Thursday 28 May 2020

शाळा सुरु करण्यापूर्वी ...

दिनांक 27 मे 2020 च्या महाराष्ट्र टाईम्स  वर्तमानपत्रातील पहिल्या पानावरील बातमी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल. "दोन विद्यार्थ्यांमध्ये हवे पाच फुटांचे अंतर" या मथळ्याखाली असलेल्या बातमीत जागतिक आरोग्य संघटना  (WHO) नेे  जारी केलेल्या मार्गदर्शक  सूचनांचा आधार घेऊन नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन ट्रेनिंग (NABET) आणि कॉलीटी कौन्सिल ऑफ इंडियाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यातील काही ठळक मुद्दे 

1) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर असावे.
2) प्रत्येक प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर बसवावे.
3) शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सानिटायझेशन करावे.
4) गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यांचे नियंत्रण करावे.
5) वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच फुटांचे अंतर असावे.
6) वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. तसेच मास्क आणि हातमोजांचा वापर करावा.
7) वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करावा.
8) शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करावा.
9) बसने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व बस चालकासाठीही नियमावली देण्यात आली आहे. 
10) 20 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.
11) शाळेतील मध्यान्न भोजन  सकाळी 10 ते 1 वेळात विद्यार्थ्यांची गट विभागणी करून द्यावे. 
12) स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषय व सर्व सुरक्षा उपायांचे पालन करावे.
13) शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा वापर करावा.
14) स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही असे नियंत्रण करावे. 
15) स्वच्छतागृहात मुबलक पाणी, साबण, हॅण्डवॉशचा  पुरवठा करण्यात यावा.
16) विद्यार्थ्यांच्या तापमानाची रोज नोंद ठेवावी.
17) शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित परीक्षण व्हावे.
18) शाळेतील शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेचे परीक्षण व्हावे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरू होऊ शकणाऱ्या अनुदानित विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसाह्य शाळा कॉलेजांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असेल. देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष उलटून गेली तरी शिक्षण ही मूलभूत गरज भागवणारी व्यवस्था निर्माण करता आलेली नाही. कोविड 19 ही एक आपत्ती असली तरी  तिला एक संधी मानून  शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा सक्षमीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठविताना सुरक्षितता आणि आरोग्याची हमी वाटली पाहिजे. मुले शाळेतील वातावरणात शंभर टक्के सुरक्षित राहतील याची खात्री शासनाला द्यावी लागेल.

हे आपण करू शकतो

1) आरोग्यविषयक सर्व सुविधांची निर्मिती -
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या सूचनानुसार शाळा कॉलेजांच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर बसवायचे आहेत. मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज ची गरज भासणार आहे. प्रत्येक शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करावयाचा आहे. राज्यातील शाळांची संख्या, विद्यार्थी संख्या आणि लागणारे आरोग्यविषयक साहित्य यांची आकडेवारी गोळा करून लागणारे सर्व साहित्य शाळा सुरू करण्यापूर्वी संस्थांना उपलब्ध करून द्यायला हवे .

2) ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे आवश्यक साहित्य -
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. वहया पुस्तकांच्या संपर्कात विद्यार्थी कमीत कमी आले पाहिजेत अशी व्यवस्था करायची आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवायचे आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर करायचा आहे. हे  करायचे असेल तर सर्व शाळांमध्ये सुस्थितीतील संगणक, प्रोजेक्टर, स्क्रीन, विद्युत जोडणी, वायफाय सुविधा, स्मार्ट बोर्ड इत्यादी साहित्य आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यापूर्वी शिक्षण संस्थांना सुसज्ज करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा.

3) शिक्षकांचे प्रशिक्षण - 
डीएड व बीएड कोर्समध्ये शिक्षकांनी वर्गात अध्यापन करण्याचे शिक्षण घेतले आहे. प्रत्यक्ष ऑनलाइन शिक्षण देताना लागणारी कौशल्य नव्याने आत्मसात करावी लागणार आहेत. मागील काही वर्षांपासून हजारो शिक्षक तंत्रस्नेही बनले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन अध्यापन करत आहेत. परंतु अजूनही लाखो शिक्षकांना प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयाच्या प्रत्येक पाठ्य घटकांवर आधारित ऑनलाइन पद्धतीने अध्यापन करण्याचे कौशल्य शिक्षकांना शिकावे लागेल. त्यासाठी राज्यातील प्रयोगशील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी लागेल. प्रत्येक शाळेतील शिक्षकांचा गट करून त्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार प्रशिक्षण द्यावे लागेल. 

4) शाळेतील शिक्षक संख्या वाढवावी लागेल -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करताना आरोग्यविषयक व सुरक्षिततेबाबत सर्व सूचनांचे पालन करण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची गरज भासणार आहे. शाळा सुरू होताना व सुटताना गेटसमोर गर्दी होणार नाही याचे नियोजन करावे लागणार आहे. वर्गातील बैठक व्यवस्था, सहशालेय उपक्रम, वर्गातील विविध अॅक्टिव्हिटी करताना मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गा मागे दोन शिक्षकांची आवश्यकता लागेल. दररोज विद्यार्थ्यांच्या तापमानाची नोंद ठेवावी लागणार आहे. कला व क्रीडा शिक्षकांना या सर्वांमध्ये मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. 

शासनाने तातडीने रिक्त जागांवर शिक्षक भरती करावी. अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व शाळांमध्ये केवळ विद्यार्थी संख्या तपासून पहिल्या दिवसांपासून शंभर टक्के अनुदान सुरू करावे लागेल. आजमितीस सहा लाखांपेक्षा जास्त शिक्षक बेरोजगार आहेत. या उच्च शिक्षित व कौशल्य प्राप्त मनुष्यबळाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने शासनाने विचार करायला हवा. 

5) शिक्षकेतर कर्मचारी भरती व प्रशिक्षण -
कोविड 19 च्या वातावरणात शाळा सुरू करताना सर्वात मोठी भूमिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची असेल. शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यावर साफसफाई व सँनिटायजेशन  करावे लागेल. स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची जागा, खेळाची मैदाने, ग्रंथालये, प्रयोगशाळा  या प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि योग्य प्रशिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना द्यावे लागेल. 2004 पासून राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद आहे. मृत्यू व सेवानिवृत्तीमुळे हजारो जागा रिक्त आहेत. राज्यातील अनेक  शाळांमध्ये एकही शिक्षकेतर कर्मचारी नाही  अशी स्थिती आहे . शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंध मंजूर होवूनही भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. शासनाने राज्यातील शाळांमध्ये तातडीने भरती करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शाळा सुरू होण्यापूर्वी करून घ्यावे. 

6) शैक्षणिक संस्थांचे सक्षमीकरण -
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून राज्यातील शिक्षणाची मोठी जबाबदारी शैक्षणिक संस्थांनी घेतलेली आहे. थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर,मास्क, हातमोजे, ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य, मोफत पाणी बिल व वीज बिल, बैठक व्यवस्थेत करावे लागणारे बदल, स्वच्छतागृहांची सुस्थिती यासारख्या अनेक बाबींवर खर्च करणे आवश्यक आहे. शासनाने शैक्षणिक संस्थांना आर्थिक पॅकेज घोषित करून मदत करायला हवी. तरच शाळा सुरू होऊ शकतील. 

शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू करण्यापूर्वी शाळेतील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक कोविड योद्धा बनण्यासाठी तयार आहे. कोरोना विषाणूशी दोन करण्याची त्याची तयारी आहे. या युद्धात  शासनाने फक्त त्याला लागणारी आवश्यक ती सर्व सामग्री देण्याची तयारी करावी लागेल.  कोणत्याही तयारीशिवाय शाळा सुरू करणे म्हणजे चिमुकल्यांचे जीव धोक्यात घालण्यासारखे ठरेल. मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. या संपत्तीचे संरक्षण  व समृद्धीकरण करणे ही काळाची गरज आहे.

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे, कार्याध्यक्ष 
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य.

70 comments:

  1. अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन साहेब।👍👍🙏🙏🤝🤝

    ReplyDelete
  2. मराठी माध्यमाच्या शाळांचे वास्तववादी चित्रण मांडले आहे,ठेच लागल्यानंतरच शहाणपण सूचन्याची परंपरा आहे आपली, ऑन लाईन शिक्षण देण्याचे प्रयत्न करण्यासाठी इतके वर्ष वाट पाहावी लागली , ज्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यास टॅब देऊ ऐसे घोषित केले त्याच वेळी खरच टॅब दिला सता तर आजचे चित्र वेगळे असते
    धन्यवाद सर आपण उनिवा व मार्ग तर दाखविले आहेत

    ReplyDelete
  3. Very nice suggestions.All suggestions are to the point.

    ReplyDelete
  4. खूपच छान आणि सत्य परिस्थिती मांडली आहे.

    ReplyDelete
  5. खूपच छान मांडलेत नेते..!!👌👍

    ReplyDelete
  6. छान सर.. वस्तुस्थिती दर्शक मागण्या..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  7. सर्व मुद्दे योग्य आहेत !!

    ReplyDelete
  8. मूलभूत आवश्यकताचें संगोपांग विवेचन.कोविड नंतर शिक्षण बदलेल,पण सुविधांमध्ये नेमके कोणते बदल पहिजे हे आपण मांडले.

    ReplyDelete
  9. जय शिक्षक भारती
    छान बातमी

    ReplyDelete
  10. सर खूपच महत्वाच्या सूचना

    ReplyDelete
  11. खूप छान सूचना ,ज्या शिक्षकांना गंभीर आजार जसे B P , sugar त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्यांना शाळेत येणे धोकेदायक आहे

    ReplyDelete
  12. खूप छान सूचना दिल्या आहेत,सरकारने तेवढी तयारी दाखवावी ,ग्रामीण भागात शक्य आहे पण मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात ही खूपच तारेवरची कसरत ठरणार आहे

    ReplyDelete
  13. खूप छान सूचना दिल्या आहेत,सरकारने तेवढी तयारी दाखवावी ,ग्रामीण भागात शक्य आहे पण मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात ही खूपच तारेवरची कसरत ठरणार आहे

    ReplyDelete
  14. या सुचना चे जर पालनझाले तर होईल

    ReplyDelete
  15. या सुचना चे जर पालनझाले तर होईल

    ReplyDelete
  16. खरच खूप वास्तववादी विवेचन केले आहे.

    ReplyDelete
  17. सुचना योग्य आहेत

    ReplyDelete
  18. अतिशय महत्वाच्या सूचना मांडण्यात आल्या आहेत आणि सध्या त्याची अत्यंत आवश्यकता आहे.ग्रामिण भागात या सूचनाँचे पालन छोट्या शाळा असल्याने करता येणे शक्य होईल परंतु शहरी भागात याचे पालन करणे कसरतीचे काम आहे.

    ReplyDelete
  19. मोरे सर आपण शिक्षक/ पालक/ संस्थेची येणाऱ्या अडचणी मांडल्या त्याबद्दल प्रथम धन्यवाद आज संस्थेसमोर कर्मचाऱ्याचा पगार द्यायचा कसा हा प्रश्न आहे शाळा बंद आणि फी मागू नये असे आदेश असल्याने बऱ्याच शाळांची ४० ते५० टक्के फी आलीच नाही आणि शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व उपाय योजना करता येतील का तसेच पालकांची मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मानसीकता होणे गरजेचे आहे तसेच दोन्ही विद्यार्थी मधील अंतर जेथे संख्या जास्त आहे तेथे शक्य नाही

    ReplyDelete
  20. वरील मार्गदशक सुचना पाडल्या तरच थोडे यश येईल,सर्वात महत्वाचे मुलं असतील तर शाळा असतील हे मान्य आहे मुले शाळे पर्यन्त येतांना त्यांची जबाबदरी कोण घेणार,एवढया सुविधा तर लाखों रुपये घेणाऱ्या इंग्रजी माध्यम च्या शाळा पण देऊ शकणार नाहीत आपल्या पाडा,वाडा,वस्त्या तील शाळा कश्या तग धरणार,अजून थोडं थांबावे,शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्षात काम करणारे चे मतं ह्या महिन्यात जाणून घेऊन एकाच वेळी सर्व शाळा चा निर्णय घ्यावा,शाळे शिवाय आणि मुला शिवाय काहीच महत्वाचे नाही,

    ReplyDelete
  21. खूप छान सर.इंग्रजेतर शाळाच्या समोरील हे खरे तर आव्हान आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. जास्त पट असणाऱ्या शाळेमध्ये या गोष्टीसाठी बऱ्याच अडचणी येणार आहेत

      Delete
    2. अगदी बरोबर आहे

      Delete
  22. सर आपले विचार स्वागतार्ह आहेत. शासनाने यावर परीपूर्ण विचार करुन निर्णय घ्यावा.

    ReplyDelete
  23. छान आणि अभ्यास पूर्ण मुद्दे मांडणी केली आहे

    ReplyDelete
  24. अतिशय सुंदर अशा सूचना मांडलेल्या आहेत. या सर्व सुचनांचे पालन होणे गरजेचे आहे. तरच आपणाला यश मिळेल. खरंच आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण व समृद्धीकरण करणे ही काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  25. अगदी योग्य सुचना सर

    ReplyDelete
  26. लेखणीतून शासनाला मोरे सरांचे maltivitamine.

