Tuesday 22 January 2019

९ फेब्रुवारीचा मोर्चा कशासाठी?


प्रति,
मा. संस्थाचालक / मुख्याध्यापक / शिक्षक, शिक्षकेतर बंधु भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसरा शनिवार आपण सर्वजण 'संघटना दिन' म्हणून साजरा करतो. आपल्या सुट्टयांमधील एक दिवस आपण त्यासाठीच राखून ठेवलेला असतो. त्यादिवशी मुलांना सुट्टी असते. आपण सर्व सहकाऱ्यांसोबत कधी नाटक पाहून तर कधी सिनेमा, संगीत काव्य मैफील आयोजित करुन हा दिवस उत्साहाने साजरा करतो. शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून आपला हा स्नेहसोहळा सुरु आहे. यादिवशी आपण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि आपल्यातील विशेष प्रविण्य मिळवणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करतो. शैक्षणिक चर्चासत्र घेतो. शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धेय्य धोरणांना विरोध करण्यासाठी ठराव करतो. 

पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. आपले शेकडो भगिनी आणि बांधव अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत. मुंबईत जागा रिक्त नाहीत हे कारण देऊन त्यांना आपल्या कुटुंबापासून, शाळेपासून दूर पाठवण्याचा शासनाने घाट घातला आहे. वर्षानुवर्षे आपल्या शाळेत सेवा केल्यानंतर आता आपल्या भगिनींना आणि बांधवांना बाहेर जावे लागू नये म्हणून शिक्षक भारतीने लढा उभा केला आहे. सर्व अतिरिक्त शिक्षक एकजुटीने या लढ्यात उतरले आहेत. त्यांना मुंबईत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण हे थांबवू शकलो नाही तर उद्या आपल्यावर हीच वेळ येणार आहे. सर्व अतिरिक्त बंधू भगिनींनी आपला नकार ठामपणे शासनाला कळवला आहे. २८ ऑगस्ट २०१५ आणि ७ ऑक्टोबर २०१५ या दोन शासन निर्णयांनी आपल्याला बेकायदेशीरपणे अतिरिक्त ठरवले आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये असंतोष पसरला आहे. अशावेळी सोहळा करणं पटत नाही. 

२ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत. ३ वर्षांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करुन नुकतेच हे बांधव पूर्ण पगारावर आले आहेत. भविष्याची अनेक स्वप्न त्यांनी उराशी बाळगली आहेत. अशात कोणतीही चूक नसताना त्यांच्या मान्यता रद्द केल्या आहेत. त्यांच्या घरात दुःखाचं वातावरण आहे. 

१ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग मिळणार या आशेवर आपण सर्वजण होतो. परंतु तेही शक्य झालेले नाही. त्याबाबतचे कोणतेही पत्रक शासनाने काढलेले नाही. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळण्याची मागणी शिक्षक भारतीने केपी बक्षी समितीसमोर केली होती. त्याचे काय झाले, हे अद्यापी समजू शकलेले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. 

दररोज निघणारा एक नवा जीआर शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळ निर्माण करत आहे. शाळाशाळांमध्ये डी.एड. विरुद्ध बी.एड. भांडण सुरु झाले आहे. सेवाज्येष्ठतेचा वाद विकोपाला गेला आहे. याचा फायदा शासनाने घेतला. यापुढे कोणालाही मुख्याध्यापक पदावर मान्यता न देता केवळ प्रभारी मान्यता देण्याचा जीआरच काढला आहे. त्यामुळे आपल्या अनेक बांधवांना मुख्याध्यापक पदाचा पगार मिळणार नाही. 

गेल्या १ वर्षापासून ऑनलाईन पगार प्रणाली बंद झाली आहे. नव्याने मान्यता मिळालेल्या शिक्षकाचे नाव शालार्थ आयडीमध्ये समाविष्ट न झाल्याने असे अनेक शिक्षक, शिक्षकेतर बांधव २ ते ३ वर्षांपासून पगारापासून वंचित आहेत. 

गेल्या वर्षात आपण शासनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढून आपला पगार पुन्हा एकदा युनियन बँकेत आणू शकलो, हीच काय ती समाधानाची बाब आहे. 

