सन्मान राजकारणीच ठेवणार नसतील तर समाजाने कोणता आदर्श समोर ठेवायचा?

शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन झालेच पाहिजे या मताचा आम्ही आदर करतो. पण त्या अगोदर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळणार आहे का? 27 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामातून त्याची मुक्तता होणार आहे का? वर्षानुवर्षे न भरलेल्या रिक्त जागांवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करून अतिरिक्त ताण कमी केला जाणार आहे का? बालकांच्या शिक्षणाचा व मोफत सक्तीच्या कायद्यानुसार शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याची भूमिका शासन निभावणार का? गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षक निर्माण करणारी अनुदानित डी.एड, बी.एड बंद झालेली कॉलेज पुन्हा सुरू करणार का? शिक्षक भरती मध्ये होणारे घोटाळे थांबून खरंच गुणवत्तेवर शिक्षक शिक्षकेतर भरती करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगोदर द्यावीत आणि मग आमचे मूल्यमापन करावे. आम्ही शिक्षक त्यांच्या मूल्यमापनाला सामोरे जायला तयार आहोत.

सलाम कोविड योद्धयांना
कोरोना काळामध्ये शिक्षण विभागाने कोणतेही अधिकृत ऑनलाइन शिक्षणाचे प्रशिक्षण न देताही 50% का होईना विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षक धडपडत आहेत. ज्या ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था उभी होऊ शकली नाही तेथे ऑफलाइन शिक्षण देणारे शिक्षक आहेत. वस्तीवर पाड्यावर चालत जाऊन शिक्षण देणारे शिक्षक आहेत आणि हे सर्व कार्य सुरू असताना कोवीड ड्युटी करणारेही शिक्षकच आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारीच सर्वेक्षण करणारेही शिक्षकच आहेत.

सर्वांना असं वाटतं की शिक्षक घरी बसले आहेत आणि फुकटचा पगार घेत आहेत. पण हा आरोप करणाऱ्यांनी सर्वप्रथम खरी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. कोविड काळामध्ये आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांसोबत, पोलिसांसोबत अंगणवाडी सेविका सोबत खांदा लावून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. अनेकांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले आहे. ही वस्तुस्थिती नाकारून केवळ शिक्षक या जमातीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जात असतील खपवून घेतले जाणार नाही.

कोरोना काळात काम करणारे आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत असेल तर ते शासनाचे अपयश आहे. किमान वेतन कायद्यानुसार या प्रत्येकाला किमान अठरा हजार रुपये वेतन देणे बंधनकारक असताना त्याचं आर्थिक शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नाही. पण शिक्षकांच्या पगारावर मात्र सर्व बोलतात.

अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणून तिला बदनाम करून शिक्षणाचे खाजगीकरण, व्यापारीकरण करण्याचे पुरस्कर्ते दोन्ही सरकार मध्ये बसलेले आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या सोबत शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी जोपर्यंत शासन घेणार नाही तोपर्यंत समाजाचा, राज्याचा, देशाचा विकास होणार नाही.

करा शिक्षकांचा सन्मान! तर घडेल राष्ट्र महान!


सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य


Sunday, 30 August 2020

समान काम समान वेतन


केंद्र शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला किमान अठरा हजार रुपये वेतन मिळणे त्याचा अधिकार आहे. कायमस्वरूपी अथवा कंत्राटी कामगारालाही किमान वेतन मिळण्याचा हक्क आहे. कायदा करण्यासाठी जेवढा संघर्ष करावा लागतो तेवढा किंबहुना त्यापेक्षा जास्त संघर्ष कायद्याच्या अंमलबजावणीसाठी करावा लागतो. केंद्र सरकारने किमान वेतनाचा कायदा केला असला तरी राज्यातील कंत्राटी कामगारांना, अंगणवाडी सेविकांना तसेच विविध स्तरावर काम करणाऱ्या कामगारांना अद्यापि किमान वेतनापेक्षा कमी मानधनावर काम करावे लागत आहे. हे अन्यायकारक आहे. 

