Thursday 9 November 2017

तारीख १४ नोव्हेंबर



शिक्षक बंधू, भगिनींनो,
मुंबै बँक विरुद्ध शिक्षक भारती या कोर्ट केसमध्ये शासन आणि मुंबै बँक काही शिक्षक मित्र हितशत्रूंच्या मदतीने खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षकांची परेशानी वाढवत आहेत. मुंबै बँकेला भ्रष्टाचार आणि आर्थिक डबघाईतून वाचवण्यासाठीच शिक्षकांचा बळी दिला जात आहे. लोकसत्ता सारख्या दैनिकाने हजारो कोटींचा घोटाळा नव्याने उघडकीला आणला आहे. त्यामुळे नाईलाजाने मुंबै बँकेत ज्यांना खाती उघडावी लागली आहेत, तेही खूप भयभीत आहेत. पण त्यांनी भिण्याचे कारण नाही, लवकरच त्या भीतीच्या खाईतून सहीसलामत आपण बाहेर पडणार आहोत. 

मुंबै बँकेविरोधातील आपली कोर्ट केस तारीख पुढे ढकलली जात आहे. आणखी एका संघटनेने दिलेला वकील फुटल्यामुळे कोर्टाने आपणाला दिवाळी नंतरची तारीख दिली. दरम्यानच्या काळात कोर्ट बदलले. ७ नोव्हेंबरला कोर्टात आपले वकील सचिन पुंडे यांनी कोर्टात जाऊन १४ नोव्हेंबरच्या सुनावणीची नोटीस प्रतिवादी पक्षांना सर्क्युलेट केली आहे. 

सरकारपक्षाचे आणि मुंबै बँकेचे वकील हजर नव्हते. त्यामुळे कोर्टाला पुढची तारीख द्यावी लागली. परंतु शिक्षक भारतीच्या अत्यंत अभ्यासू वकीलांनी कोर्टासमोर सद्य स्थिती मांडली. ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर पर्यंतचे पगार युनियन बँकेमार्फत केले जावेत या कोर्टाच्या आदेशाची आठवण करून दिली. पुढील पगार कसे होणार? असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी अंतिम निर्णय येईपर्यंत ज्यांचे युनियन बँकेत AC आहे त्यांना युनियन बँकेतूनच पगार मिळेल. 

सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक, बंधू, भगिनींनो, विनंती आहे की, आपली पगार बिलं वेळेवर डिपार्टमेंटला जमा करावीत. तरच आपल्याला वेळेत पगार मिळेल. 

१४ नोव्हेंबरलाच रात्रशाळेची केसही पुन्हा नव्याने उभी राहत आहे. रात्रशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला आहे हे सर्वश्रुत आहे. केवळ विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून रात्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील आपले बांधव बिन पगारी काम करत आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर रात्रशाळा बंद पडतील. दलित, गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद पडेल ही वस्तुस्थिती शिक्षक भारती आणि रात्रशाळेतील शिक्षकांनी वारंवार मा. शिक्षण मंत्र्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. प्रश्न पगाराचा नसून मुलांच्या शिक्षणाचा आहे हे सांगितले. पण दाद मिळाली नाही, न्याय मिळाला नाही. अपमान सहन करावा लागला. म्हणून पुन्हा एकदा न्याय संस्थेसमोर आपल्या रात्रशाळेची कैफियत आपण घेऊन गेलो आहोत. रात्रशाळा संस्थांच्या वतीने आप्पा कांबळे फिर्यादी असून अॅड. हणमंत वाक्षे कामकाज पाहत आहेत. 

यावेळी नक्कीच न्याय संस्था आपल्याला न्याय देईल हा विश्वास ठेवणं आवश्यक आहे. 

आपले तथाकथित शिक्षक मित्र हितशत्रू अफवा पिकवत राहतील. घातपात करत राहतील. पण त्यावर विश्वास ठेऊ नका.  आपले आमदार कपिल पाटील मैदानात ठामपणे उभे आहेत. ते कधीही तडजोड करत नाहीत, याचा अनुभव आपण घेतला आहे. राजयोग सोसायटीतला प्लॅट नाकारणारे ते एकमेव आमदार आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात जागा मिळण्याची शक्यता असूनही नीतीशकुमार यांना नम्रपणे नकार देणारे आपले आमदार आहेत. अन्यायी सरकारच्या विरोधात दोन हात करून ते विधीमंडळात लढत आहेत. तावडेंच्या दारात ऐन दिवाळीत काळा कंदील लावण्याची हिम्मत त्यांनीच दाखवली. 

आपणही आपली लढाई कोर्टात आणि रस्त्यावर लढत राहू. 
लढूया, जिंकूया!

आपला,
सुभाष किसन मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती