Wednesday 24 November 2021

अखेर १२ व २४ वर्षे वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया जाहीर


शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा

मात्र प्रशिक्षणाच्या शुल्काला शिक्षक भारतीचा विरोध

१२ वर्षे / २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरीष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाबाबत परिपत्रक जारी झाले आहे. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने सातत्याने याबाबत बैठका केल्या होत्या. पाठपुरावा केला होता. शिक्षण आयुक्त यांनी यासंदर्भात २० सप्टेंबर २०२१ रोजीच्या बैठकीत लवकरच याबाबत १० दिवसांचं ऑनलाईन ट्रेनिंग घेण्यात येणार आहे, असं सांगितलं होतं. २ ऑक्टोबर रोजी हे ट्रेनिंग जाहीर करण्यात येणार होतं. परंतु ते झालं नाही. त्यानंतर कपिल पाटील आणि शिक्षक भारती सातत्याने याचा पाठपुरावा करत होती. आज अखेर या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याबाबतचे पत्रक निघाले आहे. यामुळे अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सविस्तर माहितीसाठी यासंदर्भातला जुना ब्लॉग जरूर वाचा
Tap to read - https://subhashkisanmore.blogspot.com/2020/08/blog-post_24.html?m=1


शिक्षक भारतीचा प्रशिक्षण शुल्काला विरोध

पहिल्यांदा अशाप्रकारच्या प्रशिक्षणासाठी रु. २,०००/- शुल्क आकारण्यात आले आहे. याचा शिक्षक भारती निषेध करते. प्रशिक्षण देणं ही खरं तर सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे शुल्काची ही जाचक अट रद्द करण्याबाबत शिक्षक भारती आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे.

प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

१) प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

२) दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्ष सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

३) दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्ष सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू राहील.

५) सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतरच पुढील सूचना संबंधितांना ईमेलद्वारे देण्यात येतील.

६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत -
गट क्र. १ - प्राथमिक गट,
गट क्र. २ - माध्यमिक गट,
गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट,
गट क्र. ४ - अध्यापक विद्यालय गट.

७) प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

८) नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

९) प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असतानाच नोंदविलेल्या ईमेल आयडीवर पाठविण्यात येतील.

१०) नोंदणी फार्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास 'माहितीत बदल करा' या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.

११) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

१२) या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१३) आणि १४)
प्रशिक्षण शुल्काबाबत शिक्षक भारतीने विरोध केलेला आहे. हे शुल्क रद्द करण्यासाठी शिक्षक भारती तातडीने पाठपुरावा करत आहे.

१५) नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेलवरून trainingsupport@maa.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा.

१६) वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणून संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

१७) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

१८) शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय . जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

१९) सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.

वरील कोणत्याही मुद्द्यांबाबत किंवा प्रशिक्षणाबाबत कोणतीही अडचण आल्यास शिक्षक भारती सदैव आपल्या सर्वांच्या सोबत आहेच.

प्रशिक्षण नोंदणीसाठी दिलेल्या अर्जात असलेल्या त्रुटींबाबत

१) या प्रशिक्षणासाठी नोंदणी करत असताना शालार्थ आयडी असणं आवश्यक आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांचे पगार SAP प्रणाली द्वारे होतात. त्यामुळे त्यांच्याकडे शालार्थ आयडी नाही. याबाबत मुंबई महानगरपालिकेने तात्काळ शालार्थ आयडी द्यावा अशी आयुक्तांकडून सूचना जाणे आवश्यक आहे. अथवा शालार्थ आयडीची नोंद करण्याची अट शिथिल करण्याची आवश्यकता आहे.

२) या प्रशिक्षणासाठी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना नोंदणी करता येणार नाही. कारण त्यांच्याकडे सुद्धा शालार्थ आयडी नाहीये. त्यामुळे शिक्षक भारतीच्यावतीने शालार्थ आयडीची नोंद वगळण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे.

३) १२ वर्षे, २४ वर्षे प्रशिक्षणासाठी नोंद करत असताना शिक्षण सेवक (सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन) कालावधी ग्राह्य धरला जात नव्हता. मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य न धरल्यामुळे ३ वर्षे नुकसान होतं. याबाबत शासनाने शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरावा असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु ते झालेलं नाही. शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरण्याबाबत दुरुस्ती होणे आवश्यक आहे. 

४) नोंदणी करत असताना व्यावसायिक अर्हता निवडताना जो गट दिलेला आहे त्याच्यामध्ये संगीत शिक्षकांच्याबाबत कोणत्याही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सर्व संगीत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबतही तात्काळ खुलासा होणे आवश्यक आहे.

इतर काही मुद्दे सूचना असल्यास कमेंटमध्ये कळवावे.

यासर्व त्रुटी दूर होण्याबाबत आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भारती पाठपुरावा करणार आहे.
तसेच
प्रशिक्षण शुल्काची जाचक अटही नक्कीच रद्द होईल.
लढूया, जिंकूया!

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र