शासन दरबारी प्रलंबित ठेवलेली सावित्री-फातिमा कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजना मंजूर न झाल्याने अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चापोटी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यांच्या वैद्यकीय परिपूर्तीची बिलं डिपार्टमेंटला पडून आहेत. आमचे एक सहकारी श्री. अर्जुन चौगुले सर काही महिन्यांपूर्वी रेल्वे अपघातात थोडक्यात बचावले. लाखो रुपयांचा खर्च झाला. शिक्षक भारतीच्या सर्व शिलेदारांनी एकत्रित येऊन आर्थिक ताकद उभी केली. सरांच्याही खिशातून लाखो रुपये खर्च झाला आहे. कॅशलेस योजना असती तर चौगुले सरांसारख्या अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झाला असता. चौगुले सर प्रचंड इच्छाशक्ती आणि हिमतीच्या बळावर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. परंतु पुढील खर्च कसा करायचा याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 

जुनी पेन्शन योजना सुरु करा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभं राहिलं आहे. शिक्षक भारतीने १६ जिल्ह्यांमध्ये मेळावे घेऊन जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रान पेटवले आहे. पण सरकार उदासिन आहे. ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत मला शैक्षणिक प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी जुन्या पेन्शनच्या मागणी संदर्भात विशेष समिती स्थापन करण्याचे मा. मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते. त्यामध्ये शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना घेण्याचे ठरले होते. परंतु १९ जानेवारी २०१९ रोजी निघालेल्या शासन निर्णयाद्वारे केवळ शासकीय अधिकाऱ्यांचीच समिती तयार करण्यात आली आहे. त्यात संघटनेच्या प्रतिनिधीला स्थान दिलेले नाही. आपली बाजू ऐकून न घेता, आपण मत ऐकून न घेता ही समिती म्हणजे इतर अनेक समित्यांसारखा फार्स ठरणार आहे. त्यातून काहीही निष्पण होणार नाही. त्याच बैठीकीत मा. मुख्यमंत्री यांनी शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे मान्य केले होते. वारंवार पाठपुरावा करुनही शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळे बैठक होऊ शकलेली नाही. 

यासर्व परिस्थितीचा विचार करुन शिक्षक भारतीने ९ फेब्रुवारी २०१९ रोजी संघटना दिनाच्या दिवशी 'समान काम, समान वेतन, समान पेन्शन' सर्वांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात, समतेच्या मागणीसाठी मुंबई येथे दादर रेल्वे स्टेशन (पूर्व) येथून सकाळी ११ वा. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्च्यात राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आपण सर्वांनी आपल्या स्टाफरुममध्ये बैठक घेऊन सर्वांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे. त्यादिवशी सर्व शाळांनी नॉन इंस्ट्रक्शनल डे / अन अध्ययन दिवस जाहीर करावा. 

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत. शिक्षण क्षेत्रातील शासन निर्माण केलेले हे सर्व प्रश्न तातडीने सोडवायचे असतील, एकाही शिक्षकाला सरप्लस होऊ द्यायचं नसेल, मान्यता कायम करायच्या असतील, सातवा वेतन आयोग मिळवायचा असेल तर रस्त्यावर उतरुन आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल. तरच शासनावर दबाब निर्माण होईल. शिक्षकांना ग्राह्य धरण्याची भूमिका शासनाला सोडावी लागेल. आपल्या प्रश्नांना राजकीय पक्षांच्या अजेंड्यात स्थान मिळवून द्यायचे असेल, आपले प्रश्न सोडवायचे असतील तर आपण सर्वजण मोठ्या संख्येने ९ फेब्रवारीच्या मोर्च्यामध्ये सहभागी होऊया. 
लढुया, जिंकूया!

शनिवार दि. ९ फेब्रुवारी २०१९, सकाळी ११ वा.
दादर स्टेशन (पूर्व), स्वामीनारायण मंदिर ते कामगार मैदान, केईएम हॉस्पिटल जवळ, परळ

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

आंदोलनातील मागण्या - 
∎ सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
 विनाअनुदानित शाळा, ज्युनिअर व सीनिअर कॉलेज आणि आयटीआय यांना १००टक्के अनुदान द्या.
 वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्रह्य धरावी.
 अंगणवाडी ताईंना पूर्व प्रथमिक शिक्षकाचा दर्जा देऊन वेतन द्या.  
 केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करा. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा.
 विनाअट वरिष्ठ व निवडश्रेणी द्या. २३/१० चा जीआर रद्द करा.
 शिक्षकांना अतिरिक्त करणारा २८ ऑगस्ट २०१५ व ७ ऑक्टोबर २०१५ चे जीआर रद्द करुन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षकांच्या मागणीनुसार करावे. 
 डी. एड. बी. एड. भरती सुरु करुन राज्यातील शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा.
 नोकर कपात, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण बंद करा. सरकारी व निमसरकारी नोकर भरती सुरु करा.
 स्वयंअर्थशासित शाळा धोरण आणि शिक्षणाचे कंपनीकरण बंद करा.
 कला, क्रीडा शिक्षकांची पदे पुनर्स्थापित करा. पूर्णवेळ ग्रंथपाल नेमा.
 २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रद्द केलेल्या मान्यता पूर्ववत करुन वेतन सुरु करा. 
 अंशकालीन निदेशक / अतिथी निदेशक कला, क्रीडा व कार्यानुभव यांना कायम स्वरुपी नियुक्ती व वेतन श्रेणी लागू करा. 
 मानसेवी शिक्षकांना कायम करा. मानधन नको, वेतन द्या. 
 शाळा, महाविद्यालयातील आयसीटी, आयटी शिक्षकांना पूर्णवेळ वेतन द्या.
 पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद करु नका. दहावीचे २० टक्के अंतर्गत गुण बंद करु नका.
 बदली प्रक्रीयेत सुलभता आणा. पती-पत्नींना एकत्र आणा.
 राज्यातील सर्व शाळांना मोफत वीज आणि आरटीईप्रमाणे सर्व भौतिक सुविधा द्या.
 शाळांमधील स्वयंपाकी मदतनीसांना किमान वेतन द्या.
 सावित्रीबाई फुले-फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना त्वरीत लागू करा.
 शिक्षकेतर कर्मचारी, सफाईकामगार आणि महिला सुरक्षा रक्षक त्वरीत नेमा.
 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध जाहीर करुन भरती सुरु करा. 
 शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार बंद करण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत थेट भरती करा.
 सर्व दिव्यांग स्पेशल स्कूल्स्ना विशेष अनुदान द्या. आरटीई लागू करा.
 मुख्याध्यापकांना केंद्रीय विद्यालयाप्रमाणे स्वतंत्र वेतनश्रेणी द्या.
 रात्रशाळा व रात्र ज्युनिअर कॉलेज पूर्ववत सुरु करा.
 वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार १० टक्के द्या.
 ऑनलाईन कामांचे आऊटसोर्सिंग करा. बीएलओ ड्युटी रद्द करा.
 ज्युनिअर कॉलेजमधील पायाभूत पदांना अनुदान देऊन तत्काळ पगार सुरु करा. 
 विद्यार्थ्यांच्या सर्व शिष्यवृत्या वेळेत द्या. मोफत गणवेश वाटप करा.
 कमी पटसंख्येच्या शाळा / अंगणवाडी शाळा बंद करु नयेत. 
 अनुदानित शाळा/ज्युनिअर मधील विनाअनुदानित तुकड्यांवर कार्यरत शिक्षकांना रिक्त अनुदानीत पदावर तात्काळ मान्यता द्या.
 २०१२ नंतर ना हरकत प्रमाणपत्र न घेता काम करणाऱ्या ज्युनिअर कॉलेज शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्यात याव्यात.
 शालार्थ आयडी नोंदणीचे काम विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे द्यावे.

Friday 4 January 2019

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कसे होणार?


सध्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरु  आहे. आपले समायोजन नक्की कोठे होणार या भितीने शिक्षक - शिक्षकेतर चिंता ग्रस्त आहेत. महिला शिक्षकांसमोर तर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईत सुमारे ६५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मुंबईत त्यांचे समायोजन होऊ शकलेले नाही. आता त्यांना पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात समायोजनाने जावे लागणार आहे. मुंबईतील नोकरी, घर, मुलांच्या शाळा या सर्वांपासून दूर गावी जाऊन रहायचे कुठे ? सगळा संसार कोणाच्या भरवशावर सोडून जायचे ? अनेकांच्या घरी वृद्ध आई - वडील आहेत. त्यांचा दवाखाना औषधोपचार कसा होणार? मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी लांबून कशी पेलणार? असे अनेक प्रश्न समोर उभे आहेत.

मुंबईतील मराठी शाळांमधील मुलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. इंग्रजी माध्यमात मुलांना पाठवण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. पालकांचा सीबीएससी, आयसीएससी आणि आयबी शाळांकडे ओढा वाढतो आहे. गरीबातील गरीब पालकाला आपल्या मुलाला आणि मुलीला चांगले व दर्जेदार शिक्षण द्यायचे आहे. त्यासाठी कोणतीही किंमत द्यायला पालक तयार आहेत. अशावेळी काही शाळांचा अपवाद सोडला तर बहुतांश मराठी शाळांचा दर्जा आज ढासळताना दिसतो आहे. शासनाचे उदासिन शैक्षणिक धोरण आणि अनुदानित व्यवस्था बंद करण्याची कुटनिती हे त्यामागचे एक महत्वाचे कारण आहे. समाजाप्रती असलेले प्रेम आणि सेवाभावी वृत्तीने ज्या संस्थांनी उदात्त ध्येयाने शाळा सुरु केल्या होत्या त्यांना या शाळा म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. न मिळणारे वेतनेतर अनुदान, वाढलेले वीज बील व पाणी बील यामुळे शैक्षणिक संस्था तोटयात आहेत. एस.एस.सी. बोर्डाच्या मराठी शाळांमध्ये पालक मुलांना पाठवायला तयार नाहीत. मुुंबईतील बहुतेक सर्व मोठ्या शाळांनी मराठी शाळांच्या इमारती इंग्रजी माध्यमांची सुरु केलेली शाळा आता मोठी झाली आहे. त्याच इमारतीत भरणारी मराठी शाळा एका कोपऱ्यात बंद पडण्याची वाट पाहत आहे. फी मिळणारी शाळा चालवण्याचा निर्णय अनेक संस्थाचालकांनी आज घेतला आहे म्हणून मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. 

मागील १५ वर्षांपासून महाराष्ट्रात मराठी शाळांच्या संवंर्धनासाठी शासकीय स्तरावर ठोस धोरण तयार करणे आवश्यक होते. परंतु तसे न होता मराठी शाळांची गळचेपी करण्यात आली. विनाअनुदान, कायम विनाअनुदान, अंशतः अनुदान, शिक्षण सेवक अशा अनेक घातक योजनांद्वारे जाणीवपूर्वक अनुदानित शाळांची प्रतिमा मलिन करण्यात आली. मागील चार वर्षात तर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांना ऑनलाईनची कामे, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक, शाळा बाह्य मुले, पोषण आहाराचा हिशोब, जनगणना, बीएलओ ड्युटी, बेसलाईन टेस्ट, संकलित चाचणी आणि रोज नव्याने येणारे शासन निर्णय यामध्ये इतके गुरफटले की शाळेतील विद्यार्थी आणि त्यांची गुणवत्ता याकडे दुर्लक्ष होत गेले. विविध संस्थांचे सर्वेक्षण अहवालातून महाराष्ट्रातील मुले सर्व स्तरावर कशी मागे पडत आहेत याचे चित्र समोर मांडण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकावण्यात आले. रोज एक नवा जीआर यामुळे शाळांचं वार्षिक नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाने तर विद्यार्थी असूनही शिक्षकांना बाहेर काढण्याचं काम केलं. तीन भाषांना एक शिक्षक, गणित, विज्ञानाला एक शिक्षक आणि समाजशास्त्राला एक शिक्षक असा नवा पॅटर्न आणला. त्यामुळे अनेक शिक्षक बाहेर फेकले गेले. मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्याच उरली नाही असे नाही. तर शासनाने मागच्या दाराने आणलेले जीआर शिक्षकांना अतिरिक्त करत आहेत. 

