Sunday, 14 September 2025

टीईटी परीक्षा द्यावी का?


महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने दिनांक 11 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात दिलेल्या निर्णयानुसार होऊ घातलेल्या टीईटी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांमध्ये टीईटी परीक्षा द्यावी का? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील दोन वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे. तसेच ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीस पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे.

जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी शाळांतील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

टीईटी परीक्षा म्हणजे गुणवत्ता नव्हे
समाज माध्यमांमधून तसेच अनेक पत्रकार मित्रांमधून एक प्रश्न उपस्थित होत आहे की शिक्षक टीईटी परीक्षेला घाबरतात का? शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता नको का? याचे उत्तर आहे टीईटी उत्तीर्ण होणे म्हणजे गुणवत्ता नव्हे. महाराष्ट्रात होणारी टीईटी परीक्षा भ्रष्टाचाराने व गोंधळाने भरलेली आहे. टीईटी परीक्षेचा संदर्भातील अभ्यासक्रम व टीईटी परीक्षेचे स्वरूप निश्चित नसल्यामुळे मागील काही वर्षापासून टीईटी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या शिक्षकांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच टीईटी परीक्षेच्या संदर्भात पारदर्शकता नाही. नापास विद्यार्थ्यांना पास असल्याबाबत टीईटी प्रमाणपत्र वितरित झाल्याचा घोटाळा आपल्या सर्वांना माहित आहे. या टीईटी निकालाच्या घोटाळाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ज्या शिक्षकांजवळ असे खोटे टीईटी पास असल्याचे प्रमाणपत्र आहे ते आजही कार्यरत आहेत. तसेच या घोटाळ्यात सामील असणारे अनेक जण मोकाट फिरत आहेत. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे.

23 नोव्हेंबर ला होणारी टिईटी कोणी द्यावी ?

1) डीएड व बीएड उत्तीर्ण झालेल्या आणि टीईटीच्या अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या पात्रता धारक शिक्षकांनी पवित्र पोर्टल द्वारे अथवा जाहिरातीद्वारे अनुदानित, विनाअनुदानित अथवा सेल्फ फायनान्स शाळांमध्ये नोकरी हवी असल्यास 23 नोव्हेंबरला होणारी टिईटि देणे आवश्यक आहे.

2) ज्या कार्यरत शिक्षकांची नियुक्ती 2013 नंतर झाली आहे. त्यांनी टीईटी परीक्षा देणे आवश्यक आहे.

3) बीएड पात्रता धारक जे शिक्षक सहावी ते आठवीच्या गटात कार्यरत आहेत. ज्यांनी टीईटी परीक्षा देण्याची पूर्वतयारी पूर्ण केली आहे, त्यांनी टीईटी परीक्षा देणे आवश्यक आहे.

4) टिईटी परीक्षा अथवा सीटेट परीक्षा यापूर्वीच उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनी पुन्हा टीईटी देण्याची आवश्यकता नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे टीईटी परीक्षा द्यावी का?

टीईटी परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर 2025 रोजी निर्णय दिला असला तरी आजपर्यंत कार्यरत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याबाबत केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांनी अधिकृत पत्र जारी केलेले नाही.

महाराष्ट्रातील शिक्षण विभाग टीईटी परीक्षा संदर्भात अधिकृतपणे पत्र जारी करेपर्यंत 23 नोव्हेंबरला परीक्षेला बसावे किंवा नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असेल? कारण केवळ सर्वजण परीक्षेला बसतात म्हणून मी परीक्षेला बसतो असा विचार करून जर कोणी परीक्षा देणार असेल तर मागील काही वर्षातील टीईटीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी पाहिली तर तयारी शिवाय परीक्षा दिली तर अपयश येण्याची जास्त शक्यता आहे.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही परीक्षेसाठी तयार आहात आणि उत्तीर्ण व्हाल, तर हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही परीक्षेसाठी अर्ज भरला तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्वीकारला. असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच तुम्हाला पुढील 2 वर्षांत TET पास होणे बंधनकारक होईल.

मग काय करावे?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत कोणतेही पत्र जारी केलेले नाही. त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट होईपर्यंत धीर धरा.




शिक्षक भारती संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय श्री भूषण गवई यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. ज्या शिक्षकांची नियुक्ती आरटीई कायदा येण्यापूर्वी झालेली आहे त्यांनी तत्कालीन शैक्षणिक व व्यावसायिक निकष पूर्ण करून शिक्षक पदावर नियुक्ती घेतली आहे त्यामुळे त्यांना आता नव्याने टीईटी बंधनकारक करणे व्यावहारिक ठरणार नाही तसेच या शिक्षकांनी शिक्षण विभागामार्फत आयोजित केलेल्या विविध प्रशिक्षणात प्रशिक्षण घेतले आहे तसेच बारा वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी आणि 24 वर्षांची निवड श्रेणी याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. त्यामुळे नव्याने टीईटी देण्याची गरज नाही असे शिक्षक भारतीचे स्पष्ट मत आहे. शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय असल्यामुळे राज्य शासनाला वेगळा निर्णय करण्याचा अधिकार आहे. म्हणून

शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री यांना भेटून महाराष्ट्रातील शिक्षकांना दिलासा द्यावा अशी विनंती केली जाणार आहे. कोणीही घाबरून जाऊ नये. शिक्षक भारती संघटना सदैव आपल्या पाठीशी आहे.


