Tuesday, 22 January 2019

९ फेब्रुवारीचा मोर्चा कशासाठी?


प्रति,
मा. संस्थाचालक / मुख्याध्यापक / शिक्षक, शिक्षकेतर बंधु भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसरा शनिवार आपण सर्वजण 'संघटना दिन' म्हणून साजरा करतो. आपल्या सुट्टयांमधील एक दिवस आपण त्यासाठीच राखून ठेवलेला असतो. त्यादिवशी मुलांना सुट्टी असते. आपण सर्व सहकाऱ्यांसोबत कधी नाटक पाहून तर कधी सिनेमा, संगीत काव्य मैफील आयोजित करुन हा दिवस उत्साहाने साजरा करतो. शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून आपला हा स्नेहसोहळा सुरु आहे. यादिवशी आपण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि आपल्यातील विशेष प्रविण्य मिळवणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करतो. शैक्षणिक चर्चासत्र घेतो. शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धेय्य धोरणांना विरोध करण्यासाठी ठराव करतो. 

पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. आपले शेकडो भगिनी आणि बांधव अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत. मुंबईत जागा रिक्त नाहीत हे कारण देऊन त्यांना आपल्या कुटुंबापासून, शाळेपासून दूर पाठवण्याचा शासनाने घाट घातला आहे. वर्षानुवर्षे आपल्या शाळेत सेवा केल्यानंतर आता आपल्या भगिनींना आणि बांधवांना बाहेर जावे लागू नये म्हणून शिक्षक भारतीने लढा उभा केला आहे. सर्व अतिरिक्त शिक्षक एकजुटीने या लढ्यात उतरले आहेत. त्यांना मुंबईत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण हे थांबवू शकलो नाही तर उद्या आपल्यावर हीच वेळ येणार आहे. सर्व अतिरिक्त बंधू भगिनींनी आपला नकार ठामपणे शासनाला कळवला आहे. २८ ऑगस्ट २०१५ आणि ७ ऑक्टोबर २०१५ या दोन शासन निर्णयांनी आपल्याला बेकायदेशीरपणे अतिरिक्त ठरवले आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये असंतोष पसरला आहे. अशावेळी सोहळा करणं पटत नाही. 

२ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत. ३ वर्षांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करुन नुकतेच हे बांधव पूर्ण पगारावर आले आहेत. भविष्याची अनेक स्वप्न त्यांनी उराशी बाळगली आहेत. अशात कोणतीही चूक नसताना त्यांच्या मान्यता रद्द केल्या आहेत. त्यांच्या घरात दुःखाचं वातावरण आहे. 

१ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग मिळणार या आशेवर आपण सर्वजण होतो. परंतु तेही शक्य झालेले नाही. त्याबाबतचे कोणतेही पत्रक शासनाने काढलेले नाही. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळण्याची मागणी शिक्षक भारतीने केपी बक्षी समितीसमोर केली होती. त्याचे काय झाले, हे अद्यापी समजू शकलेले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. 

दररोज निघणारा एक नवा जीआर शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळ निर्माण करत आहे. शाळाशाळांमध्ये डी.एड. विरुद्ध बी.एड. भांडण सुरु झाले आहे. सेवाज्येष्ठतेचा वाद विकोपाला गेला आहे. याचा फायदा शासनाने घेतला. यापुढे कोणालाही मुख्याध्यापक पदावर मान्यता न देता केवळ प्रभारी मान्यता देण्याचा जीआरच काढला आहे. त्यामुळे आपल्या अनेक बांधवांना मुख्याध्यापक पदाचा पगार मिळणार नाही. 

गेल्या १ वर्षापासून ऑनलाईन पगार प्रणाली बंद झाली आहे. नव्याने मान्यता मिळालेल्या शिक्षकाचे नाव शालार्थ आयडीमध्ये समाविष्ट न झाल्याने असे अनेक शिक्षक, शिक्षकेतर बांधव २ ते ३ वर्षांपासून पगारापासून वंचित आहेत. 

गेल्या वर्षात आपण शासनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढून आपला पगार पुन्हा एकदा युनियन बँकेत आणू शकलो, हीच काय ती समाधानाची बाब आहे. 

शासन दरबारी प्रलंबित ठेवलेली सावित्री-फातिमा कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजना मंजूर न झाल्याने अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चापोटी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यांच्या वैद्यकीय परिपूर्तीची बिलं डिपार्टमेंटला पडून आहेत. आमचे एक सहकारी श्री. अर्जुन चौगुले सर काही महिन्यांपूर्वी रेल्वे अपघातात थोडक्यात बचावले. लाखो रुपयांचा खर्च झाला. शिक्षक भारतीच्या सर्व शिलेदारांनी एकत्रित येऊन आर्थिक ताकद उभी केली. सरांच्याही खिशातून लाखो रुपये खर्च झाला आहे. कॅशलेस योजना असती तर चौगुले सरांसारख्या अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झाला असता. चौगुले सर प्रचंड इच्छाशक्ती आणि हिमतीच्या बळावर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. परंतु पुढील खर्च कसा करायचा याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 

जुनी पेन्शन योजना सुरु करा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभं राहिलं आहे. शिक्षक भारतीने १६ जिल्ह्यांमध्ये मेळावे घेऊन जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रान पेटवले आहे. पण सरकार उदासिन आहे. ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत मला शैक्षणिक प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी जुन्या पेन्शनच्या मागणी संदर्भात विशेष समिती स्थापन करण्याचे मा. मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते. त्यामध्ये शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना घेण्याचे ठरले होते. परंतु १९ जानेवारी २०१९ रोजी निघालेल्या शासन निर्णयाद्वारे केवळ शासकीय अधिकाऱ्यांचीच समिती तयार करण्यात आली आहे. त्यात संघटनेच्या प्रतिनिधीला स्थान दिलेले नाही. आपली बाजू ऐकून न घेता, आपण मत ऐकून न घेता ही समिती म्हणजे इतर अनेक समित्यांसारखा फार्स ठरणार आहे. त्यातून काहीही निष्पण होणार नाही. त्याच बैठीकीत मा. मुख्यमंत्री यांनी शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे मान्य केले होते. वारंवार पाठपुरावा करुनही शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळे बैठक होऊ शकलेली नाही. 

