Saturday 20 June 2020

वर्क फॉर्म होमची परवानगी मिळाली

आमदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश!!!

मुंबईतील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 30 जून पर्यंत वर्क फॉर्म होम ची परवानगी देण्यात आली आहे. 

15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रत्यक्ष शाळेत  बोलवायचे अथवा नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.  शिक्षण विभागाकडून आदेश न आल्याने गोधंळ उडाला होता. 

अखेर आमदार कपिल पाटील यांनी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना फोन केला.  मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी शिक्षकांना बोलावू नये असे आदेश दिले.  मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी वर्क फॉर्म होम ची परवानगी दिली.  त्यानुसार 15 जून 2020 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. 
मुंबईतील शाळा, कनिष्ठ  महाविद्यालये, महाविद्यालयांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मा. आयुक्त, मुंबई मनपा यांना देण्यात आला आहे. 
15 जून 2020 च्या  शासन निर्णयानुसार मा. मनपा आयुक्तांनी मुंबईतील शाळाबाबत दोन आदेश दिले. 
1) क्रमांक : ईओजी/282, दिनांक 19/06/2020 बृहन्मुंबई महानगरपालिका - शिक्षण विभागाचे पत्र.
2) क्रमांक : एस. एस. ए. /2020-21/ओडी/63, दिनांक 18/06/2020 बृहन्मुंबई महानगरपालिका - शिक्षण विभागाचे पत्र.





मुंबईतील शाळांबाबत व शिक्षक, शिक्षकेतर यांच्या उपस्थितीबाबत मा. आयुक्त, मुंबई मनपा यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार मा. आयुक्त, मुंबई मनपा यांच्या सूचनेनुसार संदर्भ क्र. 1 व 2 ही पत्र निघाली आहेत. ही दोन्ही पत्रे शिक्षण उपसंचालक, मुंबई आणि शिक्षण निरीक्षक दक्षिण / उत्तर / पश्चिम यांना पाठवलेली आहेत. पत्रांचे पालन करणे त्यांना बंधनकारक आहे.

मा. आयुक्तांच्या पत्रानुसार खालील बाबी लक्षात येतात. 

1) मुंबईतील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळा (अनुदानित/विनाअनुदानित सर्व) 15 जून ते 30 जून पर्यंत बंद ठेवण्यात याव्यात. शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करावे.

2) सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा 15 जून ते 30 जून पर्यंतचा हा कालावधी कर्तव्यार्थ समजून तशा नोंदी मानव संसाधन प्रणाली / शालार्थ प्रणालीमध्ये नोंदवण्यात याव्यात. पगार बिले काढताना संबंधित बाबींकडे ट्रेझरीचे लक्ष वेधावे. उपस्थिती पत्र मागू नये.

3) पालकांना टप्याटप्प्याने बोलावून व सुरक्षित अंतर ठेवून शाळेत आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करावे. 

4)शिक्षकांनी विद्यार्थाचे WhatsApp group तयार करावेत. शाळा सुरु करण्याबाबत पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शैक्षणिक सुविधेनुसार  ई लरनिंग शिक्षकांनी घरात राहून ( WhatsApp, zoom app, Google meet, webinar, telegram, Twitter etc.) च्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवावे. 

5) कंटेंमेंट झोन मधील शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची कोणतीही  निश्चित तारीख ठरविण्यात आलेली नाही.  स्थानिक व बदलत्या परिस्थितीनुसार शाळा सुरु करण्यापूर्वी महानगरपालिका आयुक्त  कोविड 19 डिझासटर मॅनेजमेंटचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेतील. 

6) कोविड 19 या विषाणू च्या साथीच्या काळात अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू राहण्यासाठी  लर्निंग फ्रॉम होम संकल्पना शालेय शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.  यासाठी 28 एप्रिल  2020 शासन निर्णयाचे अवलोकन करावे. शिक्षकांना आपण शिकवत असलेल्या विषयांचे ई कंटेंट तयार करावेत. 

7) मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती ची बैठक घेऊन कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या विविध शासन निर्णय व सूचनांची माहिती घ्यावी.  शाळा सुरु करण्यापूर्वीचे नियोजन करावे. त्यात शाळेची व स्वच्छतागृहाची स्वच्छता,  शाळा सुरु केल्यानंतर घ्यावयाची दक्षता, विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये याचे नियोजन, शाळा कॉरंनटाईन सेंटर असल्यास निरजंतूकिकरण केल्याचे प्रमाणपत्र घेणे इत्यादी बाबींचा विचार करावा. शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती च्या मुख्य शिफारसी तसेच तज्ज्ञ व्यक्तींच्या शिफारशीनुसार शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण निरिक्षक कार्यालयामार्फत महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावा. (शाळा व्यवस्थापन समितीची बैठक सदस्यांना प्रत्यक्ष न बोलवता फोनवर/ऑनलाईन घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून शाळा सप्टेंबर पर्यंत सुरू करू नयेत अशी शिफारस मा. आयुक्त, मुंबई मनपा यांना करावी. खरं तर हा निर्णय आयुक्त स्तरावर व्हायला हवा, आमदार कपिल पाटील त्यासाठी प्रयत्नशील आहेत.)

मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो केवळ आपणच नव्हे तर संपूर्ण समाज कोविड 19 मुळे संकटात सापडला आहे.  हजारो मजूर, भटके,  गरीब त्रस्त झाले आहेत. या प्रसंगी आपण सर्व  खंबीर राहून, एकजुटीने मुकाबला करायचा आहे. आपल्या शाळेतील वातावरणात बिघडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.  शाळेच्या मुख्याध्यापकांवर मोठी जबाबदारी आहे.  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे गरज असेल तेव्हा एकमेकांना सहकार्य  केलं पाहिजे.

शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील सर्व  संस्थाचालक,  मुख्याध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सोबत आहेत. आपला हक्क आणि आपला सन्मान अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कटिबदध आहोत. 

काळजी घ्या ! सुरक्षित रहा!!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, 
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य