Wednesday 2 November 2016

आता पगारही काढून घेणार का?


प्रति,
मा. आमदार श्री. रामनाथ मोते
मा. श्री. शिवनाथ दराडे
मा. श्री. अनिल बोरनारे
(शिक्षक परिषद)


सप्रेम नमस्कार.
'आम्हाला युनियन बँक नको', असा व्हॉट्‌सअप मेसेज सध्या आपल्या मार्फत फिरवला जात आहे. युनियन बँकेकडून मुंबईच्या शिक्षकांचे पगार काढून घ्या, असा उघड प्रचार तुमच्या शिक्षक परिषदेने प्रथमच सुरु केला आहे. ५० वर्षात शिक्षकांचा पगार कधी वेळेवर होत नव्हता. विधान परिषदेत तुमचे तीन- तीन आमदार असायचे. हा साधा प्रश्न कधी सोडवला नाहीत. 

पगार वेळेवर आला नाही तर कर्जाचा हप्ता चुकायचा, दंड बसायचा. गेली ५ वर्षे मुंबईत 'फर्स्ट वर्किंग डे'ला पगार होतो आहे. आमचा हा पगारही आता तुम्हाला काढून घ्यायचा आहे काय?

औरंगाबादला शिक्षकांवर लाठ्या चालवल्यात. हजारो शिक्षकांना सरप्लस करता आहात. रात्रशाळा बंद पाडता आहात. शिक्षक, मुख्याध्यापकांना धमक्या देता आहात. आता वेळेवरचा पगारही बंद करणार काय?

केवळ मुंबईत युनियन बँकेमार्फत मागील पाच वर्षापासून एक तारखेला नियमित पगार होत आहेत. १९२० साली महात्मा गांधींच्या हस्ते स्थापन झालेली युनियन बँक राष्ट्रीयकृत बँक आहे. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे हे यश तुमच्या डोळयात खुपत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच शिक्षकांचा पागार १ तारखेला झाला पाहिजे, या मागणीचा पाठपुरावा अशोक बेलसरे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती करत आहे. ती मागणी राहिली दूर. तुमचं भाजपचं राज्य आल्यापासून शिक्षकांचा छळ सुरु झाला आहे. तुम्ही हे का करता आहात?

चांगल्या गोष्टी कुणी केल्या की आडवं यायचं, असं का करता? शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना आम्ही सादर केली, दोन वर्षे झाली तुमचं सरकार आहे. काही केलं नाही, उलट तुम्ही विमा छत्र योजनेची शिफारस केली आहे. म्हणजे आमच्या पैशावर खाजगी इन्शुरन्सकडे आमची हेल्थ सोपवणार का? शिल्ल्लक रजा कॅश करण्याची योजना बेलसरे सरांनी सुचवली होती. आमदार कपिल पाटील यांनी ती मान्य करून आणली. तर तुम्हीच मोडता घातला. म्हणे शिक्षकांना खूप रजा असतात. अहो आम्ही रजेतही काम करतो. 

प्लॅनचे पगार कधी वेळेवर होत नाहीत. कारण तुमचं सरकार तरतूद वेळेवर करत नाही. नॉन प्लॅन मध्ये टाकण्यासाठी शिक्षण खात्याचा प्रस्ताव अजून आलेला नाही, असे वित्त विभाग म्हणतं. विनाअनुदानित शिक्षकांना फक्त २०% पगार. तोही अजून दिला नाही. किती वाट पाहणार?

आता आमचे पगार पुन्हा जिल्हा बँकेकडे तुम्हाला न्यायचे आहेत. पण बीड, बुलढाणा, नागपूरची बँक बुडाली. शिक्षकांच्या ठेवी बुडाल्या. अजून मिळाल्या नाहीत. आमच्या ठेवींवर आणि पगारांवर तुमचा डोळा का? हेच का तुमचे अच्छे दिन?

आपला,


सुभाष किसन मोरे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य.
subhashmore2009@gmail.com

5 comments:

  1. ह्या मंडळींचे हे
    सर्व उद्योग प्रसिद्धीसाठी चालले आहेत.
    जिल्हा बॅंकेत पगार घेऊन यांचे सहकार क्षेत्रातील
    उपद्व्याप वाढवायचे असतील.

    ReplyDelete
  2. छान चपराक लगावलीत । पण हे कोडगे बनलेले आहेत । शिक्षकांना त्रास देण्यातच यांची मर्दुमकी ।

    ReplyDelete