आपला स्नेहांकित,
सुभाष सावित्री किसन मोरे

41 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. लढेंगे ! जितेंगे !

    ReplyDelete
  3. सुभाष मोरे आगे बढो,हम तुम्हारे साथ है!

    ReplyDelete
  4. बरोबर आहे सर तुमचे शिक्षक भारती जिंदाबाद लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
  5. लढेंगे जितेंगे.. जय शिक्षक भारती. 👍✌️

    ReplyDelete
  6. सर बरोबर आहे, जो पर्यंत महाराष्ट्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही तो पर्यंत आपण गप्पच बसायला हवे, आणि दुसरे असे की नियुक्ती करताना जे नियम अटी आणि कायदे होते त्यानुसारच कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

    ReplyDelete
  7. जर TET अनिवार्य होती तर आमची 2010 आली परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेली CET काय खेळ खेळ म्हणून घेतली... रिटायरमेंट पर्यंत नोकरी टिकवण्यासाठी परीक्षाच द्यायची का. लवकर यावर राज्य शासनाने निर्णय घ्यावा... या निर्णयामुळे न्याय व्यवस्थेवरचा विश्वास राहिला नाही...

    ReplyDelete
  8. भरती प्रक्रिया करतांना, पारदर्शकता हवी. ज्यांची 12 वर्षांची व 24 वर्षाची निवड श्रेणी प्रशिक्षण झालंय त्यांना तर गरज नसावी.परंतु सेवेत घेतानाच परीक्षा झाल्या मुळे पुन्हा एकदा परीक्षेचा गोंधळ नको.

    ReplyDelete
  9. माननीय सुभाष मोरे सरांनी मांडलेली भूमिकाशी मी पूर्णपणे सहमत आहे जोपर्यंत महाराष्ट्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही आणि जोपर्यंत शिक्षक भरतीचा पाठिंबा शिक्षकांसोबत असेल तोपर्यंत टेन्शन न घेणे बरे.

    ReplyDelete
  10. अतिशय योग्य विश्लेषण! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे, पण 2010 च्या CET उत्तीर्ण शिक्षकांवर TET सक्ती करणे न्यायोचित नाही. तत्कालीन नियमांनुसार ज्यांनी पात्रता पूर्ण केली आहे, त्यांच्यावर आता नवीन नियम लादणे हे कायदेशीरदृष्ट्याही योग्य नाही. राज्य सरकारने यावर तातडीने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, जेणेकरून शिक्षकांवरील अन्याय टाळता येईल.

    तुमचा लेख म्हणजे शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक दीप आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत तुम्ही दिलेला 'धीर धरा' हा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील राहावे, यात शंका नाही, पण TET सारख्या परीक्षांमधील पारदर्शकतेचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. आपण सर्वजण एकत्र आहोत आणि सकारात्मकतेने या परिस्थितीतून मार्ग काढू. जय शिक्षक भारती!
    लढेंगे
    जितेंगे
    आपलाच
    प्रा.महेश पाडेकर
    कार्याध्यक्ष
    शिक्षक भारती पुणे विभाग

    ReplyDelete
  11. शिक्षक भारती आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं
    जय शिक्षक भारती !

    ReplyDelete
  12. ज्यांची 12 वर्षांची व 24 वर्षाची निवड श्रेणी प्रशिक्षण झालंय त्यांना तर गरज नसावी.म्हणूनच 2013 पूर्वी रूजू झालेल्या शिक्षकांना ही परीक्षा बंधनकारक नसावी.

    ReplyDelete
  13. Thanks for perfect guidance 🙏

    ReplyDelete
  14. Thank you so much sir ji.. under your guidelines we will put a stup ahead….

    ReplyDelete
  15. सर, येणारा काळ शिक्षकांसाठी खूप धोक्याचा आहे. आणि बहुजन विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे छडयंत्र आहे.

    ReplyDelete
  16. 2008 मध्ये cet पास आहे त्यावेळी 45 टक्के पाहिजे अशी अट होती

    ReplyDelete
  17. अतिशय समर्पक विश्लेषण सर. खरंच शिक्षकांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी शासन दरबारी सदैव योग्य बाजू लावून धरणारी संघटना म्हणजेच शिक्षक भारती!!! मोरे सर आम्हाला आपला अभिमान आहे.

    ReplyDelete
  18. सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर मनात कोणतेही शंका नाही.

    ReplyDelete
  19. अगदी बरोबर सर आवाज उठवला पाहिजे.. लढेंगे और जितेंगे

    ReplyDelete
  20. महाराष्ट्रातील काही शिक्षक संघटनांनी अजून याविरुद्ध एक अक्षर सुद्धा काढले नाही ही खेदाची गोष्ट आहे. शिक्षक भारती ही नेहमीच सर्व बाबतीत अग्रेसर असते त्याबाबतीत धन्यवाद.

    ReplyDelete
  21. अगदी बरोबर सर आवाज उठवला पाहिजे.it is not fair for those who has passed entrance exam for D. Ed., or B. Ed.

    ReplyDelete
  22. अगदी बरोबर. सुभाष मोरे सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

    ReplyDelete
  23. शिक्षक भारतीने नेहमीच शिक्षकांची बाजू उचलून धरली आहे. कळीच्या प्रश्नावर आवाज उठवून शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे आणि शिक्षणव्यवस्थेला व्यवहार्य मार्ग दाखवलेला आहे. शिक्षकांच्या टीईटी संदर्भात माननीय किसन मोरे सरांनी दिलेल्या धीराच्या शब्दांबद्दल धन्यवाद .

    ReplyDelete
  24. Right !👍 *Jai Shikshak Bharati *

    ReplyDelete
  25. मी या मताशी सहमत आहे की जे २०१२ पूर्वी लागले आहेत, त्यांना TET नको आहे. तसेही असे खूप कमी शिक्षक आहेत ज्यांची सेवा १० वर्षा पेक्षा कमी असेल. परंतु योग्यता नसताना पैसे भरुन, चुकी च्या पद्धतीने मान्यता आणून ज्यांनी 2012 नंतर सार्वजनिक शिक्षक भरती नसताना आपल्या सोयीसाठी जागा काढून पैसे भरुन नौकरी मिळवली व शासनाची दिशाभूल केली त्यांची योग्यता तपासण्यासाठी ही परीक्षा महत्वाची ठरते. अशांची पडताळणी व्हावीत. व योग्यता नसेल तर निवृत्तीही द्यावी. या काळामध्ये योग्यता असलेली मुले आज Agebar होत चालली आहेत. मग अशा टुकार-चुकारांना वचक बसायला नको का? नक्कीच बोला पाहिजे. सर माझे 2010 ला बी एड झाले जवळपास 14 वर्षे मला तात्पुरत्या मानधनावर काम करावं लागलं. पैसे द्यायची इच्छा नव्हती कारण हे पवित्र क्षेत्र आहे, यातील अपवित्र लाच देवून भरती झालेली बाहेर निघायलाच हवी.

    ReplyDelete
  26. नमस्कार सर. जे जे शिक्षक सरकारी खात्यात किंवा संस्थेत नोकरीला आहेत ते कोणती ना कोणती तरी स्पर्धा परीक्षा देऊनच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे .उदाहरणार्थ 1998 पर्यंत जे शिक्षक निवडले गेले त्यांना निवड मंडळाच्या स्पर्धा परीक्षेतून निवडले आहे. त्यानंतर सीईटी आली ,नंतर परीक्षेतील त्यांचे गुण बघून त्यांना घेण्यात आलं ,नंतर टीईटी . इ....म्हणजे जे शिक्षक सरकारी खात्यात किंवा संस्थेत आहेत त्यांची कोणती न कोणती तरी स्पर्धा परीक्षा घेऊन मगच त्यांचं सिलेक्शन केलेले असताना पुन्हा त्यांना स्पर्धा परीक्षा देणे हे उचित वाटत नाही आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन स्वतःला अपडेट करतच आहोत ना ...मग वेगळी परीक्षा द्यायची काय गरज आहे? सरकारने अजून जीआर काढला नाही .त्यांच्यापर्यंत सर्वांच्या ह्या कमेंट्स पोहोचणे गरजेचे आहे..
    माननीय मोरे सरांना खूप खूप शुभेच्छा .आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.. आपले मत मांडण्याची संधी मिळाली खूप खूप धन्यवाद..

    ReplyDelete
  27. अतिशय सुंदर विश्लेषण सर, आपली संघटना नेहमीच शिक्षक व शिक्षकेतर यांच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवते. जय शिक्षक भारती 👍💪

    ReplyDelete
  28. अगदी बरोबर सर शिक्षक भारती नेहमीच असे प्रश्न सोडवते त्यांच्या विरोधात आवाज उठवत आली आहे.आणि प्रश्न सोडवले आहेत .

    ReplyDelete
  29. सर, खूप छान पद्धतीने विषय विवेचन केले आहे.शिक्षक भारती शिक्षकांना योग्य न्याय मिळवून देईल यावेळी सुद्धा.हा विश्वास मिळाला यातून.धन्यवाद.

    ReplyDelete
  30. सर ,अगदी समर्पक शब्दात अतिशय स्पष्ट सुंदर असे मार्गदर्शन आपण केले आहे , आम्हा शिक्षकांचा संभ्रम दूर केल्याबद़दल खूप खूप धन्यवाद सर , जय शिक्षक भारती!

    ReplyDelete
  31. अतिशय छान विश्लेषण केले सर. धन्यवाद.

    ReplyDelete
  32. आंदोलन झालेच पाहिजे त्याशिवाय यांना अन्यायाची तीव्रता समजणार नाही

    ReplyDelete
  33. सरांनी योग्य मत मांडले आहे .धन्यवाद सर.

    ReplyDelete