Tuesday 21 December 2021

मुंबई पुन्हा जिंकली

सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार!!!

सेकंडरी स्कूल्स एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. कुर्ला मुंबई या पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल काल लागला.सहकार पॅनलला अपेक्षित यश मिळवता आले नाही.विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन तयार करण्यात आलेल्या सहकार पॅनलला मुंबईत सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने भरघोस मतदान झाले. परंतु ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत सहकार पॅनलला आपला निर्धारनामा पोहोचवता आलेला नाही. मुंबईतील बोरीवली, जोगेश्वरी, दादर,कुर्ला, विक्रोळी, चेंबूर विभागात मतदारांचा कौल सहकार पॅनलच्या बाजूने राहिला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, ठाणे सानपाडा शाखेतील आणि बाहेरच्या इंदापूर, नारायणगाव,माणगाव शाखेत सहकार पॅनलला चांगले मतदान केले. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कराड, सोलापूर, पंढरपूर, पिंपरी चिंचवड ,पुणे, लोणावळा इत्यादी शाखांमध्ये विरोधकांना जवळपास सहा हजाराचे मताधिक्‍य मिळाले. मुंबईत झालेल्या 8000 मतदानापैकी जवळपास साडेपाच हजार मते सहकार पॅनलला मिळाली.परंतु ग्रामीण भागातील मताधिक्य पार करून विजय मिळवण्या इतपत मते मिळालेली नाहीत. सहकार पॅनल हा पराभव स्वीकारत असून विजयी झालेल्या संचालकांना पारदर्शी व स्वच्छ कारभार करण्यासाठी शुभेच्छा देत आहे. सहकार पॅनलच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचा जाहीर केलेला निर्धारनामा पूर्ण करण्याची जबाबदारी विजयी संचालकांनी घ्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे.

मुंबईत समता पॅनलला काही संघटनांच्या नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. विविध शाळातील काही गट समता पॅनलच्या सोबत असल्याचे चित्र समोर आले. या सर्व नेत्यांना आणि समता पॅनलच्या हितचिंतकांना सेकंडरी पतपेढीचा कारभार सभासदांच्या हितासाठी आणि पतपेढीच्या विकासासाठी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यातील सभासदांची अर्थवाहिनी असलेली ही सेकंडरी पतपेढी सभासदांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करेल अशी मी आशा बाळगतो.

सेकंडरी पतपेढीच्या निवडणुकीत शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी,सदस्यांनी आणि आम्हा सर्व उमेदवारांच्या हितचिंतकांनी जिवाचे रान केले. रात्रीचा दिवस केला. कशाचीही अपेक्षा न करता स्वतःचा वेळ खर्च करून,पदरमोड करून जी मेहनत केली त्यामुळेच सहकार पँनलला भरघोस मते मिळाली. या माझ्या सर्व बंधू-भगिनींना मी त्रिवार अभिवादन करतो.

पाकीटे घेऊन, कसलीतरी आश्वासने घेऊन काम करणारे अनेक जण आपल्याला भेटतात, दिसतात पण निस्वार्थपणे आपले सहकारी निवडून यावेत म्हणून लढणारे, झटणारे कार्यकर्ते आम्हाला मिळाले हीच आमची आयुष्यभराची कमाई आहे. रात्री निकालाला उशीर होत होता. अनेकांना आपण घरी जावे अशी मी विनंती केली. पण आपण आम्हाला सोडून जायला तयार नव्हतात. सहकार पॅनलच्या पराभवाच्या दुःखापेक्षा माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून मला तीव्र वेदना झाल्या.आपण त्यांची इच्छा पूर्ण न करू शकल्याचे शल्य कायम टोचत राहणार आहे. मी आपल्या सर्वांचे आभार मानणार नाही तर आयुष्यभर आपल्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करेन. संघटनेच्या माध्यमातून अथवा वैयक्तिकरीत्या आपल्या सर्वांना कधीही गरज असल्यास एक आवाज द्या आम्ही सर्वजण आपल्या सोबत राहू. माझ्या आयुष्यात आपल्या सर्वांचे स्थान काय आहे हे मी शब्दात सांगू शकणार नाही पण नेहमी आपल्या सहकार्यासमोर नतमस्तक राहण्याचा मी प्रयत्न करेन. तुमची जिद्द, चिकाटी आणि लढण्याची हिम्मत मला भविष्यातील अनेक संघर्षासाठी सातत्याने प्रेरणादायी ठरेल.

आपल्या सर्वांना सलाम!

आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष शिक्षक भारती,
महाराष्ट्र राज्य