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात नवनियुक्त शिक्षकांना अत्यल्प अपमानजनक मानधनावर काम करावे लागत आहे ही शासनासाठी शरमेची बाब आहे. डी. एड, बी.एड पूर्ण करायचे, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हायचे,  अभियोग्यता चाचणी पार करायची आणि हे सर्व करून नोकरी मिळाली तर मानधन मिळत केवळ सहा हजार.  स्वतःचे राहणीमान चांगले ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याची कसरत गेली वीस वर्ष शिक्षण क्षेत्रात नवनियुक्त शिक्षक करत आहेत. शिक्षक भारती व आमदार कपिल पाटील यांनी पहिल्यापासून शिक्षण सेवक योजना हा कलंक आहे, तो समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे.
 
सेवक नाही, शिक्षक आम्ही
न सहणार अपमान
अज्ञानाचे भेदक आम्ही
पुन्हा मिळवू सन्मान

अशी घोषणा आमदार कपिल पाटील यांनी  दिलेली आहे.

समान काम समान वेतन या न्यायानुसार एकाच स्टाफरूममध्ये बसून समान काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षण सेवक संबोधणे आणि तुटपुंज्या मानधनावर काम करायला लावून त्यांचे आर्थिक शोषण करणे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अहितकारक आहे.

हे शिक्षणसेवक धोरण कोठून आले?

केंद्रात एनडीएचे सरकार असताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र देऊन शिक्षक - शिक्षकेतर यांच्या वेतनावर होणारा खर्च कमी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. कायमस्वरूपी शिक्षक  नेमन्या एवजी कंत्राटी स्वरूपात कर्मचारी नेमण्याचे सुचवले होते. यासाठी त्यांनी भाजपशासित राज्यांचा दाखला दिलेला होता. गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांनी अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या असून अल्प मानधनावर शिक्षक  उपलब्ध होत असल्याचे लक्षात आणून दिले. मध्यप्रदेश शासनाने शिक्षण हमी योजना, राजस्थानने शिक्षाकर्मी योजना आणि गुजरात मध्ये विद्या सहाय्यक योजना या नावाने सुरू असलेल्या योजनांचा हवाला देत महाराष्ट्र सरकारने 10 मार्च 2000 रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी 27 एप्रिल 2000 मध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांसाठी शिक्षण सेवक योजना जाहीर केली. या शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे मानधन दिले जात होते. 

1. माध्यमिक शाळा 
(5 वी ते 7 वी )
 2500  रुपये

2. माध्यमिक शाळा
(8 वी ते 10 वी)
 3000  रुपये

3. अध्यापक विद्यालय 3000  रुपये

4. कनिष्ठ महाविद्यालय 3500 रुपये
  
शिक्षणसेवक योजनेच्या विरोधात  राज्यभर ज्या ताकतीने आंदोलन उभे राहायला हवे होते त्या प्रमाणात विरोध झाला नाही.  नवीन नियुक्त कर्मचारी संख्या कमी असल्याने विरोध कमी पडला. त्यात काही कर्मचारी कोर्टात गेले. वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या. माननीय हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार शासनाला केवळ योजनेद्वारे अशाप्रकारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही असे निरीक्षण नोंदवले. तसेच शिक्षण सेवक योजनेत अनेक सुधारणा सुचविल्या. शासनाने माननीय हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचा विपर्यास करून सदर योजनेचे 13 ऑक्टोबर 2000 रोजी कायद्यात रूपांतर केले.

वर्षानुवर्ष गुरूला आदराचे स्थान देणाऱ्या समाजात शासनाने शिक्षकांना सेवकांचा दर्जा दिला. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा कायदा म्हणावा लागेल. 13 ऑक्टोबर 2000 शासन निर्णयामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय विद्यालयातील शिक्षकांचे मानधन खालीलप्रमाणे ठरवण्यात आले
1. माध्यमिक शाळा
(5 वी ते 7 वी )
 3000  रुपये

