Sunday 27 June 2021

50% उपस्थितीतून सुटका. वर्क फ्रॉम होमची परवानगी मिळाली

शिक्षक भारतीच्या आंदोलनाचे यश

मुंबईसह राज्यभरात 15 जून पासून नियमितपणे शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती.  ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी दिली नव्हती. मागील पंधरा दिवसापासून आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून शिक्षक भारतीने सातत्याने प्रवास करण्याची परवानगी द्या अथवा वर्क फ्रॉम होम सुरु करा अशी मागणी लावून धरली होती. आज अखेर शिक्षण विभागाला उशिरा शहाणपण सुचले. मुंबई आणि एम एम आर विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची परवानगी मिळाली.







दहावीच्या निकालाशी संबंधित सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती आणि इयत्ता पहिली ते नववी ला शिकविणाऱ्या शिक्षकांना 50 टक्के उपस्थितीची अट लादण्यात आली होती. परंतु  ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यास शासन तयार नव्हते. मुंबईतील शाळांमध्ये नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई विरार, कर्जत, कसारा, पालघरपासून ट्रेनने प्रवास करून काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.  ट्रेन सुरु नसल्याने दररोज 1000 ते 2000 रुपये खर्च करून खाजगी वाहने अथवा टॅक्सीने प्रवास करावा लागत होता. अनेकांना रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने विनातिकीट प्रवास करावा लागला. विनातिकीट प्रवास केल्याने नाहक दंड भरण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. बसने प्रवास करणाऱ्या महिला व पुरुष शिक्षकांना दररोज चार ते पाच तास प्रवास करावा लागत होता. याविरोधात शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना भेटून निवेदन दिले होते. परंतु वारंवार आश्वासन देऊनही ट्रेनच्या प्रवासाची परवानगी देण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला. शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळाच्या विरोधात शिक्षक भारतीने मुंबईतील तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयावर जोरदार आंदोलन केले. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातही जाऊन वर्क फ्रॉम होम सुरू करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास शिक्षक भारतीच्या महिला आघाडीने शिक्षणमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्धार केला होता. आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या अथवा ट्रेनचा प्रवास करण्याबाबत परवानगी मिळण्याबाबत विनंती केली होती. कपिल पाटील यांच्या मागणीनुसार शिक्षणमंत्र्यांना बोलावून याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्यानुसार आज अखेर शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण व जोरदार आंदोलनाची दखल शिक्षण विभागाला घ्यावी लागली. शिक्षण संचालक आणि शिक्षण उपसंचालक यांनी मुंबईसह एम एम आर रिजनमधील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे.


निकालाचे काम करणाऱ्यांना दिलासा नाहीच
शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी आठ दिवसापूर्वी दहावीच्या निकालाशी संबंधित काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती लिंकद्वारे घेतली होती. पण त्याचे काय झाले हे अद्यापि स्पष्ट करण्यात आले नाही. ट्रेनची परवानगी देणे दूरच पण पास मिळणार की नाही हेही सांगितले जात नाही. शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी आज काढलेल्या पत्रानुसार निकाला संबंधी काम करणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था काय करता येईल का? याची माहिती बोर्डाच्या सचिवांकडे मागितली आहे. एकूण काय शिक्षण विभागाचा गलथानपणा थांबलेला नाही. माहिती मागायची पण कार्यवाही काहीच करायची नाही. पण या सगळ्यांमध्ये शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा कोणीही विचार करताना दिसत नाही. शिक्षण विभागातील अधिकारी झोपेत आहेत की काय? असा प्रश्न पडतो. शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत शिक्षणमंत्री गांभीर्याने विचार करणार का? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

शिक्षण विभागाला संवेदनशील, वस्तुस्थितीला धरून निर्णय घेणारे, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना प्राधान्य देणारे आणि राज्यातील शाळांचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षणमंत्री कधी मिळणार? हा मोठा यक्षप्रश्न आहे.

आपला स्नेहाकिंत 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य

Saturday 26 June 2021

संघर्ष अभी रूका नहीं


26 जून 2006 ची संध्याकाळ. 
मुंबई शिक्षक मतदार संघातून पत्रकार असलेल्या कपिल पाटलांचा विजय झाला. मुंबईच्या शिक्षक मतदारसंघाचा चाळीस वर्षापासून राखलेला शिक्षक परिषदेचा गड पडला. सलग तीन टर्म आमदार असलेल्या श्रीमती संजीवनी रायकर मॅडमचा पराभव झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी मुंबईत पुरोगामी विचारांच्या नेतृत्वाचे नवे पर्व सुरू झाले. शिक्षक भारती संघटनेला पहिल्याच प्रयत्नात आमदार कपिल पाटलांच्या स्वरूपात दमदार यश मिळाले. ऑगस्ट 2005 साली गुरुवर्य अशोक बेलसरे सरांनी रात्र शाळांचे शिलेदार आणि दिवसा शाळेतील निवडक शिक्षक सोबत घेऊन शिक्षक भारती संघटनेची स्थापना केली. शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीद वाक्य घेऊन आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वात शिक्षक भारतीचे काम सुरू केले. सांज दिनांक, महानगर, आज दिनांक वृत्तपत्रातील पत्रकारिता, रात्र शाळा वाचविण्यासाठी काढलेल्या बॅटरी मोर्चातील सहभाग, डी एड बीएड कॉलेजमधील कॅपिटेशन फीच्या विरोधातील लढा, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षातील कामगिरीच्या जोरावर शिक्षक नसूनही आमदार कपिल पाटलांना मुंबईतील शिक्षकांनी आमदारकी दिली. विजयानंतरच्या आपल्या भाषणात कपिल पाटलांनी मुंबईतील शिक्षकांना दिलेलं वचन आज पर्यंत पाळले आहे. ते म्हणाले उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.

आपल्या पहिल्याच टर्ममध्ये आमदार कपिल पाटील यांनी जोरदार कामगिरी केली. शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारा शिक्षक आमदार असतो हेच आम्हा शिक्षकांना माहित झाले ते केवळ आमदार कपिल पाटलांमुळे.

महिनाभर काम करूनही पगारासाठी वाट पाहणाऱ्या मुंबईतील शिक्षक शिक्षकेतरांना महिन्याच्या एक तारखेला राष्ट्रीय बँकेतुन पगार सुरू झाला. महिला दिनी महिला शिक्षकांसाठी 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर केली. शिक्षकांना छळणारी आचारसंहिता रद्द केली. आर टी ई कायद्यानुसार पदवी धारण करणे बंधनकारक झाल्यानंतर हजारो शिक्षकांना यशवंतराव चव्हाण विद्यापीठामार्फत पदवी प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. अनुदानित शाळातील वाढीव तुकड्यांवर कार्यरत शिक्षकांना बंद पडलेल्या तुकड्यांचे समायोजन करून शंभर टक्के पगार सुरू केला. रात्र शाळांचे भाडे माफ केले. रात्र शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून थकबाकी सह वेतन मिळवून दिले. 26 जुलैच्या पावसात वाहून गेलेल्या शाळांना एकही पैसा खर्च न करता नव्या इमारती मिळवून दिल्या. अध्यापनाच्या 45 तासिकांचा जीआर रद्द केला. शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला. राज्यातील वाडी वस्तीवर तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या नऊ हजार वस्तीशाळा शिक्षकांना कायम करून पूर्ण पगार सुरु करणारा ऐतिहासिक लढा दिला.

शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी
शिक्षक आमदार असूनही आमदार कपिल पाटील यांनी नेहमीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळांचा दर्जावाढिला प्राधान्य दिले. अनुदानित शाळा टिकल्या पाहिजेत या भावनेतून आपल्या शाळांची गुणवत्ता वाढवण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच राज्यातील शाळांचा अभ्यासक्रम केंद्रीय बोर्डाप्रमाणे करण्याची मागणी केली. बिहार, केरळ व दिल्ली या तिन्ही राज्यात मुंबईतील शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व तज्ञ शिक्षक यांची टीम पाठवून शाळांच्या दर्जावाढिसंदर्भात राज्य शिक्षण विभागाला अहवाल पाठविला. आज आपल्या अभ्यासक्रमातील गणित आणि विज्ञान विषयात झालेला बदल हा त्याचा परिपाक आहे. मराठी विषयाची गोडी वाढावी व विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावे यासाठी त्यांनी स्कोरिंग मराठी परिषद घेतली. मुंबईत दहावी बारावीच्या परीक्षांचा टेन्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू झालं होतं. आत्महत्या थांबवाव्या यासाठी विख्यात मानसोपचारतज्ञ श्री.आनंद नाडकर्णी यांच्या मदतीने तणाव मुक्त विद्यार्थी अभियान सुरू केलं. दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं. दरवर्षी मुंबईत भरवल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना व शिक्षकांना आमदार चषक आणि भरघोस बक्षीसांनी सन्मानित केलं. शिक्षकांच्या पगारासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनुदानित व्यवस्था असल्याचे ते ठामपणे सांगत होते. शाळांच्या भेटीदरम्यान एखाद्या शाळेत विद्यार्थी वर्गाबाहेर उभा असलेला दिसला तर शाळेच्या मुख्याध्यापकांशी व शिक्षकांशी चर्चा करून त्या मुलाला वर्गात पाठविण्याबाबत ते आग्रही असतात. शाळा म्हणजे संविधान शिकण्याचं केंद्र  ते मानतात. शाळांमध्ये देव देवतांची पूजा, सरस्वतीची पूजा, सत्यनारायणाची पूजा यावर आक्षेप घेतात. आपल्या सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही. सावित्री फातिमाचा केवळ फोटो लावत नाही तर शिक्षक भारती संघटनेतील प्रत्येक सदस्याच्या मनात सावित्री फातिमाचा विचार पोहचविण्यासाठी धडपडणारे कपिल पाटील मी पाहत आलो आहे. हिंदी भाषा वगळण्याचा निर्णयाला विरोध करण्यासाठी केलेला प्रयत्न असो किंवा हिंदी भाषिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे विरोधात केलेले उपोषण असो कपिल पाटील न डगमगता ठाम भूमिका घेतात. माझी मते कमी होतील, सनातनी विचारांचे लोक विरोधात जातील याची कधीही त्यांनी पर्वा केली नाही. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, साधी राहणी आणि पुरोगामी विचारसरणी हेच त्यांच्या हँट्रिकच्या यशाचं कारण असेल.

जनतेच्या प्रश्नांसाठी
मागील पंधरा वर्षात कपिल पाटलांनी केवळ शिक्षण क्षेत्रातील नव्हे अनेक सामाजिक प्रश्नांवर सभाग्रहात आणि सभागृहाबाहेर आवाज उठविला. खाजगी विद्यापीठ बिलाला आमदार कपिल पाटील यांनी कडाडून विरोध केला. विरोध करणारे ते एकमेव आमदार होते. अखेर सरकारला गरिबांसाठी आरक्षणाची तरतूद त्या करावी लागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिप्रेत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याच्या निर्मितीमध्ये न्या. धर्माधिकारी यांच्यासोबत आमदार कपिल पाटील यांनी महत्वाची कामगिरी बजावली. मुंबईच्या कोळीवाड्यांच्या प्रश्न, स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न, महाग होणाऱ्या म्हाडाच्या घरांचा प्रश्न, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, मानखुर्द येथील झोपडपट्टीतील पाणीप्रश्न, वाशी नाका परिसरातील कब्रस्तानचा प्रश्न या प्रत्येक ठिकाणी आमदार कपिल पाटलांना सोबत काम करताना लढायचं कसं? प्रश्नांना वाचा फोडायची कशी? हे आम्हा सर्वांना शिकता आलं. त्यांनी नेहमीच संघटनेचे नेतृत्व तरुणांना दिले.त्यातूनच शिक्षक भारती संघटनेची केवळ मुंबईतच नव्हे संपूर्ण राज्यभर अभेद्य अशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. आज शिक्षक भारती संघटना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी पाय रोवून उभी आहे.

संघर्ष अभी रुका नही
सरकार कोणाचेही असो कपिल पाटलांना दोन हात करावेच लागतात. कारण कपिल पाटलांची बांधिलकी कोणत्या पक्षाशी नाही तर ती सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाशी आहे. समानतेशी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते अनेकदा एकटे पडतात. मोठ मोठ्या राजकीय संधींना मुकतात. पण लढत राहतात. वर्सोवा येथे म्हाडा सोसायटीतील आमदारांना मिळणारा फ्लॅट नाकारताना अथवा नितीश कुमार यांच्या गटात राहून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होणारा समावेश नाकारताना आमदार कपिल पाटील एका क्षणात निर्णय घेतात. तत्त्वांशी तडजोड न करता नकार देतात. ही मोठी गोष्ट आहे. भलेभले समोर आलेल्या संधी मिळवण्यासाठी तडजोडी करतात, भूमिका बदलतात, लोटांगण घालायला तयार होतात. पण आमदार कपिल पाटील या सर्व परिस्थितीत ताठ कण्याने उभे राहतात. हे चित्र आज दुर्मिळ झाले आहे.

सध्य परिस्थितीत कोरोनामुळे शिक्षण आणि शिक्षकांवर मोठे संकट ओढवले आहे. एक तारखेला पगार मिळत नाही. शाळेत उपस्थिती बंधनकारक आहे पण रेल्वेची परवानगी नाही. पेन्शनचा प्रश्न बिकट बनला आहे. टप्पा अनुदानासाठी झगडावे लागत आहे. 12 वर्षे व 24 वर्षाची श्रेणीलाभ मिळत नाही. रात्र शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दिवसेंदिवस प्रश्न वाढत आहे.  कपिल पाटलांचा लढा थांबलेला नाही. शिक्षणमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे शासन दरबारी कोरोना कालावधीतही सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. शिक्षक भारती, मुंबईतील सर्व शिक्षक त्यांच्या प्रत्येक लढयात सोबत उभे आहेत. मला खात्री आहे परिस्थिती कितीही बिकट असली तरीही आमदार कपिल पाटील मात केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य 

#कार्यकर्ताआमदारकपिलपाटील 
#कपिलपाटीलआमदारकीची१५वर्ष

Thursday 17 June 2021

अनुदान आणि पेन्शन कोंडी फुटणार का?


दिनांक 16 जून 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांच्या दालनात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आणि टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 100% पगार देण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेसोबत बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षणमंत्री मा. ना. वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, वित्त विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके उपस्थित होते.


जुनी पेन्शन योजना लागू करा
आमदार कपिल पाटील यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन पदावर नियुक्त आणि वस्तीशाळेवर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना केली पाहिजे अशी मागणी केली. राज्याने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना केली आहे, पण शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांबाबतच भेदभाव का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली तर शासनावर आर्थिक भार वाढत आहे असा चुकीचा समज पसरवला जात आहे हे आमदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. 

