Wednesday, 30 April 2025

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कसे होणार?



मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांनी मुंबई बाहेर होणाऱ्या समायोजनास नकार कळवूनही आज दिवसभर शिक्षण विभागातर्फे मुंबई बाहेर समायोजन झाल्याच्या ऑर्डर्स दिल्या जात आहेत. जे शिक्षक ऑर्डर स्वीकारणार नाहीत त्यांचे पुढील महिन्याचे वेतन काढू नये असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत.

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबई बाहेर होत असल्याने सर्व शिक्षक चिंताग्रस्त आहेत. महिला शिक्षकांसमोर तर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईत सुमारे ५३० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मुंबईत त्यांचे समायोजन होऊ शकलेले नाही. आता त्यांना पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात समायोजनाने जावे लागणार आहे. मुंबईतील नोकरी, घर, मुलांच्या शाळा या सर्वांपासून दूर गावी जाऊन रहायचे कुठे ? सगळा संसार कोणाच्या भरवशावर सोडून जायचे ? अनेकांच्या घरी वृद्ध आई - वडील आहेत. त्यांचा दवाखाना, औषधोपचार कसा होणार? मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी लांबून कशी पेलणार? असे अनेक प्रश्न समोर उभे आहेत.

मुंबईतील मराठी शाळांमधील मुलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. इंग्रजी माध्यमात मुलांना पाठवण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. पालकांचा सीबीएससी, आयसीएससी आणि आयबी शाळांकडे ओढा वाढतो आहे. गरीबातील गरीब पालकाला आपल्या मुलाला आणि मुलीला चांगले व दर्जेदार शिक्षण द्यायचे आहे. त्यासाठी कोणतीही किंमत द्यायला पालक तयार आहेत. अशावेळी काही शाळांचा अपवाद सोडला तर बहुतांश मराठी शाळांचा दर्जा आज ढासळताना दिसतो आहे. शासनाचे उदासिन शैक्षणिक धोरण आणि अनुदानित व्यवस्था बंद करण्याची कुटनिती हे त्यामागचे एक महत्वाचे कारण आहे. समाजाप्रती असलेले प्रेम आणि सेवाभावी वृत्तीने ज्या संस्थांनी उदात्त ध्येयाने शाळा सुरु केल्या होत्या त्यांना या शाळा म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. न मिळणारे वेतनेतर अनुदान, वाढलेले वीज बील व पाणी बील यामुळे शैक्षणिक संस्था तोटयात आहेत. एस.एस.सी. बोर्डाच्या मराठी शाळांमध्ये पालक मुलांना पाठवायला तयार नाहीत. मुुंबईतील बहुतेक सर्व मोठ्या शाळांनी मराठी शाळांच्या इमारती इंग्रजी माध्यमांची सुरु केलेली शाळा आता मोठी झाली आहे. त्याच इमारतीत भरणारी मराठी शाळा एका कोपऱ्यात बंद पडण्याची वाट पाहत आहे. फी मिळणारी शाळा चालवण्याचा निर्णय अनेक संस्थाचालकांनी आज घेतला आहे,म्हणून मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

मागील १५ वर्षांपासून महाराष्ट्रात मराठी शाळांच्या संवंर्धनासाठी शासकीय स्तरावर ठोस धोरण तयार करणे आवश्यक होते. परंतु तसे न होता मराठी शाळांची गळचेपी करण्यात आली. विनाअनुदान, कायम विनाअनुदान, अंशतः अनुदान, शिक्षण सेवक अशा अनेक घातक योजनांद्वारे जाणीवपूर्वक अनुदानित शाळांची प्रतिमा मलिन करण्यात आली. मागील चार वर्षात तर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांना ऑनलाईनची कामे, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक, शाळा बाह्य मुले, पोषण आहाराचा हिशोब, जनगणना, बीएलओ ड्युटी, बेसलाईन टेस्ट, संकलित चाचणी आणि रोज नव्याने येणारे शासन निर्णय यामध्ये इतके गुरफटले की शाळेतील विद्यार्थी आणि त्यांची गुणवत्ता याकडे दुर्लक्ष होत गेले. विविध संस्थांचे सर्वेक्षण अहवालातून महाराष्ट्रातील मुले सर्व स्तरावर कशी मागे पडत आहेत याचे चित्र समोर मांडण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकावण्यात आले. रोज एक नवा जीआर यामुळे शाळांचं वार्षिक नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाने तर विद्यार्थी असूनही शिक्षकांना बाहेर काढण्याचं काम केलं. तीन भाषांना एक शिक्षक, गणित, विज्ञानाला एक शिक्षक आणि समाजशास्त्राला एक शिक्षक असा नवा पॅटर्न आणला. त्यामुळे अनेक शिक्षक बाहेर फेकले गेले. मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्याच उरली नाही असे नाही. तर शासनाने मागच्या दाराने आणलेले जीआर शिक्षकांना अतिरिक्त करत आहेत.

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सोडवण्याची शासनाची भूमिका नाही. अतिरिक्त शिक्षक आणि समायोजन याचा सकारात्मक विचार करुन मार्ग काढण्याची वृत्ती दिसून येत नाही. याउलट अतिरिक्त शिक्षक म्हणजे गुन्हेगारच या भावनेने त्यांना त्यांच्या जिल्ह्यातून बाहेर काढायचं, परेशान करायचं धोरण शासनाने आखल्याचे दिसत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सर्व शिक्षकांचे त्यांच्या जिल्ह्यातच समायोजन करता येईल. त्यासाठी शिक्षक भारती संघटनेने काही सूचना केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे -

महत्वाच्या सूचना -

१. आरटीई आणि १९८१ च्या कर्मचारी सेवाशर्ती नियमावलीनुसार प्रत्येक शाळेतील किमान शिक्षक संच निर्धारित करणे आवश्यक आहे. इ. ९वी, १०वीच्या गटासाठी ६ शिक्षक (मराठी १, हिंदी १, इंग्रजी १, गणित १, विज्ञान १, समाजशास्त्र १) तर इ. ६वी ते ८वीच्या गटासाठी ८ शिक्षक (मराठी १, हिंदी १, इंग्रजी १, गणित १, विज्ञान १, समाजशास्त्र १, शा.शि. १, कलाशिक्षक १) आणि इ. ५ वीच्या गटासाठी १ शिक्षक याप्रमाणे इ. ५वी ते १० वी पर्यंतच्या शाळेसाठी किमान १५ शिक्षकांचा संच लागतो. मात्र वर्कलोड विभागणी आणि तुकडीमागे दीड शिक्षक याप्रमाण ही संख्या ११ पर्यंत आणता येईल. तरी कृपया सर्व माध्यमिक शाळांमध्ये किमान ११ (१० अधिक १) शिक्षकांचा संच मंजूर करण्यात यावा.

२. पूर्वी कला-क्रीडा शिक्षकांना संचमान्यतेत 'विशेष शिक्षक' म्हणून वेगळे स्थान होते. नव्या संचमान्यतेच्या निकषात 'विशेष शिक्षक' देण्यात येत नाही. कला-क्रीडा शिक्षकांची विषय शिक्षकांमध्ये गणना केली जाते. परिणामी विषय शिक्षकांचे पद कमी होते. संचमान्यतेतून कला-क्रीडा शिक्षक वेगळे दाखवल्यास विषय शिक्षकांना जागा उपलब्ध होतील तर कला, क्रीडा शिक्षकांना स्पेशल टीचर म्हणून संरक्षण द्यावेच लागेल.

३. संचमान्यतेत विद्यार्थी संख्येला वर्गखोलीची अट घालण्यात आली आहे. वर्गखोली उपलब्ध नसल्याने अनेक शाळांना विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक उपलब्ध होत नाहीत.

इ. ५वी च्या गटातील डी.एड. शिक्षकांची संख्या जास्त आहे. खाजगी प्रथमिक शाळेतील विद्यार्थी संख्येसाठी वर्गखोलीची अट शिथिल केल्यास वाढीव शिक्षक पदांची संख्या वाढेल. मुंबईत दुबार अधिवेशनात भरणाऱ्या शाळांची संख्या जास्त आहे. वर्गखोलीची अट असल्याने वाढीव शिक्षक पद मिळत नाही. तरी कृपया अट शिथिल करावी.

४. संचमान्यता ऑनलाईन होत असल्याने विद्यार्थी संख्या वाढली तरी वाढीव शिक्षक मिळवण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेची वाट पहावी लागते. तात्काळ शिक्षक पद मिळत नाही.

५. मुंबईतील अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली तरी वाढीव शिक्षक पद मिळत नाही. अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वाढीव पद मंजूर केल्यास अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करता येऊ शकते.

६. इंग्रजी माध्यमांमध्ये रिक्त पदांची संख्या मोठी आहे. विषयांची गरज व शिक्षकांची गुणवत्ता तपासून काही शिक्षकांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये समायोजन करता येईल.

७. मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांमधून शैक्षणिक पात्रता असणाऱ्या शिक्षकांचे समायोजन ज्यु. कॉलेजमधील रिक्त पदांवर होऊ शकते.

८. सन २०२४-२५ ची संचमान्यता तपासल्यास रिक्त पदांची खरी आकडेवारी समोर येईल.

उपरोक्त सूचनांचा सकारात्मक विचार केल्यास समायोजनाचा मार्ग निघेल. महिला शिक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही.

अनेक अतिरिक्त शिक्षकांचे वय पन्नाशीच्या जवळपास आहे. काहींना तर निवृत्त होण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी उरला आहे. मागील काही वर्षांपासून संचमान्यता करताना व अतिरिक्त शिक्षक ठरवताना अनेकांवर अन्याय झाल्याचे दिसून येते. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या आक्षेपांचा अभ्यास करुन त्यावर तोडगा काढणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे संचमान्यता आणि समायोजनाबाबत शिक्षकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. एकूणच समायोजनाची प्रक्रिया तापदायी बनली आहे. त्यामुळे शिक्षकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ धोक्यात आले आहे. आपल्या जिल्ह्याबाहेर, कुटुंबापासून दूर तासंतास प्रवास करुन समायोजनाने पाठवलेल्या शिक्षकांकडून अध्यापनाचे काम कसे होऊ शकेल हा ही मोठा प्रश्न आहे.

संचमान्यता आणि अतिरिक्त शिक्षक यांचे अनेक आक्षेप शिक्षक भारतीकडे आले आहेत. ते पुढीलप्रमाणे -

# सन २०२०-२१ पासून संचमान्यता झाल्यानंतर एकदाही संचमान्यता वेळेवर देण्यात आलेली नाही.

# संचमान्यतेत दुरुस्तीबाबतच्या तक्रारीचे निराकरण झालेले नाही.

# शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता ठरविण्याबाबतच्या निकषात स्पष्टता नाही. त्यामुळे शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक ठरविण्यात अनेक अडचणी येतात.

# नियुक्ती दिनांक, विषय, रोस्टर इ. मुद्यांचा विचार करुन अतिरिक्त ठरविण्याचे स्पष्ट नियम नाहीत.

# अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या आक्षेपावर सुनावणी घेण्यात आलेली नाही. अथवा काही प्रकरणात सुनावणी घेतली पण लेखी निर्णय देण्यात आलेला नाही.

# अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांच्या यादीत सतत बदल होत गेला आहे.

# अतिरिक्त शिक्षकांची यादी सदोष असून त्यात नियुक्त दिनांक, शै. पात्रता तसेच वेगवेगळ्या गटात समावेश केल्याच्या अनेक चुका आहेत.

# रात्रशाळेत पाठविलेल्या शिक्षकांना अतिरिक्त यादीत न घेतल्याने त्यांना समायोजनात सहभागी होता आलेले नाही.

# शाळांमधील रिक्त पदांची माहिती देताना काही शाळांमधील रिक्त पदे लपविण्यात आल्याचे दिसते.

# अतिरिक्त ठरविताना सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला आहे.

# मुंबईतील शिक्षकांचे समायोजन करताना उत्तर, दक्षिण व पश्चिम विभागांचे एकत्र समायोजन झाल्याने अनेक शिक्षकांवर दुरवरच्या दुसऱ्या विभागात समायोजनाने जावे लागले.

अतिरिक्त शिक्षकांचा आकडा मोठा आहे. भविष्यात तो वाढतच जाणार आहे. पण शिक्षकांना विश्वास देऊन त्यांना संरक्षण दिल्यास हे शिक्षक आजही आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. शिक्षक भारतीने शासन दरबारी शिक्षकांच्या समस्या, आक्षेप आणि त्यावरील उपाय पाठवले आहेत. आता जबाबदारी शासनाची आहे.

२०१५ साली तत्कालीन शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी भांडूप येथील मुंबई बाहेर होणारे समायोजन थांबवले होते. सर्व अतिरिक्त महिला शिक्षकांनी एकजुटीने आवाज उठवल्यानंतर समायोजन बंद करून मुंबई बाहेरील समायोजनास विरोध केला होता. समायोजनाच्या ठिकाणी आमदार कपिल पाटील स्वतः उपस्थित होते. त्यांनी तेथून तत्कालीन शिक्षण आयुक्त यांच्याशी फोनवर बोलून जबरदस्तीने समायोजन होणारी प्रक्रिया थांबवली होती. त्यानंतर जे समायोजन थांबले ते आजपर्यंत. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. वैयक्तिक स्वार्थापोटी आणि पैशाच्या आमिषाला बळी पडून मतदान झाल्याने शिक्षक संघटनांचा लढवय्या प्रतिनिधी आज सभागृहात नाही.