2. माध्यमिक शाळा
(8 वी ते 10 वी )
 4000  रुपये

3. अध्यापक विद्यालय 4000  रुपये

4. कनिष्ठ महाविद्यालय 5000 रुपये
 
शिक्षण सेवक कायदा लागू झाला तेव्हा  प्रशिक्षित शिक्षण सेवकांना आणि नियमित वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांच्या पगारामध्ये फारशी तफावत नव्हती.  राज्यातील विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी मागणी केल्यामुळे 17 मार्च 2012 मध्ये मानधन वाढ करण्यात आलेली आहे. आठ वर्षे होऊन गेली आहेत.  आज नियमित वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळत आहे तर शिक्षण सेवकांना मात्र केवळ सहा हजार रुपये इतक्या मानधनावर काम करावे लागत आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या कामगाराला ही शिक्षण सेवकापेक्षा ज्यादा मानधन मिळते. सहा हजार रुपये मानधनामध्ये ग्रामीण भागातही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अशक्य आहे.

मुंबई - पुण्यासारख्या शहरात हे नवनियुक्त शिक्षक बांधव सहा हजार रुपयात कसे चालवत असतील याचा शासनाने कधी विचार केला आहे का?

सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कसे झाले ?

2010 मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण सेवकांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या शोषणावर अशासकीय विधेयक सादर केले. शासकीय सेवेत कुणालाही सेवक म्हणून ठेवण्यात येत नाही केवळ शिक्षणक्षेत्रावरच अन्याय  का? असा प्रश्न त्यांनी या विधेयकाद्वारे शासनाला केला. शिक्षकांना सेवक म्हणणे, समान काम करीत असतानाही त्यांना तुटपुंजे मानधन देणे आणि त्यांचा तीन वर्षे  कालावधी करणे याला अशासकीय विधेयकातुन विरोध केला. शिक्षण सेवकांना सेवक न म्हणता सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन म्हणावे, त्यांना मानधन न देता वेतन श्रेणी द्यावी आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या. सत्ताधाऱ्यांनी कपिल पाटलांना अशासकीय विधेयक मागे घेण्याची विनंती केली. परंतु कपिल पाटील आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. सभागृहात सत्ताधाऱ्यांची संख्या कमी होती. तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना सभागृहात परत येण्यास भाग पाडले. कपिल  पाटील यांनी मतदानाची मागणी केली. यावर सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली. अखेर सभापतींनी विशेषाधिकाराचा वापर करत नियम (41) 1 अन्वये अशासकिय विधेयक नामंजूर झाल्याचा निर्णय दिला आणि सरकारचा जीव भांड्यात पडला. त्यादिवशी आमदार कपिल पाटील सभागृहात एकटेच पडले अन्यथा आपल्या सर्वांना सन्मान मिळालाच असता. मात्र कपिल पाटील यांच्या विधेयकाची दखल घेत तत्कालीन शिक्षणमंत्री दर्डा यांनी मानधनवाढीचा आणि अपमानास्पद नाव बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याची घोषणा सभागृहात केली. पुढे थोडंफार मानधन वाढलं आणि कपिल पाटील यांनी सुचवल्याप्रमाणे सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन असं नावंही बदललं गेलं.

समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे

सातव्या वेतन आयोगासाठी नियुक्त केलेल्या बक्षी कमिटीने खंड एक मधील प्रकरण-2 मध्ये मुद्दा क्रमांक 1 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केल्या प्रमाणे किमान वेतन अठरा हजार रुपये देण्याचे सुचवले आहे. महाराष्ट्र सरकारने ज्या  गुजरात शासनाच्या विद्या सहाय्यक योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक योजना सुरू केली त्या गुजरात सरकारने दिनांक 1 फेब्रुवारी 2017 पासून विद्या सहायकांना सुधारित 19 हजार 950 एवढी मानधन वाढ दिली आहे. या तुलनेत महाराष्ट्रातील सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन यांना केवळ सहा हजार रुपये मानधनावर काम करायला लावणे अन्याय कारक आहे.