    ReplyDelete
  27. अगदी योग्य मत नोंदवले सर

    ReplyDelete
  28. अभ्यासपुर्ण मांडणी आहे सर, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी म्हणजे तारेवरची कसरत करावी लागेल आणि या सर्वांपेक्षा, '' सर्व जगतील तर शिकतील,'' याचाही प्राधान्याने विचार व्हायलाच हवा

    ReplyDelete
  29. सर, अतिशय अत्यावश्यक, वस्तुनिष्ठ बाबींवर आपण शासन, शिक्षण विभाग व संबंधीतांचे लक्ष वेधले आहे.. खरंतर आपण उल्लेखिलेल्या भौतिक साधन सामुग्री या आदर्श शिक्षण संस्थांचं मॉडेल आहे. देशाला महासत्ता बनवण्याचं कोणी स्वप्न बघत असेल तर आपल्यासारखा शिक्षक व त्याच माध्यम काय असेल तर वरीलप्रमाणे अध्ययावत यंत्रणा....
    शिक्षकाने देशाप्रती आपलं कर्तव्य शिरोधार्य मानलं आहेच...
    या स्थितीतही आपल्या जबाबदारी तो समर्थपणे पार पाडील, याबाबत आपण व्यक्त केलेला विश्वास हा वास्तव आहे...
    राज्य व देशाच्या पुनरुभार्णीत आपण आपला वसा नक्कीच जपू...
    आपल्या सूचनांचं शासनाने स्वागत करावं..
    अंमलबजावणी करावी...
    शिक्षण व्यवस्था आपण नक्कीच सावरुया...

    ReplyDelete
  30. अतिशय अभ्यासपूर्ण मांडले आहे. परंतु शासनाने व संस्थेने ही शिक्षकांना सहकार्य केले पाहिजे तरच येणाऱ्या अडचणीनवर मात करता येइल.

    ReplyDelete
  31. ज्या शाळा गरिब व गजबजलेल्या वस्तीत आहेत. ज्या शाळेतील वर्गखोल्या लहान आहेत.ज्या शाळेच्या आजूबाजूला दाट लोक वस्ती आहे.ज्या शाळांमध्ये एक दोनच सौचालय आहे. अश्या अनेक शाळांमध्ये अनेक अडचणी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल.

    ReplyDelete
  32. Very nice sir I am always with you

    ReplyDelete
  33. शाळा उघडण्यापूर्वी ची तयारी खरोखरच योग्य मांडली सर..👍👍

    ReplyDelete
  34. खुपच छान माहीती दिली आहे सर आपण आपले आभारी आहोत

    ReplyDelete
  35. अगदी बरोबर आहे सर

    ReplyDelete
  36. अगदी बरोबर, वरील विचारांचा अभ्यास शासनाने तातडीने करावा, ही विनंती

    ReplyDelete
  37. Very nice sir I am always with you

    ReplyDelete
  38. मोरे सर खूप छान
    प्रा किरण थोरात
    संघटक पालघर जिल्हा

    ReplyDelete
  39. मोरे सर,अगदी बरोबर बोललात ,तुम्ही अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे

    ReplyDelete
  40. वास्तव दर्शन व उत्क्रूष्ट मार्गदर्शन

    ReplyDelete
  41. छान सर विचार करण्या योग्य......

    ReplyDelete
  42. सर तुम्ही खूपच अभ्यास पूर्ण सुचना दिलेल्या आहेत त्याबद्दल आपणास माझा तुम्हाला सलाम .शासनाने सर्व सूचनांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे .

    ReplyDelete
  43. धन्यवाद सर आमच्या मनातील सर्व प्रश्नांना उघड करून शासनांपर्यत पोहचविले

    ReplyDelete
  44. नमस्कार सर,
    आपला शाळा सुरू होण्यापूर्वी लेख वाचला.
    यात सामाविष्ट सर्व बाबी वसतिगृह शाळेत तर हमखास हव्याच.
    परंतु कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिल्हा पालघर या पाच शाळांना १ जून २०२० पासून सर्व कर्मचार्यांना हजर राहण्याचे आदेश आहेत.काय समजत नाही काय चालले आहे.

    ReplyDelete
  45. आधी भौतिक सुविधांची पूर्ति नंतरच शाळा सुरू. मुलांवर जीवघेणा प्रयोग करू नका

    ReplyDelete