जुनी पेन्शन योजना लागू केल्यास या सर्व कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची कपात शासनाकडे जमा होते. पण या सर्वांना डी सी पी एस आणि आताची एनपीएस योजना लागू केली तर राज्य शासनाला दरमहा 14 टक्के शासन हिस्सा म्हणून जमा करावी लागणारी रक्कम जास्त आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास शासनावर अधिक भार न येता शासनाकडे भविष्य निर्वाह निधीतून रक्कम जमा होते. तसेच  दरवर्षी कर्मचारी टप्प्याटप्प्याने निवृत्त होत असल्याने शासनावर एकाच वेळी पेन्शनचा भार येणार नाही. शासनाकडे पैसे नव्हते म्हणून या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात आले त्यात कर्मचाऱ्यांची चूक काय? असा सवाल उपस्थित केला. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी वित्त विभागाने मान्यता देणे आवश्यक आहे असे सांगितले.

माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आमदार कपिल पाटील यांनी मांडलेला मुद्दा धोरणात्मक असल्याचे त्याबाबत मंत्रीमंडळाची आधी परवानगी घ्यावी लागेल असे मत मांडले. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत सादर करावा असे सुचवले.

बैठकीबाबत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र


आमदार कपिल पाटील यांनी अजितदादांना लिहलेले पत्र.
 

100%  पगार द्या
शिक्षण विभागाच्या अनुदान देण्याच्या प्रचलित धोरणानुसार राज्यातील सर्व पात्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना 100 टक्के पगार देणे आवश्यक असताना केवळ 20% वर बोळवण केली जात आहे. 20%  पगारावरून 40% चा टप्पा सुरू होताना हजारो कर्मचाऱ्यांना वगळण्यात येत आहे. विविध स्तरावरच्या तपासण्या, त्रुटी या सर्वांचा सामना करावा लागत आहे.  हे सर्व कर्मचारी गेली पंधरा ते सतरा वर्ष काम करत आहेत. या सर्वांना शंभर टक्के पगार देणे शक्य आहे. 

सन 2012 सालापासून शिक्षकांची भरती बंद आहे. 2004 सालापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. वयोमानानुसार निवृत्त झाल्याने अथवा मृत्यू झाल्याने शिक्षक-शिक्षकेतर संख्या कमी होत आहे. शिक्षण विभागाला मंजूर असणारी पदे आणि कार्यरत पदे यांची गोळाबेरीज केली तर सुमारे एक लाख पदे रिक्त असल्याचे स्पष्ट होईल.  टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पन्नास हजार पेक्षा कमी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन अनुदानित मंजूर पदावर केल्यास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार दिला जाऊ शकतो अशी मांडणी आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबतच्या बैठकीत केली. 

माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आमदार कपिल पाटील यांनी मांडलेल्या मांडणीचा सकारात्मक विचार करून याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्याचे मान्य केले. मुंबईमधील बंद पडलेल्या अनुदानित तुकड्यांचे उपनगरातील नैसर्गिक वाढीव तुकड्या वर समायोजन करून विनाअनुदानित तुकड्यांमधील शिक्षकांना शंभर टक्के पगार दिल्याचे उदाहरण आमदार कपिल पाटील यांनी यावेळी बैठकीत दिले. त्यानुसार शासनाने ठरवल्यास सर्व पात्र प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार देणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब यांनी वित्त विभाग आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी वर्गासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. जुनी पेन्शन आणि अनुदान यांची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने कालची बैठक हे अतिशय महत्त्वाचे पाऊल होते. नजीकच्या काळात या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी अपेक्षा करूया.

आपला स्नेहाकिंत
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य

-------------------------------

आमदार कपिल पाटील यांचे नवनवीन ब्लॉग वाचण्यासाठी क्लीक करा - 

Tuesday 8 June 2021

जुन्या पेन्शन योजनेसाठी किती वेळा माहिती दयायची?

सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. हा आपला संविधानात्मक हक्क आहे. शासन अथवा शासनातील अधिकारी आपल्याला संविधानाने दिलेल्या जुन्या पेन्शनच्या हक्कापासून रोखू शकणार नाहीत. जुन्या पेन्शन बाबत वारंवार चुकीची माहिती सादर केल्याने पेन्शन दिल्यास शासनावर मोठा आर्थिक भार पडणार आहे अशी मानसिकता तयार केलेली आहे. मागील पंधरा वर्षात विविध पक्षांची सरकारी आली पण पेन्शनचा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहिला किंबहुना जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवला गेला. विरोधी पक्षातले नेते सत्तेवर येईपर्यंत जुन्या पेन्शनचा नारा देत होते. परंतु तेच सत्तेवर आल्यावर पेन्शन कशी देता येणार नाही याची कारणे देऊ लागले. आश्वासनं झाली. समित्या झाल्या. बैठका झाल्या. वेगवेगळे अहवाल झाले. अनेक वेळा माहिती मागवली गेली. पण पेन्शन मिळाली नाही. दरम्यानच्या काळात आपले हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव निवृत्त झाले, मरण पावले पण त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळालेली नाही.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वित्त विभागाकडे योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आपण सर्वजण पेन्शन पासून आज पर्यंत वंचीत आहोत. एक नोव्हेंबर 2005 रोजी जुनी पेन्शन रद्द करण्याचा निर्णय झाला. राज्यातील सर्व शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू झाला. पण त्याच बरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्यात आली. पण शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र वगळण्यात आले. डी सी पी एस लागू करण्याचा निर्णय घेण्यासाठी सुमारे पाच वर्षाचा विलंब केला. 29 ऑक्टोबर 2010 रोजी शासन निर्णय पारित केला. शिक्षण विभागातील मंत्र्यांनी, सचिवांनी, अधिकाऱ्यांनी या पाच वर्षात काय केले याचा जाब विचारायला हवा?

आपण सर्वांनी अनेक वेळा माहिती दिली आहे. याही वेळा देऊ. पण ही शेवटची वेळ असेल. यानंतर कोणतीही माहिती द्यायची नाही. माहिती मागवणे ती चुकीच्या पद्धतीने सादर करणे आणि गोंधळ निर्माण करणे हा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा खेळ आता थांबायला हवा. शिक्षण सचिव आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत वस्तुस्थिती समोर न मांडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.

यानंतर माहिती देणार नाही

सर्व अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती की आपल्या विद्यालयात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान किंवा अंशतः अनुदानावर नियुक्त (कायम अनुदान नाही) व त्यानंतर 100% अनुदावर आलेले व सध्या कार्यरत असलेले तसेच आपल्या विद्यालयातून यापूर्वी वरीलपैकी सेवानिवृत्त किंवा मयत झाले असतील याच कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाने मागवली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सदर माहिती विनाविलंब आणि अचूक देणे आवश्यक आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचे जी पी एफ चालू असतील अथवा नसतील, डी सी पी एस चालू असेल अथवा नसेल याचा विचार न करता वरील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ द्यावयाची आहे.

शिक्षण संचालक कार्यालयाने जारी केलेले पत्र - https://drive.google.com/file/d/1S8Qt3mPRA2HWAj5kbbBAEILTxQ_NgHDU/view?usp=sharing

शिक्षण संचालक कार्यालयाने दिलेले प्रपत्र अ आणि प्रपत्र ब भरताना खालील सुचनांचा विचार करावा, ही विनंती.

प्रपत्र अ भरताना

१) रकाना क्र २ मध्ये सर्व कर्मचारी संख्या लिहावी.

२) रकाना क्र ३ मध्ये सर्व कर्मचारी यांची डिसीपीएस रक्कम भरावी (Basic+DA) च्या १०℅ × २

३) रकाना क्र ४ मध्ये सर्व कर्मचारी यांची डिसीपीएस रक्कम भरावी (Basic+DA)च्या १४℅ × २

४) रकाना क्र ५ मध्ये रकाना क्र ४ मधील संख्येला १२ ने गुणून जी रक्कम येईल ती

५) रकाना क्र ६ मध्ये सेवानिवृत्त आणि मयत कर्मचारी संख्या लिहा.