तसेच माननीय उच्च न्यायालय जोधपुर, राजस्थान यांच्या दिनांक 29 जानेवारी 2020 च्या आदेशाप्रमाणे सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कर्मचाऱ्यास अल्प मानधनावर राबवणे म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 14, 16, 21, 23 आणि 38 चे उल्लंघन करणारे आहे असा निर्णय दिलेला आहे. परिविक्षाधीन कर्मचाऱ्यास त्याच्या परिविक्षाधीन कालावधीत नियमित व पूर्ण  वेतन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.  किमान वेतन कायद्यानुसार कंत्राटी कामगारांनाही 18 हजार रुपयापर्यंत मानधन दिले जात आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ही ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाच्या काळातही ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू केलेली आहे.

वरील सर्व बाबींचा विचार केल्यास सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन किमान 18000 वेतनासाठी पात्र आहेत. परंतु ते न देणे म्हणजे आर्थिक शोषण होय. महाराष्ट्रासारख्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्यात समान काम समान वेतन कायद्यानुसार सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू केली पाहिजे. एवढेच नव्हे तर परिविक्षाधीन कालावधी तीन वर्षापेक्षा कमी केला पाहिजे अशी आमदार  कपिल पाटील आणि शिक्षक भारती ची भूमिका आहे. 

पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त 6000 सहाय्यक शिक्षकांनी  आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्व मान्य करून शिक्षक भारती सोबत लढ्यात सामील होण्याचे ठरवले आहे. गणेश सावंत, प्राजक्ता गोडसे, हरीश शिंदे, सुधीर पाटील, भरत सोनवणे, किरण पवार, जितेंद्र लोकरे, सचिन हेरोलीकर, जयवंत कुंभार, ऋषी गोटे, विपुल गागरे, राम जाधव, सतीश पाटील, उमेश पवार, अस्मिता रोकडे, संदेश कांबळे, अश्विनी माने, संभाजी बेस्के, संभाजी तोडकर आणि हजारो नवनियुक्त शिक्षकांनी एकत्र येऊन गरज पडली तर मोठा संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. नियमित वेतनश्रेणी लागू झालीच पाहिजे आणि परिविक्षाधीन कालावधी कमी केला पाहिजे या दोन मागण्या घेऊन शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील माननीय शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड, ग्राम विकासमंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब आणि अर्थमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्यासोबत बैठका घेऊन परिस्थिती लक्षात आणून देणार आहेत.

मला विश्वास आहे आपल्या या सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन बांधवांना न्याय मिळेलच.
लढूया!! जिंकूया!!!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष 
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


Monday, 24 August 2020

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मिळणार कधी?


मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. सातव्या वेतन आयोगातील फरकाची थकबाकी पाच समान हप्त्यात पीएफ खात्यावर जमा होणार होती परंतु शासनाने कोरोना महामारीचे कारण देवून पहिला हप्ता दिलेला नाही. पीएफ खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी इन्कमटॅक्स भरला आहे. आपली अवस्था तेलही गेले अन तुपही गेले... अशी झाली आहे. 

बक्षी कमिटीने सादर केलेल्या खंड 1 मधील प्रकरण 5 मध्ये सुधारित आश्वासित प्रगती योजनेबद्दल माहिती दिली आहे. नवीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत स्थापन केलेल्या अभ्यास गटाचा अहवाल प्रलंबित आहे. बारा वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि चोवीस वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी निवड श्रेणीचे लाभ शिक्षकांना मिळत नाहीत. राज्यभर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे हजारो प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे.

कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत पदोन्नती मिळत नाही. निदान वेतनाच्या बाबतीत वेतनाचे लाभ मिळावे या अपेक्षेने कालबद्ध पदोन्नती दिली जाते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विनाअट वेतन वाढ मिळते. परंतु शिक्षण विभागाने नेहमी शिक्षकांवर अन्याय केलेला आहे. वरिष्ठ / निवड श्रेणी देताना प्रशिक्षणाची अट ठेवण्यात आलेली आहे. सेवेची बारा वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिल्यावर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते. तसेच निवड श्रेणी लागू होण्यासाठी चोवीस वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण करावे लागते. निवड श्रेणी सरसकट दिली जात नाही. मंजूर पदाच्या केवळ 20 टक्के पदांनाच निवड श्रेणी लागू होते. त्यामुळे अनेक शिक्षक बांधव निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित राहतात. तसेच विज्ञान शाखेतील पदवीधर शिक्षकांना सुट्टी घेऊन पदव्युतर पदवी घेणे शक्य नाही. राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे शिक्षकांना ही विनाअट वेतनश्रेणीचा लाभ झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आपण लढत आहोत.

