Friday 10 May 2024

मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

आमदार कपिल पाटील आणि सुभाष किसन मोरे यांनी दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाला निवेदन दिले


मुंबई, दि. 10 मे 2024 :
भारत निर्वाचन आयोगाने दि. 8 मे रोजी प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघासह राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या मतदारसंघांसाठी 10 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. मात्र शाळा 15 जून नंतर सुरू होणार असल्यामुळे सुट्ट्यांवर गेलेल्या शिक्षक मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिल्लीत आज भारत निर्वाचन आयोगाला निवेदन दिले. सुट्ट्यांमुळे मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात यासंबंधीची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका घेण्याची विनंती केली.


दिल्लीतून महाराष्ट्रात आलेल्या निर्वाचन आयोगाच्या निरीक्षकांना शिक्षक भारतीचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी मंत्रालयात आज भेट घेऊन निवेदन दिले. 10 जूनला निवडणुका घेतल्यास मतदानावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याबद्दलची वस्तुस्थिती त्यांच्याही निदर्शनास आणून दिली.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची शिफारस …
मतदानाच्या तारखेबद्दल गोंधळ होऊ शकतो हे गृहीत धरून कपिल पाटील यांनी निर्वाचन आयोगाचे राज्यातील प्रमुख असलेले मुख्य निवडणूक अधिकारी यांना याबाबत फेब्रुवारीत निवेदन दिले होते. मतदानाची तारीख शाळा सुरू झाल्यानंतर घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात मतदान घेण्याबाबत त्यांनीही भारत निर्वाचन आयोगाकडे 13 एप्रिल रोजी शिफरस केली होती.


निवडणूक दहाला पण मतदार गावाला…
भारत निर्वाचन आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 10 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि शिक्षक एकतर त्यांच्या मूळ गावी गेले आहेत किंवा त्यांच्या कुटुंबासह सुट्टीवर आहेत. या काळात बहुतेक लोक त्यांच्या मूळ गावी किंवा सुट्टीवर जातात, कारण मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. 15 जून आणि 18 जून रोजी शाळा पुन्हा सुरू होत आहेत आणि त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर 10 जून 2024 रोजी मतदान करण्यासाठी त्यापूर्वी परत येतील अशी अपेक्षा करणे केवळ अशक्य आहे. याव्यतिरिक्त, असे बहुतेक प्रवासी त्यांचे परतीचे तिकीट देखील बुक असतात आणि त्यांना अल्पावधीत नवीन आरक्षण/तिकीट मिळणे अशक्य आहे.

उत्तर भारतीय शिक्षकही 11 जून नंतर येणार …
मुंबईतील शिक्षक/पदवीधर मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारही मोठ्या संख्येने आहेत. ते टीचर्स स्पेशल ट्रेनने परततील, जी 10 जून 2024 रोजी गोरखपूरहून निघेल आणि 11 जून 2024 रोजी मुंबईत पोहोचेल.

2018 मध्येही अशी परिस्थिती निर्माण झाली होती…
मागील 2018 च्या निवडणुकीतही अशीच अनिश्चितता होती. मतदानाची तारीख 8 जून 2018 ही जाहीर केली गेली होती, परंतु आमदार कपिल पाटील यांनी तथ्यांसह भारत निर्वाचन आयोगाकडे रदबदली केल्यानंतर, तारीख बदलून 25 जून 2018 करण्यात आली. विधान परिषदेच्या वरील चारही सदस्यांचा कार्यकाळ 7 जुलै 2024 रोजी संपत आहे.

शिवाय, 10 जूनला निवडणूक घेणे हे निर्वाचन आयोगाच्या "नो व्होटर टू बी लेफ्ट बिहाइंड" या तत्वाशी विसंगत ठरेल, असे कपिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

शिक्षक भारतीचे कोकण आयुक्त यांना निवेदन …
याच संदर्भात कोकण आयुक्त यांनीही आज बैठक बोलवली होती. तिथेही शिक्षक भारतीचे प्रतिनिधी पी पी पाटील यांनी निवेदन देऊन मतदानाच्या तारखेत बदल करण्याची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. त्यामुळे इलेक्शन ड्यूटी आणि मतदानाचा हक्क बजावून उशिरा गावी जाणाऱ्या शिक्षक मतदार, त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळा 15 जूनला सुरू होत असताना 10 जूनला शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मुंबईत येणे जिकरीचे झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक तारखेमध्ये बदल झाला तर कुटुंबासमवेत सुट्टीवर गेलेल्या शिक्षक मतदारांना मोठा दिलासा मिळेल तसेच सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, असे सुभाष किसन मोरे यांनी सांगितले आहे.

Thursday 7 March 2024

16000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्त्यांचा मार्ग मोकळा

शिक्षक भारती संघटनेच्या प्रयत्नांना यश

To read it clear click on image


6 फेब्रुवारी 2024 रोजी मा. हायकोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात दाखल झालेल्या सर्व रिट याचिका व सर्व अंतिम अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे 16000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मा. हायकोर्टामध्ये सुरू असणाऱ्या विविध न्यायालयीन केसेस मुळे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकलेली नाही.

मात्र आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा व भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार कपिल पाटील यांनी सातत्याने सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षक भारती संघटनेसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे महामंडळाचे शिवाजी खांडेकर यांची या लढ्यात मोठी साथ मिळाली.

राज्यातील हजारो शाळांमध्ये एकही शिक्षकेतर कर्मचारी नाही अशी आज अवस्था आहे. शासनामार्फत दररोज नवनवीन माहिती मागविली जाते ही माहिती भरणे, नियमित वेतन देयके तयार करणे, सेवानिवृत्तीचे प्रस्ताव तयार करणे, दैनंदिन कार्यालयीन कामकाज आणि अशा प्रकारची अनेक कामे शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने शिक्षकांना करावी लागत आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांनी स्वतः पगार देऊन या रिक्त पदावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा बोजा शैक्षणिक संस्थांवर वाढत आहे. शैक्षणिक संस्थातील रिक्त शिक्षकेतर पदावर गेली दहा ते बारा वर्ष कर्मचारी तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. त्यांना नियुक्ती दिनांकांपासून वैयक्तिक मान्यता देण्याची आवश्यकता आहे.

To read it clear click on image


शासन निर्णय दिनांक 28 जानेवारी 2019 नुसार सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. सुधारित आकृतीबंधानुसार शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी रिक्त पदावर विहित प्रक्रिया राबवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करावयाची आहे. सदर भरती प्रक्रिया करत असताना दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावयाचे आहे. कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शैक्षणिक संस्थांनी कार्यरत कर्मचाऱ्यांना आकृतीबंधानुसार मंजूर पदांवर पदोन्नती देऊन उर्वरित पदावर नवीन नियुक्तीची प्रक्रिया सुरू करायची आहे.

आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटना सदर प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. शैक्षणिक संस्थांना रिक्त पदावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती अथवा नवनियुक्ती करताना काही अडचणी निर्माण झाल्यास शिक्षक भारती कार्यालयाशी अथवा शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा.


आपला,
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती



Wednesday 21 February 2024

अल्पसंख्यांक शाळा - कॉलेजमधील नियुक्त्यांचा मार्ग मोकळा



शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अल्पसंख्यांक शाळांतील नियुक्तीयांवर मे 2020 पासून बंदी घातली होती. हजारो अल्पसंख्यांक शाळातील शेकडो पदे रिक्त असल्याने कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत होता.

आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अल्पसंख्यांक शाळातील नियुक्तयांचा मार्ग मोकळा झाला आहे. विहित प्रक्रिया राबवून नियुक्ती केल्यास मान्यता देण्यास परवानगी दिली आहे.

अल्पसंख्यांक शाळेतील भरती प्रक्रियेत बंदी असल्याने गेल्या अनेक वर्षापासून नवीन भरती करता येत नव्हती. शालेय शिक्षण विभागाने भरतीवरील बंदी उठवल्याने रिक्त पदांच्या 50 टक्के पदांना भरती करण्याची परवानगी मिळालेली आहे. अल्पसंख्यांक शाळेतील पदांना भरताना शालेय शिक्षण विभागाची ना हरकत घेण्याची आवश्यकता नाही. अल्पसंख्यांक शाळेतील रिक्त पदांची जाहिरात देऊन भरती करायची आहे. सदर भरती करत असताना भरती प्रक्रियेचा अवलंब करून त्यांना मान्यता मिळण्याबाबतचे प्रस्ताव शिक्षक निरीक्षक कार्यालयात सादर करायचे आहेत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील नियुक्त्यांचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करायचे आहेत.



शिक्षक भारती संघटनेतर्फे अल्पसंख्यांक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील नियुक्तांना पंधरा दिवसात मान्यता देण्याबाबतची मागणी केलेली आहे. अल्पसंख्यांक शाळात नियुक्त करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता गुणवंत व शैक्षणिक अहर्ता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती करावी. मान्यता मिळणे बाबत कोणतीही समस्या उद्भवल्यास शिक्षक भारती कार्यालयाशी संपर्क साधावा.

धन्यवाद


आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती