Tuesday 13 March 2018

घोळ समायोजनाचा


मुंबई जिल्ह्यात प्रत्येक विभागाची वेगळी सेवाज्येष्ठता यादी तयार करा

राज्यभर संचमान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरापासून दूर समायोजन झाल्यामुळे शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गैरसोयीच्या ठिकाणी समायोजन झाल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक हजर होऊ शकलेले नाहीत. समायोजन करत असताना  पती, पत्नी एकत्रीकरण, कौटुंबिक समस्या आणि घरापासूनचे अंतर याबाबतचा कोणताही विचार शासनाने केलेला दिसत नाही. समायोजन करताना संपूर्ण जिल्ह्याची एकच सेवाज्येष्ठता यादी तयार केल्याने अनेक ठिकाणी गैरसोयीचे समायोजन होत आहे. तसेच वर्षानुवर्ष वारंवार मागणी करुनही रिक्त पदे भरण्याची परवानगी न मिळाल्याने कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त शिक्षक आल्याने मोठा अन्याय होत आहे. ज्या संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास नकार दिला त्यांचे पद व्यपगत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक पाठवताना पूर्वीपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवेबाबत कोणताही विचार समायोजनात केलेला दिसून येत नाही.

ऑनलाईन संचमान्यता केल्यामुळे झालेल्या चुका आजतागायत दुरुस्त झालेल्या नाहीत. कितीतरी शाळांची पटसंख्येची माहिती चुकीची दिसत असल्याने शिक्षक विद्यार्थी संख्या असूनही अतिरिक्त दिसत आहेत. मागील तीन वर्षांपासून शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथे हेलपाटे मारुनही संचमान्यता दुरुस्त झालेल्या नाहीत. मुळातच शासनाने कोणत्याही प्रकारचा मास्टर प्लॅन अथवा पूर्ण तयारी न करता ऑनलाईन संचमान्यता करण्याचा केलेला प्रयत्न पूर्णपणे असफल ठरला आहे. ऑनलाईन संचमान्यता करण्यापूर्वी प्रयोगिक तत्वावर एका जिल्ह्यात ऑनलाईन प्रणाली राबवून नंतर राज्यभर तिचा वापर करायला हवा होता. पण तसे न झाल्याने तीन वर्षे झाली तरी ऑनलाईन संचमान्यता सुरळीतपणे होऊ शकलेली नाही. यावर्षी तर शैक्षणिक वर्ष संपायला एका महिना राहिला आहे, तरी संचमान्यता झालेली नाही. त्यामुळे ज्या शाळांमध्ये रिक्त पदे होती अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिवाय परीक्षा द्याव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या झालेल्या या प्रचंड नुकसानीला जबाबदार कोण?

ऑनलाईन संचमान्यता आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हा तर मोठा संशोधनाचा विषय ठरला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे नक्की समायोजन कसे होते? हे समजायला कोणताही मार्ग नाही. गेल्या दोन वर्षात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे जे कॅम्प झाले त्यामध्ये झालेला गोंधळ सर्वश्रुत आहेच.

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या कार्यपद्धतीचा एक अजब नमुना नुकत्याच समायोजन झालेल्या श्रीमती जयश्री ढोरे प्रकरणावरुन दिसून येतो. नागपूरच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुंबईच्या चेंबूर येथील शाळेतील सहा. शिक्षिका श्री. ढोरे यांचे ऑनलाईन समायोजन प्रक्रियेनुसार नागपूर येथे समायोजन करण्यात आले. मुंबईतील एक शिक्षिका आपल्या कुटुंबापासून, लहान मुलीपासून १२०० किलोमीटर दूर कशी काय जाऊ शकेल? याचा कोणताही विचार न करता शिक्षण विभागाने समायोजनाची ऑर्डर त्यांच्या हातात दिली. आमदार कपिल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात त्याबाबत शिक्षण मंत्र्यांना जाब विचारला. तेव्हा कुठे श्रीमती ढोरे यांच्या समायोजनाला स्थगिती मिळाली. वर्तमानपत्रातून आणि सोशल मिडियामधून झालेल्या जोरदार टीकेने शिक्षण विभाग मागे आला. पण बदल मात्र झालेला नाही.

मुंबई जिल्ह्यात प्रत्येक विभागाची वेगळी सेवाज्येष्ठता यादी तयार करा
राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबईतील स्थिती थोडी वेगळी आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतरांचे समायोजन करताना मुंबई विभागाची एकच सेवाज्येष्ठता यादी न ठेवता दक्षिण, उत्तर व पश्चिम या तिन्ही विभागांची वेगवेगळी सेवाज्येष्ठता यादी करावी, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

मुंबईत शहर आणि उपनगर जिल्हात शाळांची संख्या जास्त असल्याने शिक्षण विभागाने प्रशासकीय काम सोपे व्हावे यादृष्टीने दक्षिण, उत्तर व पश्चिम असे विभाजन केले आहे. प्रत्येक विभागाला स्वतंत्र शिक्षण निरीक्षक आणि इतर प्रशासकीय पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतू अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना संपूर्ण मुंबई शहर व उपनगर मिळून अतिरिक्त शिक्षकांची एकच सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार समायोजन करत असताना मुंबईतील एका विभागातील शिक्षकाचे दुसऱ्या विभागात समायोजन झालेले आहे. ते गैरसोयीचे आहे.

उदा. पश्चिम विभागातील बोरीवली येथील शाळेत काम करणाऱ्या शिक्षिकेचे सेवाज्येष्ठता यादीनुसार उत्तर विभागातील मानखुर्द येथील शाळेत समायोजन करण्यात आले आहे. सदर शिक्षिकेला मानखुर्द येथील सकाळी ७च्या शाळेत हजर होण्यासाठी बोरीवली ते दादर, दादर ते कुर्ला आणि नंतर कुर्ला ते मानखुर्द असा तीनवेळा ट्रेन बदलत प्रवास करावा लागतो. पहाटे ५वा घर सोडण्यापूर्वी ४ वाजल्यापासून तयारी करावी लागते. दोन तास प्रवास करुन प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन करत शाळेत हजर व्हावे लागते. दुपारी १.३० वाजता शाळा सुटल्यानंतर घरी पोचायला सध्यांकाळचे ४ वाजतात. मुंबईत वारंवार लोकल ट्रेनच्या समस्या निर्माण होत असतात. अशावेळी नेहमीच वेळेत पोचणे शक्य होत नाही. अशा मनस्थितीत काम करणाऱ्या शिक्षिकेला मुलांसमोर जाऊन आपल्या अध्यापन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व मनोरंजक ठेवणे कसे काय शक्य होईल?

मुंबईतील शिक्षकांचे समायोजन करताना दक्षिण, उत्तर व पश्चिम या प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगळी सेवाज्येष्ठता यादी तयार करणे आवश्यक आहे. त्यानुसार शिक्षकांचे समायोजन केल्यास शिक्षकाला त्याच्याच विभागातील शाळेत हजर होणे सहज शक्य होईल. त्याबाबत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी डॉ. सुनिल मगर, संचालक, बालभारती, पुणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जिल्हानिहाय स्वतंत्र यादी करण्याचे मान्य केले आहे. शिक्षक भारतीने याबाबत पत्रव्यवहारही केलेला आहे.

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

No comments:

Post a Comment