यासर्व परिस्थितीचा विचार करुन शिक्षक भारतीने ९ फेब्रुवारी २०१९ रोजी संघटना दिनाच्या दिवशी 'समान काम, समान वेतन, समान पेन्शन' सर्वांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात, समतेच्या मागणीसाठी मुंबई येथे दादर रेल्वे स्टेशन (पूर्व) येथून सकाळी ११ वा. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्च्यात राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आपण सर्वांनी आपल्या स्टाफरुममध्ये बैठक घेऊन सर्वांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे. त्यादिवशी सर्व शाळांनी नॉन इंस्ट्रक्शनल डे / अन अध्ययन दिवस जाहीर करावा. 

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत. शिक्षण क्षेत्रातील शासन निर्माण केलेले हे सर्व प्रश्न तातडीने सोडवायचे असतील, एकाही शिक्षकाला सरप्लस होऊ द्यायचं नसेल, मान्यता कायम करायच्या असतील, सातवा वेतन आयोग मिळवायचा असेल तर रस्त्यावर उतरुन आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल. तरच शासनावर दबाब निर्माण होईल. शिक्षकांना ग्राह्य धरण्याची भूमिका शासनाला सोडावी लागेल. आपल्या प्रश्नांना राजकीय पक्षांच्या अजेंड्यात स्थान मिळवून द्यायचे असेल, आपले प्रश्न सोडवायचे असतील तर आपण सर्वजण मोठ्या संख्येने ९ फेब्रवारीच्या मोर्च्यामध्ये सहभागी होऊया. 
लढुया, जिंकूया!

शनिवार दि. ९ फेब्रुवारी २०१९, सकाळी ११ वा.
दादर स्टेशन (पूर्व), स्वामीनारायण मंदिर ते कामगार मैदान, केईएम हॉस्पिटल जवळ, परळ

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

आंदोलनातील मागण्या - 
∎ सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
 विनाअनुदानित शाळा, ज्युनिअर व सीनिअर कॉलेज आणि आयटीआय यांना १००टक्के अनुदान द्या.
 वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्रह्य धरावी.
 अंगणवाडी ताईंना पूर्व प्रथमिक शिक्षकाचा दर्जा देऊन वेतन द्या.  
 केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करा. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा.
 विनाअट वरिष्ठ व निवडश्रेणी द्या. २३/१० चा जीआर रद्द करा.
 शिक्षकांना अतिरिक्त करणारा २८ ऑगस्ट २०१५ व ७ ऑक्टोबर २०१५ चे जीआर रद्द करुन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षकांच्या मागणीनुसार करावे. 
 डी. एड. बी. एड. भरती सुरु करुन राज्यातील शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा.
 नोकर कपात, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण बंद करा. सरकारी व निमसरकारी नोकर भरती सुरु करा.
 स्वयंअर्थशासित शाळा धोरण आणि शिक्षणाचे कंपनीकरण बंद करा.
 कला, क्रीडा शिक्षकांची पदे पुनर्स्थापित करा. पूर्णवेळ ग्रंथपाल नेमा.
 २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रद्द केलेल्या मान्यता पूर्ववत करुन वेतन सुरु करा. 
 अंशकालीन निदेशक / अतिथी निदेशक कला, क्रीडा व कार्यानुभव यांना कायम स्वरुपी नियुक्ती व वेतन श्रेणी लागू करा. 
 मानसेवी शिक्षकांना कायम करा. मानधन नको, वेतन द्या. 
 शाळा, महाविद्यालयातील आयसीटी, आयटी शिक्षकांना पूर्णवेळ वेतन द्या.
 पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद करु नका. दहावीचे २० टक्के अंतर्गत गुण बंद करु नका.
 बदली प्रक्रीयेत सुलभता आणा. पती-पत्नींना एकत्र आणा.
 राज्यातील सर्व शाळांना मोफत वीज आणि आरटीईप्रमाणे सर्व भौतिक सुविधा द्या.
 शाळांमधील स्वयंपाकी मदतनीसांना किमान वेतन द्या.
 सावित्रीबाई फुले-फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना त्वरीत लागू करा.
 शिक्षकेतर कर्मचारी, सफाईकामगार आणि महिला सुरक्षा रक्षक त्वरीत नेमा.
 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध जाहीर करुन भरती सुरु करा. 
 शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार बंद करण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत थेट भरती करा.
 सर्व दिव्यांग स्पेशल स्कूल्स्ना विशेष अनुदान द्या. आरटीई लागू करा.
 मुख्याध्यापकांना केंद्रीय विद्यालयाप्रमाणे स्वतंत्र वेतनश्रेणी द्या.
 रात्रशाळा व रात्र ज्युनिअर कॉलेज पूर्ववत सुरु करा.
 वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार १० टक्के द्या.
 ऑनलाईन कामांचे आऊटसोर्सिंग करा. बीएलओ ड्युटी रद्द करा.
 ज्युनिअर कॉलेजमधील पायाभूत पदांना अनुदान देऊन तत्काळ पगार सुरु करा. 
 विद्यार्थ्यांच्या सर्व शिष्यवृत्या वेळेत द्या. मोफत गणवेश वाटप करा.
 कमी पटसंख्येच्या शाळा / अंगणवाडी शाळा बंद करु नयेत. 
 अनुदानित शाळा/ज्युनिअर मधील विनाअनुदानित तुकड्यांवर कार्यरत शिक्षकांना रिक्त अनुदानीत पदावर तात्काळ मान्यता द्या.
 २०१२ नंतर ना हरकत प्रमाणपत्र न घेता काम करणाऱ्या ज्युनिअर कॉलेज शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्यात याव्यात.
 शालार्थ आयडी नोंदणीचे काम विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे द्यावे.

Friday, 4 January 2019

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कसे होणार?


सध्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरु  आहे. आपले समायोजन नक्की कोठे होणार या भितीने शिक्षक - शिक्षकेतर चिंता ग्रस्त आहेत. महिला शिक्षकांसमोर तर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईत सुमारे ६५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मुंबईत त्यांचे समायोजन होऊ शकलेले नाही. आता त्यांना पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात समायोजनाने जावे लागणार आहे. मुंबईतील नोकरी, घर, मुलांच्या शाळा या सर्वांपासून दूर गावी जाऊन रहायचे कुठे ? सगळा संसार कोणाच्या भरवशावर सोडून जायचे ? अनेकांच्या घरी वृद्ध आई - वडील आहेत. त्यांचा दवाखाना औषधोपचार कसा होणार? मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी लांबून कशी पेलणार? असे अनेक प्रश्न समोर उभे आहेत.

मुंबईतील मराठी शाळांमधील मुलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. इंग्रजी माध्यमात मुलांना पाठवण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. पालकांचा सीबीएससी, आयसीएससी आणि आयबी शाळांकडे ओढा वाढतो आहे. गरीबातील गरीब पालकाला आपल्या मुलाला आणि मुलीला चांगले व दर्जेदार शिक्षण द्यायचे आहे. त्यासाठी कोणतीही किंमत द्यायला पालक तयार आहेत. अशावेळी काही शाळांचा अपवाद सोडला तर बहुतांश मराठी शाळांचा दर्जा आज ढासळताना दिसतो आहे. शासनाचे उदासिन शैक्षणिक धोरण आणि अनुदानित व्यवस्था बंद करण्याची कुटनिती हे त्यामागचे एक महत्वाचे कारण आहे. समाजाप्रती असलेले प्रेम आणि सेवाभावी वृत्तीने ज्या संस्थांनी उदात्त ध्येयाने शाळा सुरु केल्या होत्या त्यांना या शाळा म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. न मिळणारे वेतनेतर अनुदान, वाढलेले वीज बील व पाणी बील यामुळे शैक्षणिक संस्था तोटयात आहेत. एस.एस.सी. बोर्डाच्या मराठी शाळांमध्ये पालक मुलांना पाठवायला तयार नाहीत. मुुंबईतील बहुतेक सर्व मोठ्या शाळांनी मराठी शाळांच्या इमारती इंग्रजी माध्यमांची सुरु केलेली शाळा आता मोठी झाली आहे. त्याच इमारतीत भरणारी मराठी शाळा एका कोपऱ्यात बंद पडण्याची वाट पाहत आहे. फी मिळणारी शाळा चालवण्याचा निर्णय अनेक संस्थाचालकांनी आज घेतला आहे म्हणून मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. 

मागील १५ वर्षांपासून महाराष्ट्रात मराठी शाळांच्या संवंर्धनासाठी शासकीय स्तरावर ठोस धोरण तयार करणे आवश्यक होते. परंतु तसे न होता मराठी शाळांची गळचेपी करण्यात आली. विनाअनुदान, कायम विनाअनुदान, अंशतः अनुदान, शिक्षण सेवक अशा अनेक घातक योजनांद्वारे जाणीवपूर्वक अनुदानित शाळांची प्रतिमा मलिन करण्यात आली. मागील चार वर्षात तर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांना ऑनलाईनची कामे, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक, शाळा बाह्य मुले, पोषण आहाराचा हिशोब, जनगणना, बीएलओ ड्युटी, बेसलाईन टेस्ट, संकलित चाचणी आणि रोज नव्याने येणारे शासन निर्णय यामध्ये इतके गुरफटले की शाळेतील विद्यार्थी आणि त्यांची गुणवत्ता याकडे दुर्लक्ष होत गेले. विविध संस्थांचे सर्वेक्षण अहवालातून महाराष्ट्रातील मुले सर्व स्तरावर कशी मागे पडत आहेत याचे चित्र समोर मांडण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकावण्यात आले. रोज एक नवा जीआर यामुळे शाळांचं वार्षिक नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाने तर विद्यार्थी असूनही शिक्षकांना बाहेर काढण्याचं काम केलं. तीन भाषांना एक शिक्षक, गणित, विज्ञानाला एक शिक्षक आणि समाजशास्त्राला एक शिक्षक असा नवा पॅटर्न आणला. त्यामुळे अनेक शिक्षक बाहेर फेकले गेले. मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्याच उरली नाही असे नाही. तर शासनाने मागच्या दाराने आणलेले जीआर शिक्षकांना अतिरिक्त करत आहेत. 