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सोडवण्याची शासनाची भूमिका नाही. अतिरिक्त शिक्षक आणि समायोजन याचा सकारात्मक विचार करुन मार्ग काढण्याची वृत्ती दिसून येत नाही. याउलट अतिरिक्त शिक्षक म्हणजे गुन्हेगारच या भावनेने त्यांना त्यांच्या जिल्ह्यातून बाहेर काढायचं, परेशान करायचं धोरण शासनाने आखल्याचे दिसत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सर्व शिक्षकांचे त्यांच्या जिल्ह्यातच समायोजन करता येईल. त्यासाठी आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे -

महत्वाच्या सूचना - 
१. आरटीई  आणि १९८१ च्या कर्मचारी सेवाशर्ती नियमावलीनुसार प्रत्येक शाळेतील किमान शिक्षक संच निर्धारित करणे आवश्यक आहे. इ. ९वी, १०वीच्या गटासाठी ६ शिक्षक (मराठी १, हिंदी १, इंग्रजी १, गणित १, विज्ञान १, समाजशास्त्र १) तर इ. ६वी ते ८वीच्या गटासाठी ८ शिक्षक (मराठी १, हिंदी १, इंग्रजी १, गणित १, विज्ञान १, समाजशास्त्र १, शा.शि. १, कलाशिक्षक १) आणि इ. ५ वीच्या गटासाठी १ शिक्षक याप्रमाणे इ. ५वी ते १० वी पर्यंतच्या शाळेसाठी किमान १५ शिक्षकांचा संच लागतो. मात्र वर्कलोड विभागणी आणि तुकडीमागे दीड शिक्षक याप्रमाण ही संख्या ११ पर्यंत आणता येईल. तरी कृपया सर्व माध्यमिक शाळांमध्ये किमान ११ (१० अधिक १) शिक्षकांचा संच मंजूर करण्यात यावा. 
२. पूर्वी कला-क्रीडा शिक्षकांना संचमान्यतेत 'विशेष शिक्षक' म्हणून वेगळे स्थान होते. नव्या संचमान्यतेच्या निकषात 'विशेष शिक्षक' देण्यात येत नाही. कला-क्रीडा शिक्षकांची विषय शिक्षकांमध्ये गणना केली जाते. परिणामी विषय शिक्षकांचे पद कमी होते. संचमान्यतेतून कला-क्रीडा शिक्षक वेगळे दाखवल्यास विषय शिक्षकांना जागा उपलब्ध होतील तर कला, क्रीडा शिक्षकांना स्पेशन टीचर म्हणून संरक्षण द्यावेच लागेल. 
३. संचमान्यतेत विद्यार्थी संख्येला वर्गखोलीची अट घालण्यात आली आहे. वर्गखोली उपलब्ध नसल्याने अनेक शाळांना विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक उपलब्ध होत नाहीत.
इ. ५वी च्या गटातील डी.एड. शिक्षकांची संख्या जास्त आहे. खाजगी प्रथमिक शाळेतील विद्यार्थी संख्येसाठी वर्गखोलीची अट शिथिल केल्यास वाढीव शिक्षक पदांची संख्या वाढेल. मुंबईत दुबार अधिवेशनात भरणाऱ्या शाळांची संख्या जास्त आहे. वर्गखोलीची अट असल्याने वाढीव शिक्षक पद मिळत नाही. तरी कृपया अट शिथिल करावी. 
४. संचमान्यता ऑनलाईन होत असल्याने विद्यार्थी संख्या वाढली तरी वाढीव शिक्षक मिळवण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेची वाट पहावी लागते. तात्काळ शिक्षक पद मिळत नाही.
५. मुंबईतील अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली तरी वाढीव शिक्षक पद मिळत नाही. अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वाढीव पद मंजूर केल्यास अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करता येऊ शकते. 
६. इंग्रजी माध्यमांमध्ये रिक्त पदांची संख्या मोठी आहे. विषयांची गरज व शिक्षकांची गुणवत्ता तपासून काही शिक्षकांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये समायोजन करता येईल.
७. मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांमधून शैक्षणिक  पात्रता असणाऱ्या शिक्षकांचे समायोजन ज्यु. कॉलेजमधील रिक्त पदांवर होऊ शकते.
८. सन २०१८-१९ ची संचमान्यता तपासल्यास रिक्त पदांची खरी आकडेवारी समोर येईल.