मुंबईतील शिक्षकांचे मुंबईबाहेर समायोजन होऊ दिले जाणार नाही या एका मागणीला घेऊन सर्व संघटनांची एकजूट होणे आवश्यक आहे. सर्व पक्ष, वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. केवळ पत्र देऊन किंवा व्हाट्सअप वर मेसेज फिरवून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.

१ मे २०२५ ला शिक्षक भारती संघटनेची बैठक
शिक्षक भारती कार्यालय, ग्लोब मिल पॅसेज महानगरपालिका शाळा, पांडुरंग बुधकर मार्ग, दीपक टॉकीज जवळ, परेल या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता शिक्षक भारती संघटना अतिरिक्त शिक्षकांची बैठक घेणार आहे. मुंबईतील शिक्षकांचे समायोजन मुंबई बाहेर होऊ नये यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. सदर बैठकीत मा आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सर्व अतिरिक्त शिक्षकांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहूया!

लढूया जिंकूया

आपला स्नेहांकित,

सुभाष सावित्री किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य



Wednesday, 16 April 2025

शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्यासोबत संघटनांची बैठक संपन्न




मंगळवारी (दि. १५ एप्रिल २०२५) शिक्षक संघटनासोबत झालेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा केली.
१. अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणे.
२. शाळा स्तरावरील १५ समित्या रद्द करून ४ समित्यांमध्ये कार्यान्वित ठेवणे.
३. ऑनलाईन कामकाज कमी करणे.
४. विविध योजनांमधून शाळांचा पायाभूत विकास करणे.
४. संचमान्यता निकष शासन निर्णयात बदल करणे ..१५/०३/२०२४ संच मान्यता निकष शासन आदेश निकष दुरुस्ती करणे बाबत.

या विषयांवर मा. शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांनी विविध संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. शिक्षण विभाग करत असलेल्या विविध कामांची माहिती दिली.

सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे विचार व समस्या ऐकून घेतल्या व त्यावर अधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्या संदर्भात आदेश दिले.


शिक्षक भारती संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी खालील मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

1) सीबीएससी प्रमाणे अभ्यासक्रम बदल करण्याच्या निर्णयाचे शिक्षक भारती स्वागत करत आहे. परंतु बदल करताना महाराष्ट्र राज्याचा प्रेरणादायी इतिहास, भौगोलिक अभ्यास आणि मराठी भाषा यांचे स्थान महत्त्वाचे असावे. दहावी व बारावी बोर्डाचे सक्षमीकरण करण्यासाठी भर द्यावा.

शिक्षणमंत्र्यांचे उत्तर
सीबीएससी अभ्यासक्रम बदल पुढील वर्षी फक्त इयत्ता पहिलीपासून करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होईल. तसेच टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांसाठी अभ्यासक्रम बदलणार. बदल करताना दहावी व बारावीचे बोर्ड रद्द होणार नाही. आपले दहावी व बारावी बोर्ड सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार. मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा इतिहास अधिक प्रभावीपणे शिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार.

2) 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक आणि विशेष शिक्षक मंजूर करावेत. रात्रशाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यालयासाठी संच मान्यतेचे वेगळे निकष निर्धारित करावेत. वय जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना संचमान्यतेत ग्राह्य धरावे. संचमान्यता दुरूस्तीचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत.

शिक्षणमंत्र्यांचे उत्तर
संच मान्यता दुरुस्तीचे सर्व प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यात येत आहेत. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर वर्गखोलीची अट शिथिल करण्यात येईल. तसेच ज्या शाळा दोन सत्रात भरतात त्या ठिकाणी वर्गांची संख्या दुबार मोजण्यात येईल असेही सांगण्यात आले. संचमान्यता निकषाच्या शासन निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर प्रश्नांच्या संदर्भात मा. शिक्षण आयुक्त यांनी युद्ध पातळीवर काम सुरू असून एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या आश्वासन दिले.

3) अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण वर्षभराचे उपक्रमांचे व परीक्षेचे नियोजन देण्यात यावे.मध्येच बदल करू नये.

शिक्षणमंत्र्यांचे उत्तर
शिक्षण विभागाकडून माहिती मागवली जात असल्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की यापुढे कोणतीही माहिती तातडीने मागवली जाणार नाही. तसेच ही माहिती भरण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सर्व सभा शनिवारी घेण्यात येतील. तसेच माहिती भरण्यासाठी सुद्धा आठवडाभराचा वेळ दिला जाईल. शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाऊ नये यासाठी विविध खात्यांशी समन्वय करून शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय काम देण्यात येणार नाही. शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी वर्षभराचे एकत्रित वेळापत्रक दिले जाईल. विविध उपक्रम राबवण्याबाबत सविस्तर नियोजन दिले जाईल. तसेच शाळांना कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी स्वातंत्र्य दिले जाईल. शाळांमधील विविध समित्या कमी करून त्यांची संख्या केवळ चार वर आणण्याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे.

शिक्षण निरीक्षक शाळा भेटी होणार
महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये मराठी व गणित या विषयाच्या पायाभूत क्षमता विकसित झाल्याचे दिसून येत नाही. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत केवळ माहिती भरली जाते. पण त्याचे मूल्यमापन होत नाही. यासाठी यापुढे शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत केवळ कागदपत्रे तपासणीसाठी शाळा भेटी होणार नाही. तर प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद करण्यावर भर दिला जाईल. शाळा भेटीच्या माध्यमातून केवळ त्रास देण्याचा उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाईल. संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांना शाळांच्या बाबतीत कोणतीही प्रश्न अथवा समस्या असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन माननीय शिक्षण मंत्र्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या आणि गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांना कोणतीही दया दाखवणार नाही असेही ठणकावून सांगितले.


या बैठकीसाठी शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे आणि प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष नवनाथ गेंड उपस्थित होते. तसेच सदर चर्चेत शिक्षण आयुक्त मा. सचिंद्र प्रताप सिंह, SCERT चे संचालक मा. राहुल रेखावार, उपसचिव मा. समीर सावंत, उपसचिव मा. तुषार महाजन, प्राथमिक शिक्षण संचालक मा. शरद गोसावी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.


Wednesday, 22 January 2025

केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाची स्थापना झाली!

केंद्र शासनाचे आभार!

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्याची समन्वय समितीची मागणी



राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिनांक 16.01.2025 रोजी केंद्र शासनाकडून आठवा वेतन आयोग स्थापना करण्यात आल्याबद्दल केंद्र सरकारचे मन : पुर्वक आभार मानले आहेत.

तर राज्य शासनाने येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव घरभाडे भत्ता मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रथेनुसार 10 वर्षानंतर आठवा वेतन आयोग स्थापनेची घोषणा करुन शिक्षक संघटना समन्वय समितीच्या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

सततच्या वाढत्या महागाईचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास , दर 05 वर्षांनी वेतनमानाचा पुनर्विचार करणे तर्कसंगत व न्याय संगत ठरते. देशातील चार राज्यांत तेथील कर्मचाऱ्यांच्या वेतनमानाचा विचार प्रत्येक 05 वर्षांच्या कालावधीनंतर केला जातो. तसा विचार महाराष्ट्रांतील प्रगतीशील सरकारने केला पाहिजे.

शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुलै 2024 पासून अनुज्ञेय असलेला 03 टक्के महागाई भत्ता अद्याप दिलेला नाही. सदर महागाई भत्तावाढ मंजूर केल्यास एकुण दरमहा महागाई भत्ता 53 टक्के होणार आहे .त्यामुळे सातवा वेतन आयेागातील शिफारशींच्या तरतुदीनुसार , सध्याच्या घरभाडे भत्यात वाढ होणे आवश्यक आहे. सततच्या भाव वाढीमुळे प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलैमध्ये होणारी महागाई भत्तावाढ देणे राज्य शासनाची बांधील जबाबदारी आहे. यामुळे त्यादृष्टीने राज्यकोषात आगाऊ आर्थिक तरतुद करणे शासन कर्त्यांचा धोरण विषयक भाग आहे . तसेच राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च हा विकास कार्यासाठी राबणाऱ्या यंत्रणेवर होणारा खर्च आहे. त्यामुळे शासनांस हा खर्च करणे अनिवार्य आहे. दरवेळी महागाई भत्ता वाढ मागणी करण्याची गरज पडता कामा नये.

दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन टक्के महागाई भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. 
परंतु शासनाने ती मंजूर न केल्याने त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणे आवश्यक आहे. गरज भासल्यास आंदोलनाची तयारी करावी लागेल.

सुभाष सावित्री किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती
सदस्य, पेन्शन सूकाणू समिती