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सोडवण्याची शासनाची भूमिका नाही. अतिरिक्त शिक्षक आणि समायोजन याचा सकारात्मक विचार करुन मार्ग काढण्याची वृत्ती दिसून येत नाही. याउलट अतिरिक्त शिक्षक म्हणजे गुन्हेगारच या भावनेने त्यांना त्यांच्या जिल्ह्यातून बाहेर काढायचं, परेशान करायचं धोरण शासनाने आखल्याचे दिसत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सर्व शिक्षकांचे त्यांच्या जिल्ह्यातच समायोजन करता येईल. त्यासाठी आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे -

महत्वाच्या सूचना - 
१. आरटीई  आणि १९८१ च्या कर्मचारी सेवाशर्ती नियमावलीनुसार प्रत्येक शाळेतील किमान शिक्षक संच निर्धारित करणे आवश्यक आहे. इ. ९वी, १०वीच्या गटासाठी ६ शिक्षक (मराठी १, हिंदी १, इंग्रजी १, गणित १, विज्ञान १, समाजशास्त्र १) तर इ. ६वी ते ८वीच्या गटासाठी ८ शिक्षक (मराठी १, हिंदी १, इंग्रजी १, गणित १, विज्ञान १, समाजशास्त्र १, शा.शि. १, कलाशिक्षक १) आणि इ. ५ वीच्या गटासाठी १ शिक्षक याप्रमाणे इ. ५वी ते १० वी पर्यंतच्या शाळेसाठी किमान १५ शिक्षकांचा संच लागतो. मात्र वर्कलोड विभागणी आणि तुकडीमागे दीड शिक्षक याप्रमाण ही संख्या ११ पर्यंत आणता येईल. तरी कृपया सर्व माध्यमिक शाळांमध्ये किमान ११ (१० अधिक १) शिक्षकांचा संच मंजूर करण्यात यावा. 
२. पूर्वी कला-क्रीडा शिक्षकांना संचमान्यतेत 'विशेष शिक्षक' म्हणून वेगळे स्थान होते. नव्या संचमान्यतेच्या निकषात 'विशेष शिक्षक' देण्यात येत नाही. कला-क्रीडा शिक्षकांची विषय शिक्षकांमध्ये गणना केली जाते. परिणामी विषय शिक्षकांचे पद कमी होते. संचमान्यतेतून कला-क्रीडा शिक्षक वेगळे दाखवल्यास विषय शिक्षकांना जागा उपलब्ध होतील तर कला, क्रीडा शिक्षकांना स्पेशन टीचर म्हणून संरक्षण द्यावेच लागेल. 
३. संचमान्यतेत विद्यार्थी संख्येला वर्गखोलीची अट घालण्यात आली आहे. वर्गखोली उपलब्ध नसल्याने अनेक शाळांना विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक उपलब्ध होत नाहीत.
इ. ५वी च्या गटातील डी.एड. शिक्षकांची संख्या जास्त आहे. खाजगी प्रथमिक शाळेतील विद्यार्थी संख्येसाठी वर्गखोलीची अट शिथिल केल्यास वाढीव शिक्षक पदांची संख्या वाढेल. मुंबईत दुबार अधिवेशनात भरणाऱ्या शाळांची संख्या जास्त आहे. वर्गखोलीची अट असल्याने वाढीव शिक्षक पद मिळत नाही. तरी कृपया अट शिथिल करावी. 
४. संचमान्यता ऑनलाईन होत असल्याने विद्यार्थी संख्या वाढली तरी वाढीव शिक्षक मिळवण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेची वाट पहावी लागते. तात्काळ शिक्षक पद मिळत नाही.
५. मुंबईतील अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली तरी वाढीव शिक्षक पद मिळत नाही. अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वाढीव पद मंजूर केल्यास अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करता येऊ शकते. 
६. इंग्रजी माध्यमांमध्ये रिक्त पदांची संख्या मोठी आहे. विषयांची गरज व शिक्षकांची गुणवत्ता तपासून काही शिक्षकांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये समायोजन करता येईल.
७. मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांमधून शैक्षणिक  पात्रता असणाऱ्या शिक्षकांचे समायोजन ज्यु. कॉलेजमधील रिक्त पदांवर होऊ शकते.
८. सन २०१८-१९ ची संचमान्यता तपासल्यास रिक्त पदांची खरी आकडेवारी समोर येईल.

उपरोक्त सूचनांचा सकारात्मक विचार केल्यास समायोजनाचा मार्ग निघेल. महिला शिक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही. 

अनेक अतिरिक्त शिक्षकांचे वय पन्नाशीच्या जवळपास आहे. काहींना तर निवृत्त होण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी उरला आहे. मागील काही वर्षांपासून संचमान्यता करताना व अतिरिक्त शिक्षक ठरवताना अनेकांवर अन्याय झाल्याचे दिसून येते. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या आक्षेपांचा अभ्यास करुन त्यावर तोडगा काढणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे संचमान्यता आणि समायोजनाबाबत शिक्षकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. एकूणच समायोजनाची प्रक्रिया तापदायी बनली आहे. त्यामुळे शिक्षकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ धोक्यात आले आहे. आपल्या जिल्ह्याबाहेर, कुटुंबापासून दूर तासंतास प्रवास करुन समायोजनाने पाठवलेल्या शिक्षकांकडून अध्यापनाचे काम कसे होऊ शकेल हा ही मोठा प्रश्न आहे. 

संचमान्यता आणि अतिरिक्त शिक्षक यांचे अनेक आक्षेप शिक्षक भारतीकडे आले आहेत. ते पुढीलप्रमाणे - 
# सन २०१३-१४ पासून ऑनलाईन संचमान्यता झाल्यानंतर एकदाही संचमान्यता वेळेवर देण्यात आलेली नाही.
# संचमान्यतेत दुरुस्तीबाबतच्या तक्रारीचे निराकरण झालेले नाही. 
# शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता ठरविण्याबाबतच्या निकषात स्पष्टता नाही. त्यामुळे शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक ठरविण्यात अनेक अडचणी येतात. 
# नियुक्ती दिनांक, विषय, रोस्टर इ. मुद्यांचा विचार करुन अतिरिक्त ठरविण्याचे स्पष्ट नियम नाहीत. 
# अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या आक्षेपावर सुनावणी घेण्यात आलेली नाही. अथवा काही प्रकरणात सुनावणी घेतली पण लेखी निर्णय देण्यात आलेला नाही. 
# अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांच्या यादीत सतत बदल होत गेला आहे. 
# अतिरिक्त शिक्षकांची यादी सदोष असून त्यात नियुक्त दिनांक, शै. पात्रता तसेच वेगवेगळ्या गटात समावेश केल्याच्या अनेक चुका आहेत. 
# रात्रशाळेत पाठविलेल्या शिक्षकांना अतिरिक्त यादीत न घेतल्याने त्यांना समायोजनात सहभागी होता आलेले नाही. 
# रात्रशाळेतील रिक्त पदांबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. 
# शाळांमधील रिक्त पदांची माहिती देताना काही शाळांमधील रिक्त पदे लपविण्यात आल्याचे दिसते. 
# अतिरिक्त ठरविताना सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला आहे. 
# मुंबईतील शिक्षकांचे समायोजन करताना उत्तर, दक्षिण व पश्चिम विभागांचे एकत्र समायोजन झाल्याने अनेक शिक्षकांवर दुरवरच्या दुसऱ्या विभागात समायोजनाने जावे लागले. 
# रात्रशाळेत समायोजन करताना शै. पात्रतेचा विचार न करता पक्षपातीपणे समायोजन झाल्याचे दिसते. 

अतिरिक्त शिक्षकांचा आकडा मोठा आहे. भविष्यात तो वाढतच जाणार आहे. पण शिक्षकांना विश्वास देऊन त्यांना संरक्षण दिल्यास हे शिक्षक आजही आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने शासन दरबारी शिक्षकांच्या समस्या, आक्षेप आणि त्यावरील उपाय पाठवले आहेत. आता जबाबदारी शासनाची आहे. 

- सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

Saturday, 13 October 2018

रात्रशाळा व अतिरिक्त शिक्षक

(Pic - The Indian Express)

१७ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार रात्रशाला व रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील दुबार शिक्षकांना सेवामुक्त करण्यात आले. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती नियमावली) मधील तरतूदींनुसार दिवसाच्या शाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतरांना अर्धवेळ काम करण्याची परवानगी दिलेली आहे. तरी सुद्धा १७ मे च्या अन्यायकारक निर्णयान्वये रात्रशाळा व रात्रकनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सेवेतून काढण्यात आले. त्यामुळे रात्रशाळांमधील  विद्यार्थ्यांना शिकवणारे विषयानुरुप शिक्षक बाहेर पडले. मोठ्या प्रमाणावर रात्रशाळांमध्ये जागा रिक्त झाल्या. रात्र कनिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त शिक्षक नसल्याने १७ मेच्या शासन निर्णयानुसार कमी केलेल्या शिक्षकांना पूर्ववत कामावर रुजू करण्यात आले. परंतू रात्रशाळांमधील शिक्षकांबाबत दुजाभाव करत दिवसाच्या शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे तात्पुरत्या स्वरुपात रात्रशाळांमध्ये समायोजन करण्यात आले. 

रात्र कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पूर्ववत कामावर रुजू करुन त्यांचे वेतन नियमित सुरु करण्यात आले आहे. परंतू रात्रशाळांमधील शिक्षकांना मात्र हा न्याय लावण्यात आलेला नाही. दिवसा शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रात्रशाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात केल्याने काही रात्रशाळांमध्ये विषयानुरुप शिक्षक उपलब्ध नाहीत. तसेच महिला शिक्षकांचे रात्रशाळांमध्ये समायोजन केल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते. रात्रशाळांचा कालावधी वाढवल्याने महिलाशिक्षकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रशाळा टिकवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी गरज पडेल तेव्हा रात्रशाळा शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. अनेक रात्रशाळांमध्ये वर्गखोलीचे भाडे, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके आणि दैनंदिन खडू फळ्याचा खर्च सुद्धा रात्रशाळेतील शिक्षक-शिक्षकेतरांनी आपल्या पगारातून केला आहे. रात्रशाळेतील शिक्षक केवळ पगार मिळतो म्हणून काम करत नव्हते तर त्यांना रात्रशाळा आपली वाटत होती. वर्षांनुवर्षाचा त्यांचा रात्रशाळेशी आणि त्या विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध होता. शासनाच्या एका अन्यायकारक निर्णयाने हे नातं संपुष्टात आलं आहे. पण तरीही आमच्या रात्रशाळा बांधवांनी आशा सोडलेली नाही. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती रात्रशाळेतील शिक्षकांना पूर्ववत कामावर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. 

दिवसाच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना रात्रशाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेऊन शासनाने अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय केला आहे. आमच्या कितीतरी शिक्षक बंधू-भगिनींना त्यांच्या संपूर्ण सेवा काळात न शिकवलेल्या विषयांचे अध्यापन करण्याची वेळ आली. दिवसाच्या शाळेतील अध्यापन आणि रात्रशाळेतील अध्यापन यात खूप फरक आहे. रात्रशाळेत येणाऱ्या मुलांची मानसिकता, त्यांची शिक्षणाची आवड आणि शिकण्याची पद्धती जाणून शिकवणे आवश्यक असते. सुरुवातीला दिवसाच्या शाळेतील शिक्षकांना याचा त्रास झाला. कमी कालावधीत या अतिरिक्त शिक्षकांनी रात्रशाळेचे तंत्र शिकून घेतले आहे. प्रमाणिकपणे या मुलांना शिकवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतू त्यांचे हे समायोजन तात्पुरत्या स्वरुपाचे आहे. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी शिक्षक मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. 