६) रकाना क्र ७ मध्ये त्या सेवकांची Basic+DAला 2 ने भागून येणारी रक्कम भरावी

७) रकाना क्र ८ हा रकाना क्र ७ प्रमाणेच

८) रकाना क्रमांक ९ मध्ये रकाना क्र ८ मधील संख्येला १२ ने गुणने

९) रकाना क्र १० मध्ये सर्व कर्मचारी यांचा जो जी.पी.एफ चालू असेल ती रक्कम

१०) रकाना क्र ११ मध्ये जर काही कारणास्तव आपल्यातील काही कर्मचाऱ्यांचा जी.पी.एफ कट होत नसेल तर त्यांचा जी.पी.एफ (बेसिक च्या ६% )घेऊन त्याची आणि रकाना क्र १० मधील संख्या यांची बेरीज करावी.

११) रकाना क्र १२ मध्ये रकाना क्र ११ ला १२ ने गुणने

१२) रकाना क्र १३,१४,१५ आपण भरू नये

१३) रकाना क्र १६ मध्ये शेरा
१९८२ ची जुनी पेन्शन लागू करावी.

प्रपत्र ब

१) रकाना क्र. 8 एकूण वेतनमध्ये Basic +D.A =Total घ्यावे.
बाकी सर्व रकाने भरणे सोपे आहे.

आपली भूमिका नेहमीच शिक्षण विभागाला मदत करणारी आहे. पण जर आपल्या सहनशीलतेला आपला भ्याडपणा समजत असतील तर गप्प बसून चालणार नाही. आपल्याला लढावे लागेल.


आपला स्नेहाकिंत

सुभाष किसन मोरे, 
कार्याध्यक्ष शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


Thursday 3 June 2021

शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ सुरूच

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी बाबतचे पत्र रद्द केले

26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयामुळे प्रशिक्षणाची अट रद्द करून सर्व पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी देण्याचे मान्य केले होते. परंतु सदर शासन निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होत नव्हती. शिक्षक भारतीने शिक्षण आयुक्त यांना पत्र देऊन 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत पत्र दिले होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाअभावी देण्याचे मान्य केले. त्यानुसार शिक्षण निरिक्षक, उत्तर विभाग आणि शिक्षण निरिक्षक, दक्षिण विभाग यांनी पत्र काढले होते. शिक्षण विभागात एकवाक्यता नसल्यामुळे शिक्षणमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षण निरिक्षक कार्यालयाने वरिष्ठ व निवड श्रेणी देण्याबाबतचे काढलेले पत्र रद्द केले आहे. शिक्षक भारती याचा तीव्र शब्दात निषेध करते.

शिक्षण सहसंचालक श्री दिनकर टेमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच सर्वांसाठी दहा दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की 12 वर्ष व 24 वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे जे नुकसान होणार आहे याला जबाबदार कोण? राज्यभर शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना विनाअट, विना प्रशिक्षण, सरसकट बारा वर्ष व 24 वर्षाचे लाभ दिले जातात. मग आमचा शिक्षण विभागच आपल्यावर अन्याय का करत आहे?

शिक्षण विभागातील अधिकारी यांना शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी यांना कोणतेही लाभ मिळू नये असेच नेहमी का वाटते?

सरकार बदलल्यानंतर असे वाटले होते की शिक्षणाचे व शिक्षकांचे प्रश्न सुटतील पण आता ती आशा राहिलेली नाही. कोरोना काळा नंतर याबाबत शिक्षक भारतीला रस्त्यावरील तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आपल्या प्रश्नांसाठी आपल्याला लढावं लागेल. शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण विभागाला जागं करावं लागेल.

अधिक माहितीसाठी याच संदर्भातला ऑगस्ट २०२० मध्ये लिहलेला ब्लॉग जरूर वाचा -

लढेंगे! जितेंगे!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य