मागील काही वर्षांपासून प्रशिक्षण होत नाही. प्रशिक्षण न झाल्यामुळे वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी च्या प्रस्तावावर कार्यवाही होत नाही. शिक्षक संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर हमीपत्रावर वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ द्यायला सुरुवात केली होती. परंतु मागील शासनाने 23 ऑक्टोबर 2017 चा अन्यायकारक शासन निर्णय काढून जाणीवपूर्वक शिक्षकांना वेतनश्रेणीच्या लाभांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. शाळासिद्धिमध्ये शाळेला 'ए' ग्रेड असणे आणि 9वी / 10वी चा निकाल 80% पेक्षा जास्त असणे अश जाचक अटी घालण्यात आल्या. मोठया संघर्षाने 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार वरील जी.आर. अधिकरमित करण्यात आला आहे. पण अंमलबजावणी होत नाही.

शिक्षक भारतीने माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी मिळण्याबाबत खालील मागण्या केलेल्या आहेत

1) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना शाळेतील सर्व शिक्षकांना  विनाअट लागू करा.

2) नवीन आश्वासित प्रगती योजना लागू होईपर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करताना मागील दोन वर्षांचे गोपनीय अहवाल विचारात घेऊन पात्र शिक्षकांना वरीष्ठ/निवड श्रेणी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत.

3) 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये दिनांक ऑक्टोबर 2017 व दिनांक 21 डिसेंबर 2018 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत.  26 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय स्वयंस्पष्ट असूनही अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

4) 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी करता पात्र शिक्षकांना  प्रशिक्षण करण्याची आवश्यकता नाही. असे असूनही प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे.  कृपया याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व लेखाधिकारी यांना आदेश  द्यावेत.

शिक्षक भारतीच्या आणि आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करूया! लढूया !! जिंकूया !!!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष 
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य

Friday, 14 August 2020

विशेष शाळांना न्याय मिळेल का?


सामाजिक न्याय विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे विशेष शाळातील कर्मचारी पाच महिने पगाराशिवाय जगत आहेत. मुंबईसारख्या शहरात पगाराशिवाय विशेष शाळा/ कर्मशाळेतील  मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. गृहकर्जाचे हफ्ते थकल्यामुळे बँकांना व्याजावर व्याज द्यावे लागत आहे. विजबिल, घरभाडे, किराणा सामान इत्यादी दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर कोरोना काळात उपासमारीची वेळ आली आहे. पगार हा प्रत्येक काम करणाऱ्या  व्यक्तीचा सन्मान असतो. पगार वेळेवर मिळणे हा त्याचा अधिकार आहे. परंतु सामाजिक न्याय मंत्रालय ज्याच्या नावात न्याय आहे तो न्याय कर्मचाऱ्यांना कधीच मिळत नाही. दिसतही नाही. वर्षानुवर्षे पगार उशिरा होत आहेत. कधी अधिकारी सही करत नाही म्हणून तर कधी पैसे नसतात म्हणून. पण याची शिक्षा शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना मिळते. कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये काम करायचं की रोज उठून पगारासाठी एखाद्या याचका प्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या दारात हेलपाटे मारायचे. एवढी अहवेलना का?

कोरोना काळात कोरोनाबरोबर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने कहर केला आहे. पाच महिने पगारच नाही. आठ दिवसात पगार होईल असे उत्तर गेली पाच महिने ते देत आहेत. पण आजही पगार आलेला नाही. राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन एक वर्ष उलटून गेले तरी विशेष शाळा/ कर्मशाळा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. याला जबाबदार कोण?

पगार/ वेतन आयोग रखडण्याचे कारण काय?

सामाजिक न्याय विभागाने अखर्चिक राहिलेले 480 कोटी रूपये मार्च महिन्या अखेर वित्त विभागाला परत पाठविले नाहीत. समाज कल्याण आयुक्त तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी शासनाला अखर्चिक रककम परत करणे बंधनकारक आहे. पण रक्कम परत न गेल्याने पगाराला उशिरा झाला आहे. पण त्यालाही दोन महिने उलटून गेले आहेत सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी  वित्त विभागाकडे बोट दाखवतात तर वित्त विभागाचे अधिकारी सामाजिक न्याय विभागाकडे बोट दाखवतात. प्रश्न मात्र सुटत नाही. आमदार कपिल पाटील यांनी स्वतः सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यांनीही आठ दिवसात पगार मिळणार असे आश्वासन दिले. त्यालाही पंधरा दिवस उलटून गेले आहेत. कोरोनामुळे आपण बाहेर पडू शकत नाही. रस्त्यावर उतरून आपल्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू शकत नाही. म्हणून अखेर आपण "ई-मेल भेजो आंदोलन" सुरू केले आहे.

सातवा वेतन आयोग मिळण्यास उशीर होत आहे याचे कारणही सामाजिक न्याय विभागातील अधिकारीच आहेत. सातव्या वेतन आयोगाची फाईल वित्त विभागाकडे पाठवताना योग्य कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे त्या फाईल मध्ये अनेक त्रुटी निघाल्या. या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक होते. शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांनी स्वतः सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर एक बाब लक्षात आली की विशेष शाळा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी बाबत आवश्यक ती कागदपत्रे  सामाजिक न्याय विभागाकडे नाहीत. शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे, वेतनाबाबतच्या नोंदी, अधिसूचना इ. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जमा केलेल्या आहेत. तरीसुद्धा आजही आपली सातव्या वेतन आयोगाची फाईल सरकलेली नाही. कोरोनाचं कारण पुढे करून दप्तर दिरंगाई सुरू आहे. म्हणूनच आपल्याला या इमेल भेजो आंदोलनातून शासनाला जागे करायचे आहे. राज्यभरातून हजारो मेल पाठवायचे आहे

दिव्यांगांच्या शाळेतील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न

1.  संस्थाचालक, मुख्याध्यापकांना  लायसन्स नूतनीकरणासाठी, वाढीव विद्यार्थी मान्यतेसाठी हेलपाटे मारावे लागतात.

2.  सामाजिक न्याय विभाग कार्यालयाने नुकत्यात 176 शाळांच्या  नूतनीकरणाच्या प्रस्तावाला नामंजूर केलेले आहे.  संस्थाचालक, मुख्याध्यापकांना वेठीस धरून विशेष शाळा/ कर्मशाळा बंद करण्याचे धोरण राबविले जात आहे.

3. सामाजिक न्याय विभागातील  अधिकाऱ्यांची कामाबद्दल असलेली अनास्था यामुळे शिक्षक-शिक्षकेतर यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

4.  नियमित वेतन वाढ, पदोन्नती, नियुक्ती इत्यादी कामांसाठी शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पहावी लागते.

5. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शनसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात,

6. ऑनलाईन सेवार्थ प्रणाली द्वारे वेतनासाठी शालार्थ आयडी वेळेत न मिळाल्यामुळे वैयक्तिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मिळूनही वेतन मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

7. कायम विनाअनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना अनुदानासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

8.  अपंग शाळा/ कर्मशाळा कर्मचारी शाळा संहिता च्या अंमलबजावणीबाबत अनेक ठिकाणी विसंगती दिसून येते. शिक्षक, शिक्षकेतरांचे कामाचे तास सर्व संस्थांमध्ये सारखे असणे आवश्यक आहे.

9.  अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाईन समायोजना मध्ये मोठा घोटाळा  दिसून येतो. 

10. दिव्यांग मुलांना सकस पोषण आहार, क्रीडा स्पर्धांचे आयोजन,  सामायिक अभ्यासक्रम इत्यादीबाबत सामाजिक न्याय विभाग उदासीन असल्याचे चित्र दिसते.

12 ऑगस्ट 2020 पासून विशेष शाळा/कर्मशाळा  कर्मचाऱ्यांनी "ई-मेल भेजो आंदोलन" सुरू केले आहे. आमदार कपिल पाटील यांनी सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांना भेटून रखडलेला पगार व सातवा वेतन आयोग तातडीने सुरू करण्याची विनंती केली आहे. माननीय धनंजय मुंडे साहेबांनी पगार वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत.  पगार वितरीत करणेबाबत झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा आपले पदाधिकारी मंत्रालयात जाऊन घेतील.  आपला रखडलेला पगार होण्यासाठी मंत्रालय स्तरावर तातडीने निर्णय न झाल्यास आपण सर्वांनी रस्त्यावर  उतरण्याची तयारी ठेवूया.  सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेऊया. पगार झाल्याशिवाय आता आपण शांत बसायचे नाही.

लढेंगे! जितेंगे!!

आपला स्नेहांकित 

सुभाष किसन मोरे, 

कार्याध्यक्ष 

शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


Friday, 7 August 2020

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन!

विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष आणि शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य,

पेन्शन नाकारणारी 10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली आधिसुचना मागे घेण्याचे आश्वासन माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले आहे. शिक्षण मंत्र्यांचे शिक्षक भारतीच्या वतीने जाहीर आभार!

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 10 जुलै 2020 रोजी पेन्शन हिरावून घेणारी अधिसूचना जारी केली होती. महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील मसुद्यात बदल सुचवणारी आधिसुचना राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पेन्शन वर घाला घालणारी होती.

शिक्षक भारती या आपल्या शासन मान्यताप्राप्त संघटनेने या  अन्यायाच्या विरोधात राज्यभर जागृती निर्माण केली.  पहिल्या टप्प्यात आपण सर्वांनी मिळून पोस्टर आंदोलन केले. त्याचा परिणाम म्हणून दुसर्या टप्प्यात राज्यभरातून शिक्षक भारतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो लेखी आक्षेप नोंदवण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात आपण स्थानिक मंत्री व आमदार यांना अधिसूचना रद्द करण्याबाबतचे निवेदन दिले. आपण घेतलेल्या मेहनतीमुळे राज्यभरातून अनेक मंत्री व आमदारांनी माननीय शिक्षण मंत्र्यांना फोनद्वारे व पत्राद्वारे अधिसूचना रद्द करण्याचे करण्याची विनंती केली.

आपल्या आंदोलनाला प्रतिसाद देत दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी माननीय शिक्षण मंत्र्यांनी आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती संघटनेला चर्चेसाठी बोलाविले. शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे,  कार्यवाह प्रकाश शेळके आणि शिक्षक भारती मुंबईचे कैलास गुजांळ उपस्थित होते. आमदार कपिल पाटील व  शिक्षक भारती ने मांडलेले सर्व मुद्दे मान्य करून अधिसूचना मागे घेण्याचे आश्वासन मा. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.




(बातमी मोठी करून वाचण्यासाठी click करा)


10 जुलै 2020 रोजीच्या अन्यायकारक अधिसूचनेच्या विरोधात  आपले आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बेलसरे सर  यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी कोरोना महामारीच्या काळातही खूप मेहनत घेतली.  निवेदने दिलीत. राज्यभर जागृती निर्माण केली. आंदोलने केली. आणि म्हणून आज आपल्याला यश मिळाले आहे. शिक्षक भारतीचे सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका  अध्यक्ष, सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते या सर्वांच्या एकजुटीने हे यश मिळालेले आहे.

त्याचबरोबर राज्यभरातील  संस्थाचालक, मुख्याध्यापक  व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनीही शिक्षक भारतीच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत लेखी आक्षेप नोंदवावा मोहिमेत सहभाग घेतला. त्यांचेही आभार!

शैक्षणिक प्रश्नावर  राज्यभरातून आपण सर्वजण शिक्षक भारतीच्या माध्यमातून एकत्रितपणे जो संघर्ष केला आहे त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. आपल्या सर्वांच्या कार्याला सलाम !

माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई  गायकवाड, आपले आमदार कपिल पाटील तसेच राज्यभरातून आपल्या निवेदनाला प्रतिसाद देऊन फोन करणारे व निवेदन देणारे माननीय मंत्री, माननीय स्थानिक आमदार यांचे शिक्षक भारतीच्या वतीने आभार!

शिक्षक भारतीच्या एकजुटीचा विजय असो !!!

आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे

कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य


Saturday, 1 August 2020

आपली पेन्शन वाचवण्यासाठी

*मा. मंत्री व स्थानिक आमदार यांना द्यावयाच्या पत्राचा नमुना*

प्रति,
(मा. मंत्री अथवा स्थानिक आमदार)

विषय : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली 10 जुलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करणेबाबत.

महोदय/ महोदया,
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 10 जुलै 2020 रोजी अधिसूचना जारी केलेली आहे. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी ही अधिसूचना अन्यायकारक आहे. या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त लाखो मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार हिरावला जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला 2020 साली नियमावलीत बदल करून पंधरा वर्षे मागे जाऊन पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शनच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत. 

कृपया शिक्षक भारतीच्या मागणीची आपण दखल घ्यावी व माननीय शिक्षणमंत्री यांना 10 जूलै  2020 रोजीची अधिसूचना रद्द करण्यासाठी पत्र लिहावे , ही विनंती.

आपले विनित 
(जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व स्थानिक पदाधिकारी यांची नावे)

-------------------------------------------

शिक्षक भारती पदाधिकारी यांच्यासाठी सूचना -

शिक्षक भारतीने 10 जुलै 2020 रोजीच्या अन्यायकारक अधिसूचनेच्या विरोधात राज्यभर आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातून अधिसूचनेवर लेखी आक्षेप घेणारी पत्र पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवण्याची मोहीम आपण सर्वांनी सुरू केलेली आहे. 10 ऑगस्टपूर्वी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाखो लेखी आक्षेप मंत्रालयापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मा. आमदार  कपिल पाटील साहेब व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या पुढील टप्प्यात पुढीलप्रमाणे नियोजन ठरवण्यात आलेले आहे.
1) राज्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्याची मोहीम ठरवण्यात आली आहे. रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी नियोजन करून आपापल्या मतदारसंघातील मंत्री अथवा स्थानिक आमदारांना वरील निवेदन द्यावयाचे आहे. 
2) निवेदन देताना फोटो काढायचा आहे व ते फोटो Whatsapp आणि Facebook ला शेअर करायचे आहेत.
3) निवेदन दिल्यानंतर मंत्री अथवा स्थानिक आमदार यांना मा. शिक्षणमंत्री वर्षातही गायकवाड  यांना प्रत्यक्ष फोन करायची विनंती करावयाची आहे.
4) आमदार कपिल पाटील आणि राज्य पदाधिकारी लवकरच मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मा. शरद पवार साहेब, मा. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि मा. संजयजी राऊत यांची भेट घेणार आहेत. अन्यायकारक अधिसूचनेबाबत माहिती देऊन ती रद्द करणेबाबत कार्यवाही करण्याची विनंती करणार आहेत. 
5) राज्याध्यक्ष श्री अशोक बेलसरे राज्यातील सर्व शिक्षक आमदार व सर्व पदवीधर आमदार यांना फोन करून 10 जुलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करण्याबाबत एकत्र येवून पाठपुरावा करण्याचे आवाहन करतील. 

वेळ फार कमी आहे. गाफिल राहून चालणार नाही. आपल्या सर्वांना अधिसूचना रद्द करण्यासाठी वरील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. आम्हाला खात्री आहे आपण ते कराल.
लड़ेंगे ! जीतेंगे !!

आपले स्नेहांकित,

अशोक बेलसरे, अध्यक्ष
सुभाष मोरे, कार्याध्यक्ष
संजय वेतुरेकर, जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह
प्रकाश शेळके, कार्यवाह
संगिता पाटील, महिला अध्यक्ष
आर. बी. पाटील, ज्युनिअर कॉलेज अध्यक्ष
धनाजी पाटील उपाध्यक्ष 
कल्पना शेंडे, मुंबई अध्यक्षा