सन २०१६-१७ च्या संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती. या यादीतील काही शिक्षकांचे रात्रशाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपाचे समायोजन करण्यात आले आहे. काही शिक्षकांना रिक्त जागांवर पाठवले गेले. काही शिक्षक बीएलओची कामे करत आहेत. काही शिक्षकांना शिक्षण निरीक्षक कार्यालयात जुंपण्यात आले आहे. अशा प्रकारची अनिश्चितता शिक्षण क्षेत्रात कधीच नव्हती. शिक्षकांचा इतका अवमान कोणीच केला नव्हता. विद्यार्थी संख्या कमी झाली हे शिक्षक अतिरिक्त ठरण्याचं एकमेव कारण नाही. संचमान्यतेचे बदलेले निकष, तीन भाषांना एक शिक्षक, वर्गखोलीला शिक्षक, विशेष शिक्षक पद रद्द अशा शिक्षण विभाग निर्मित कारणांमुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. अतिरिक्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात रात्रशाळांमध्ये पाठवून त्यांचा दिवसाच्या शाळेत कायम स्वरुपी समायोजित होण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे. रात्रशाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिकवत असले तरी दिवसाच्या शाळेतच समायोजन झाले पाहिजे, अशी शिक्षक भारतीची मागणी आहे.  

सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करताना रात्रशाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात समायोजन केलेल्या शिक्षकांचा समावेश करण्यात यावा. तसेच त्यांचा यादीतील सेवाज्येष्ठता क्रम बदलू नये. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना तात्पुरत्या स्वरुपात रात्रशाळेत काम करणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षकांचा प्रथम विचार करण्यात यावा. त्यांना दिवसाच्या शाळेतील रिक्त जागांवर कायम स्वरुपी समायोजित करण्यात यावे यासाठी मा. अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे शिक्षक भारतीने मागणी केली आहे. 




मुंबई जिल्ह्यात प्रत्येक विभागाची वेगळी सेवाज्येष्ठता यादी तयार करा - शिक्षक भारतीची मागणी
घोळ समायोजनचा हा संपूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी क्लीक करा - https://subhashkisanmore.blogspot.com/2018/03/blog-post_13.html


आपला ,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र
subhashmore2009@gmail.com

Saturday, 6 October 2018

वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी हमीपत्र ग्राह्य धरणार

शिक्षक भारतीची मागणी मंजूर


सेवेची १२ वर्ष व २४ वर्ष पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी दिली जाते. मुंबईतील शेकडो शिक्षक व शिक्षकेतरांची  सेवा १२ वर्ष होऊनही वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण न झाल्याचे कारण देऊन लेखाअधिकारी नाकारत होते. शिक्षण विभागातर्फे प्रशिक्षणाचे आयोजन न केल्याने प्रशिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे हजारो शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळत नाही.

शिक्षक भारतीने ज्या शिक्षकांची सेवा १२ वर्ष पूर्ण झाली आहे. त्यांना भविष्यात प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या हमीपत्रावर वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याची मागणी केली होती. परंतु लेखाधिकारी यांनी हमीपत्रावर वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबत असमर्थता दर्शविली होती. परंतु मा.आमदार कपिल पाटील यांनी हमीपत्रावर वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे २३/१०/२०१७ च्या शासन निर्णयापूर्वी ज्या शिक्षकांची सेवेची १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना हमीपत्र देऊन वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्याने वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबतची परवानगी लेखाधिकारी कार्यालयाने दिली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. यासाठी शिक्षक भारती उत्तर मुंबई विभागाचे अध्यक्ष मछिंद्र खरात यांनी पाठपुरावा केला.




-----------------------

के.पी. बक्षी समिती समोर शिक्षक भारतीचे सादरीकरण 
शिक्षण विभाग माहिती देण्यास असमर्थ

केंद्राप्रमाणे राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मा. श्री. के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या राज्य वेतन सुधारणा समितीसमोर शिक्षक भारतीने आज मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडली. यावेळी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कॉलेजातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर यांच्यावर सहाव्या वेतन आयोगात झालेला अन्याय दूर करण्याची मागणी शिक्षक भारतीने केली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्या वेतनावरील होणारा प्रत्यक्ष खर्च आणि सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी लागणारी रक्कम याची कोणतीही ठोस आकडेवारी शिक्षण विभागाला समितीसमोर देता आली नाही. समितीचे अध्यक्ष श्री. के. पी. बक्षी यांनी सोमवार पर्यंत सर्व आकडेवारी सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले.

सहाव्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे वेतन संरचना मंजूर न केल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हकीम कमिटीने सुचवलेल्या वेतन श्रेण्यांमधील त्रुटी शिक्षक भारतीने समितीच्या निदर्शनास आणून दिली. सातव्या वेतन आयोगानुसार राज्यात वेतन संरचना निश्चित करताना केंद्राने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांना लागू केलेल्या वेतन संरचना जशा आहेत त्याच स्वरुपात लागू कराव्यात अशा आग्रह शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी धरला.

शिक्षक भारतीतर्फे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्रनिकेतन, स्पेशल स्कूल विभाग, कला-क्रीडा-कार्यानुभव या सर्व संवर्गातील पदांना न्याय देऊन वेतनश्रेणी देण्याची मागणी केली.

२३/१०/२०१७ चा जाचक जीआर रद्द होणार?
सेवेशी १२ वर्षे व २४ वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी दिली जात होती. परंतु शासनाने २३/१०/२०१७ रोजी जीआर काढून वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी मिळण्यासाठी शाळासिद्धीमध्ये शाळा ए ग्रेड असणे आणि ९वी, १०वीचा निकाल ८० टक्केंपेक्षा जास्त असणे या अटी समाविष्ट केल्या. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी  मिळण्याचा मार्गबंद झाला आहे. संपूर्ण सेवा काळात शिक्षकांना पदोन्नती मिळत नसल्याने १२ वर्षे व २४ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना निवडश्रेणी व वेतनश्रेणी मिळत होती. आता ती मिळत नाही. तसेच शासन तर्फे वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित न झाल्यामुळे हजारो शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. प्रशिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर ही संपूर्ण वस्तुस्तिथी शिक्षक भारतीने बक्षी समितीसमोर मांडली. या चर्चेदरम्यान शिक्षण विभागाकडून २३/१०/२०१७च्या शासन निर्णयातील जाचक अटी काढून टाकण्यात येतील असे सांगण्यात आले. शिक्षण विभागाने खरोखरच जर या अटी काढल्या तर हजारो शिक्षकांना शिक्षक भारतीच्या भूमिकेमुळे न्याय मिळेल.

यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, उपाध्यक्ष तथा वेतन सुधार समिती अध्यक्ष धनाजी पाटील, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, मुंबई ज्युनिअर कॉलेज युनिटचे अध्यक्ष शरद गिरमकर, कल्पना शेंडे, रवीशंकर स्वामी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Thursday, 9 August 2018

संप यशस्वी

१४ महिन्यांची थकबाकी मिळणार
जुन्या पेन्शनबाबत सरकारची प्रथमच समिती
समन्वय समिती - शिक्षक भारती एकजुटीचा मोठा विजय



सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाशी यशस्वी चर्चा केल्यानंतर संप स्थगित करण्यात आला आहे.

दिनांक ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी मा. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. काल चेंबूर, मुंबई येथे बीपीसीएल रिफायनरीत झालेल्या स्फोटानंतर जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने उपचार सुरु करण्यासाठी समन्वय समितीचे पदाधिकारी आणि संपात सहभागी आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. दुपारनंतर नर्स आणि कर्मचारी यांनी आपापल्या हॉस्पिटलमध्ये जखमींच्या मदतीसाठी काम सुरु केले.

मा. अर्थमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार होती. परंतु सकल मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय व्यस्त असल्याने बैठक होऊ शकली नाही. आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी राज्याच्या मुख्य सचिवांनी समन्वय समितीला मुख्यमंत्र्यांच्यावतीने चर्चेला बोलावले. मुख्य सचिवांसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर समन्वय समितीने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

७, ८ आणि ९ ऑगस्ट या तिन्ही दिवशी राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसोबत संपात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन!

संपाचे फलित
● १४ महिन्यांची थकबाकी मिळणार
दिनांक ४ ऑगस्ट २०१८ रोजी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेतून तोडगा न निघाल्याने समन्वय समितीच्या माध्यमातून शिक्षक भारतीने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. समन्वय समितीचा संप यशस्वी होऊ नये यासाठी थकबाकी देताना टाळाटाळ करणाऱ्या शासनाने संप सुरु होण्यापूर्वी म्हणजे दिनांक ६ ऑगस्टला १४ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. ही थकबाकी म्हणजे २०१७ पर्यंत महागाई भत्त्याची थकबाकी होय.

संपामुळे आज मुख्य सचिवांकडे झालेल्या चर्चेत शासनाने जानेवारी २०१८ पासूनचीही महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीत देण्याचे मान्य केले आहे. संपाचं हे यश मोठे आहे.

●  सातवा वेतन आयोग मिळणार
सातवा वेतन आयोग लागू करा ही आपली प्रमुख मागणी आहे. बक्षी समितीचा अहवाल अजून आला नाही आणि शासनाकडे पैसे नाहीत, असे कारण देत शासन वेतन आयोग द्यायला तयार नव्हते. संपाचा इशारा दिल्यानंतर शासनाने केंद्र सरकारच्या सूत्राप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचे मान्य केले होते. परंतु आज मुख्य सचिवांसोबत झालेल्या चर्चेनंतर बक्षी समितीचा अहवाल विनाविलंब प्राप्त करुन वेतन निश्चितीचे फक्त सुत्र न वापरता अहवालाप्रमाणे निश्चित झालेले वेतन जानेवारी पेड इन फेब्रुवारी २०१९ पासून देण्याचे मान्य केले.

● जुनी पेन्शन योजना
अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे ही संपाची मागणी आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत अंशदायी पेन्शन योजनेचा पुर्नविचार करण्यासाठी शासन व संघटना प्रतिनिधींचा अभ्यास गट स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले.

●  कर्मचारी भरती
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती २००४ पासून बंद आहे. अनुकंपा तत्वावरील भरतीसाठी प्रतिक्षा यादी मोठी आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्य सचिवांकडे स्वतंत्र बैठक समन्वय समिती घेणार आहे.

●  मुख्य सचिवांकडे विशेष बैठक
सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसोबत राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकाच वेळी सातवा वेतन आयोग लागू करण्याचे शासनाने मान्य केले आहे. शिक्षण विभागाशी संबंधित इतर प्रश्नांबाबत मुख्य सचिवांकडे संघटनांच्या प्रतिनिधींसोबत विशेष बैठक घेण्यात येईल.

● संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही
संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतची शिक्षण विभागाची पत्रे व्हॉटस्अपवर काही हितशत्रूंनी जाणिवपूर्वक फिरवली. कारवाईची भिती दाखवली गेली. मेस्मा लावण्याची भाषा झाली. परंतु आज मुख्य सचिवांकडे झालेल्या बैठकीत संपकऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले. 

संघटनेची ताकद म्हणजे आपली ओळख. संपाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली ओळख करुन देण्यात आपण सर्वजण यशस्वी ठरलो. संपामुळे शासनाने आपल्या ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याची भूमिका समन्वय समिती आणि शिक्षक भारती पुढील काळात पार पाडेल. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करेल. शासनाकडून मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यात चालढकल झाली किंवा फसगत झाली तर आपल्यापुढे बेमुदत संप करण्याचा पर्याय उपलब्ध राहील. पण अशी वेळ येणार नाही, अशी अपेक्षा.
शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी.
लढूया, जिंकूया.
जय शिक्षक भारती.

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य
सदस्य, सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती

Wednesday, 8 August 2018

संपाचा दुसरा दिवस. संप सुरुच राहणार.


मा. संस्थाचालक / प्राचार्य / मुख्याध्यापक / शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
आज (८ ऑगस्ट) दुपार नंतर अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी अनौपचारिकरित्या सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वास काटकर आणि गजानन शेटे यांना चर्चेसाठी बोलावले होते. या चर्चेमध्ये त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन न देता संप मागे घेण्याची विनंती केली. परंतु समन्वय समिती संपावर ठाम असल्यामुळे त्याबाबतीत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे संप सुरुच राहणार आहे. 

काल अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत मोठे लाँग मार्च काढले. आज संपाचा दुसरा दिवस. कालच्यापेक्षा आज राज्यभर संपाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. मोठ्या संख्येने शाळा/कॉलेज आज बंद होते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संपात सहभागी सर्वच कर्मचाऱ्यांना सलाम! उद्या शाळा/कॉलेज पूर्णपणे बंद ठेवयाचे आहे. 

मुंबईतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, उद्या गुरुवार दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्नी रोड येथे मोठ्या संख्येने जमूया. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आपल्याला तिथे मार्गदर्शन करतील. आपल्या निर्धार व्यक्त करण्यासाठी अवश्य या. इतरांनाही सांगा.
लढूया, जिंकूया!

उद्या मराठा क्रांती मोर्च्याचे राज्यव्यापी आंदोलन आहे. आपण सर्व त्यांच्यासोबत संपात आहोत. 

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य
(शिक्षक भारती ही शासन मान्यताप्रप्त शिक्षक संघटना सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचा घटक आहे.)  

Tuesday, 7 August 2018

संपाचा पहिला दिवस. संप सुरूच राहणार. संप मागे नाही.


नमस्कार, 
संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यपक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 

सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या संपाला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. मंत्रालयातील कर्मचारी ते जिल्हापरिषद कर्मचारी या सर्वांनी संपात सहभाग घेतला. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यपक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपात उतरल्याने संपाला अभूतपूर्व यश मिळाले. तुम्हा सर्वांचे अभिनंदन!

काल १४ महिन्यांची थकबाकी देण्याचा जीआर काढून, संप मागे घेतल्याची अफवा पसरवूनही संप यशस्वी होत असल्याचे पाहून आज संप मोडण्यासाठी संपकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची भाषा सरकारने केली. शिक्षण विभागाने संपात सहभागी झालेल्या शाळा/कॉलेजांची, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती मागविली. पगार कपात करण्याची ताकीद दिली. तरीही आपण सर्वजण निर्भयपणे संपात सहभागी होण्याचा जो निर्धार दाखवला त्याला सलाम!




राज्यातील सर्व जिल्ह्यातून शिक्षक भारतीच्या पदाधिकारी, सदस्यांनी संपात सहभाग घेतल्याचे शेकडो फोटो मला व्हाट्सअपवर पाठवले. चौकात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात केलेल्या आंदोलनाचे फोटोही मिळाले. मुंबईत तर परेलच्या कामगार मैदानात दुपार नंतर शेकडो शिक्षक, शिक्षकेतर जमा झाले.  हुतात्मा बाबू गेनूंच्या पुतळ्याला अभिवादन करुन शेकडो संपकरी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संपात महिलांची संख्या मोठी होती.

काल रात्री उशिरा संप सुरु ठेवण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थांपर्यंत शाळा/कॉलेज बंद असल्याचा निरोप पोहचू शकला नाही. त्यामुळे आज सकाळी काही शाळा/कॉलेजांमध्ये विद्यार्थी आल्याने शाळा/कॉलेज सुरु होते. आज संपात सहभागी असणाऱ्या शिक्षक भारती पदाधिकारी सदस्यांनी शाळा/कॉलेजमध्ये जाऊन सर्वांना संपात सहभागी होण्याची विनंती केली. त्या शाळा/कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि पालकांना ८ आणि ९ ऑगस्ट रोजी शाळा/कॉलेज बंद राहणार असल्याची सूचना देण्यात आली. आज सहभागी न झालेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर उद्यापासून मोठ्या संख्येने संपात सहभागी होणार आहेत.

बंधू, भगिनींनो, आपल्या संपामुळे शासनावरील दबाव वाढला आहे. संप मोडण्यासाठी उद्या आणखी काही अफवा पसरवल्या जाऊ शकतात. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. संप सुरूच आहे. तो तीन दिवस चालणार आहे. संपाबाबत झालेला निर्णय अधिकृतरित्या आपल्यापर्यंत आम्ही पोचवू.  

मुंबईतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ९ ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्नी रोड येथे दुपारी ३ वाजता जमूया. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मोठ्या संख्येने हजर राहून आपला निर्धार दाखवूया. 
लढूया, जिंकूया!

आपला, 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र