उपरोक्त सूचनांचा सकारात्मक विचार केल्यास समायोजनाचा मार्ग निघेल. महिला शिक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही. 

अनेक अतिरिक्त शिक्षकांचे वय पन्नाशीच्या जवळपास आहे. काहींना तर निवृत्त होण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी उरला आहे. मागील काही वर्षांपासून संचमान्यता करताना व अतिरिक्त शिक्षक ठरवताना अनेकांवर अन्याय झाल्याचे दिसून येते. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या आक्षेपांचा अभ्यास करुन त्यावर तोडगा काढणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे संचमान्यता आणि समायोजनाबाबत शिक्षकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. एकूणच समायोजनाची प्रक्रिया तापदायी बनली आहे. त्यामुळे शिक्षकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ धोक्यात आले आहे. आपल्या जिल्ह्याबाहेर, कुटुंबापासून दूर तासंतास प्रवास करुन समायोजनाने पाठवलेल्या शिक्षकांकडून अध्यापनाचे काम कसे होऊ शकेल हा ही मोठा प्रश्न आहे. 

संचमान्यता आणि अतिरिक्त शिक्षक यांचे अनेक आक्षेप शिक्षक भारतीकडे आले आहेत. ते पुढीलप्रमाणे - 
# सन २०१३-१४ पासून ऑनलाईन संचमान्यता झाल्यानंतर एकदाही संचमान्यता वेळेवर देण्यात आलेली नाही.
# संचमान्यतेत दुरुस्तीबाबतच्या तक्रारीचे निराकरण झालेले नाही. 
# शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता ठरविण्याबाबतच्या निकषात स्पष्टता नाही. त्यामुळे शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक ठरविण्यात अनेक अडचणी येतात. 
# नियुक्ती दिनांक, विषय, रोस्टर इ. मुद्यांचा विचार करुन अतिरिक्त ठरविण्याचे स्पष्ट नियम नाहीत. 
# अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या आक्षेपावर सुनावणी घेण्यात आलेली नाही. अथवा काही प्रकरणात सुनावणी घेतली पण लेखी निर्णय देण्यात आलेला नाही. 
# अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांच्या यादीत सतत बदल होत गेला आहे. 
# अतिरिक्त शिक्षकांची यादी सदोष असून त्यात नियुक्त दिनांक, शै. पात्रता तसेच वेगवेगळ्या गटात समावेश केल्याच्या अनेक चुका आहेत. 
# रात्रशाळेत पाठविलेल्या शिक्षकांना अतिरिक्त यादीत न घेतल्याने त्यांना समायोजनात सहभागी होता आलेले नाही. 
# रात्रशाळेतील रिक्त पदांबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. 
# शाळांमधील रिक्त पदांची माहिती देताना काही शाळांमधील रिक्त पदे लपविण्यात आल्याचे दिसते. 
# अतिरिक्त ठरविताना सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला आहे. 
# मुंबईतील शिक्षकांचे समायोजन करताना उत्तर, दक्षिण व पश्चिम विभागांचे एकत्र समायोजन झाल्याने अनेक शिक्षकांवर दुरवरच्या दुसऱ्या विभागात समायोजनाने जावे लागले. 
# रात्रशाळेत समायोजन करताना शै. पात्रतेचा विचार न करता पक्षपातीपणे समायोजन झाल्याचे दिसते. 

अतिरिक्त शिक्षकांचा आकडा मोठा आहे. भविष्यात तो वाढतच जाणार आहे. पण शिक्षकांना विश्वास देऊन त्यांना संरक्षण दिल्यास हे शिक्षक आजही आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने शासन दरबारी शिक्षकांच्या समस्या, आक्षेप आणि त्यावरील उपाय पाठवले आहेत. आता जबाबदारी शासनाची आहे. 

- सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती