Sunday, 30 August 2020
समान काम समान वेतन
Monday, 24 August 2020
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मिळणार कधी?
Friday, 14 August 2020
विशेष शाळांना न्याय मिळेल का?
सामाजिक न्याय विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे विशेष शाळातील कर्मचारी पाच महिने पगाराशिवाय जगत आहेत. मुंबईसारख्या शहरात पगाराशिवाय विशेष शाळा/ कर्मशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. गृहकर्जाचे हफ्ते थकल्यामुळे बँकांना व्याजावर व्याज द्यावे लागत आहे. विजबिल, घरभाडे, किराणा सामान इत्यादी दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर कोरोना काळात उपासमारीची वेळ आली आहे. पगार हा प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान असतो. पगार वेळेवर मिळणे हा त्याचा अधिकार आहे. परंतु सामाजिक न्याय मंत्रालय ज्याच्या नावात न्याय आहे तो न्याय कर्मचाऱ्यांना कधीच मिळत नाही. दिसतही नाही. वर्षानुवर्षे पगार उशिरा होत आहेत. कधी अधिकारी सही करत नाही म्हणून तर कधी पैसे नसतात म्हणून. पण याची शिक्षा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळते. कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये काम करायचं की रोज उठून पगारासाठी एखाद्या याचका प्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या दारात हेलपाटे मारायचे. एवढी अहवेलना का?
कोरोना काळात कोरोनाबरोबर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने कहर केला आहे. पाच महिने पगारच नाही. आठ दिवसात पगार होईल असे उत्तर गेली पाच महिने ते देत आहेत. पण आजही पगार आलेला नाही. राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन एक वर्ष उलटून गेले तरी विशेष शाळा/ कर्मशाळा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. याला जबाबदार कोण?
पगार/ वेतन आयोग रखडण्याचे कारण काय?
सामाजिक न्याय विभागाने अखर्चिक राहिलेले 480 कोटी रूपये मार्च महिन्या अखेर वित्त विभागाला परत पाठविले नाहीत. समाज कल्याण आयुक्त तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी शासनाला अखर्चिक रककम परत करणे बंधनकारक आहे. पण रक्कम परत न गेल्याने पगाराला उशिरा झाला आहे. पण त्यालाही दोन महिने उलटून गेले आहेत सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी वित्त विभागाकडे बोट दाखवतात तर वित्त विभागाचे अधिकारी सामाजिक न्याय विभागाकडे बोट दाखवतात. प्रश्न मात्र सुटत नाही. आमदार कपिल पाटील यांनी स्वतः सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यांनीही आठ दिवसात पगार मिळणार असे आश्वासन दिले. त्यालाही पंधरा दिवस उलटून गेले आहेत. कोरोनामुळे आपण बाहेर पडू शकत नाही. रस्त्यावर उतरून आपल्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू शकत नाही. म्हणून अखेर आपण "ई-मेल भेजो आंदोलन" सुरू केले आहे.
सातवा वेतन आयोग मिळण्यास उशीर होत आहे याचे कारणही सामाजिक न्याय विभागातील अधिकारीच आहेत. सातव्या वेतन आयोगाची फाईल वित्त विभागाकडे पाठवताना योग्य कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे त्या फाईल मध्ये अनेक त्रुटी निघाल्या. या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक होते. शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांनी स्वतः सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर एक बाब लक्षात आली की विशेष शाळा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी बाबत आवश्यक ती कागदपत्रे सामाजिक न्याय विभागाकडे नाहीत. शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे, वेतनाबाबतच्या नोंदी, अधिसूचना इ. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जमा केलेल्या आहेत. तरीसुद्धा आजही आपली सातव्या वेतन आयोगाची फाईल सरकलेली नाही. कोरोनाचं कारण पुढे करून दप्तर दिरंगाई सुरू आहे. म्हणूनच आपल्याला या इमेल भेजो आंदोलनातून शासनाला जागे करायचे आहे. राज्यभरातून हजारो मेल पाठवायचे आहे
दिव्यांगांच्या शाळेतील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न
1. संस्थाचालक, मुख्याध्यापकांना लायसन्स नूतनीकरणासाठी, वाढीव विद्यार्थी मान्यतेसाठी हेलपाटे मारावे लागतात.
2. सामाजिक न्याय विभाग कार्यालयाने नुकत्यात 176 शाळांच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाला नामंजूर केलेले आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापकांना वेठीस धरून विशेष शाळा/ कर्मशाळा बंद करण्याचे धोरण राबविले जात आहे.
3. सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांची कामाबद्दल असलेली अनास्था यामुळे शिक्षक-शिक्षकेतर यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
4. नियमित वेतन वाढ, पदोन्नती, नियुक्ती इत्यादी कामांसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पहावी लागते.
5. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शनसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात,
6. ऑनलाईन सेवार्थ प्रणाली द्वारे वेतनासाठी शालार्थ आयडी वेळेत न मिळाल्यामुळे वैयक्तिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मिळूनही वेतन मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.
7. कायम विनाअनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना अनुदानासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
8. अपंग शाळा/ कर्मशाळा कर्मचारी शाळा संहिता च्या अंमलबजावणीबाबत अनेक ठिकाणी विसंगती दिसून येते. शिक्षक, शिक्षकेतरांचे कामाचे तास सर्व संस्थांमध्ये सारखे असणे आवश्यक आहे.
9. अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाईन समायोजना मध्ये मोठा घोटाळा दिसून येतो.
10. दिव्यांग मुलांना सकस पोषण आहार, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, सामायिक अभ्यासक्रम इत्यादीबाबत सामाजिक न्याय विभाग उदासीन असल्याचे चित्र दिसते.
12 ऑगस्ट 2020 पासून विशेष शाळा/कर्मशाळा कर्मचाऱ्यांनी "ई-मेल भेजो आंदोलन" सुरू केले आहे. आमदार कपिल पाटील यांनी सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांना भेटून रखडलेला पगार व सातवा वेतन आयोग तातडीने सुरू करण्याची विनंती केली आहे. माननीय धनंजय मुंडे साहेबांनी पगार वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत. पगार वितरीत करणेबाबत झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा आपले पदाधिकारी मंत्रालयात जाऊन घेतील. आपला रखडलेला पगार होण्यासाठी मंत्रालय स्तरावर तातडीने निर्णय न झाल्यास आपण सर्वांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवूया. सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेऊया. पगार झाल्याशिवाय आता आपण शांत बसायचे नाही.
लढेंगे! जितेंगे!!
आपला स्नेहांकित
सुभाष किसन मोरे,
कार्याध्यक्ष
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य
Friday, 7 August 2020
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन!
विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष आणि शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य,
पेन्शन नाकारणारी 10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली आधिसुचना मागे घेण्याचे आश्वासन माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले आहे. शिक्षण मंत्र्यांचे शिक्षक भारतीच्या वतीने जाहीर आभार!
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 10 जुलै 2020 रोजी पेन्शन हिरावून घेणारी अधिसूचना जारी केली होती. महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील मसुद्यात बदल सुचवणारी आधिसुचना राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पेन्शन वर घाला घालणारी होती.
शिक्षक भारती या आपल्या शासन मान्यताप्राप्त संघटनेने या अन्यायाच्या विरोधात राज्यभर जागृती निर्माण केली. पहिल्या टप्प्यात आपण सर्वांनी मिळून पोस्टर आंदोलन केले. त्याचा परिणाम म्हणून दुसर्या टप्प्यात राज्यभरातून शिक्षक भारतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो लेखी आक्षेप नोंदवण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात आपण स्थानिक मंत्री व आमदार यांना अधिसूचना रद्द करण्याबाबतचे निवेदन दिले. आपण घेतलेल्या मेहनतीमुळे राज्यभरातून अनेक मंत्री व आमदारांनी माननीय शिक्षण मंत्र्यांना फोनद्वारे व पत्राद्वारे अधिसूचना रद्द करण्याचे करण्याची विनंती केली.
आपल्या आंदोलनाला प्रतिसाद देत दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी माननीय शिक्षण मंत्र्यांनी आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती संघटनेला चर्चेसाठी बोलाविले. शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके आणि शिक्षक भारती मुंबईचे कैलास गुजांळ उपस्थित होते. आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती ने मांडलेले सर्व मुद्दे मान्य करून अधिसूचना मागे घेण्याचे आश्वासन मा. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
(बातमी मोठी करून वाचण्यासाठी click करा)
10 जुलै 2020 रोजीच्या अन्यायकारक अधिसूचनेच्या विरोधात आपले आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बेलसरे सर यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी कोरोना महामारीच्या काळातही खूप मेहनत घेतली. निवेदने दिलीत. राज्यभर जागृती निर्माण केली. आंदोलने केली. आणि म्हणून आज आपल्याला यश मिळाले आहे. शिक्षक भारतीचे सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते या सर्वांच्या एकजुटीने हे यश मिळालेले आहे.
त्याचबरोबर राज्यभरातील संस्थाचालक, मुख्याध्यापक व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनीही शिक्षक भारतीच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत लेखी आक्षेप नोंदवावा मोहिमेत सहभाग घेतला. त्यांचेही आभार!
शैक्षणिक प्रश्नावर राज्यभरातून आपण सर्वजण शिक्षक भारतीच्या माध्यमातून एकत्रितपणे जो संघर्ष केला आहे त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. आपल्या सर्वांच्या कार्याला सलाम !
माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, आपले आमदार कपिल पाटील तसेच राज्यभरातून आपल्या निवेदनाला प्रतिसाद देऊन फोन करणारे व निवेदन देणारे माननीय मंत्री, माननीय स्थानिक आमदार यांचे शिक्षक भारतीच्या वतीने आभार!
शिक्षक भारतीच्या एकजुटीचा विजय असो !!!
आपला स्नेहांकित,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य
Saturday, 1 August 2020
आपली पेन्शन वाचवण्यासाठी
प्रति,
(मा. मंत्री अथवा स्थानिक आमदार)
विषय : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली 10 जुलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करणेबाबत.
महोदय/ महोदया,
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 10 जुलै 2020 रोजी अधिसूचना जारी केलेली आहे. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी ही अधिसूचना अन्यायकारक आहे. या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त लाखो मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार हिरावला जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला 2020 साली नियमावलीत बदल करून पंधरा वर्षे मागे जाऊन पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शनच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत.
कृपया शिक्षक भारतीच्या मागणीची आपण दखल घ्यावी व माननीय शिक्षणमंत्री यांना 10 जूलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करण्यासाठी पत्र लिहावे , ही विनंती.
आपले विनित
(जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व स्थानिक पदाधिकारी यांची नावे)
-------------------------------------------
शिक्षक भारती पदाधिकारी यांच्यासाठी सूचना -
शिक्षक भारतीने 10 जुलै 2020 रोजीच्या अन्यायकारक अधिसूचनेच्या विरोधात राज्यभर आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातून अधिसूचनेवर लेखी आक्षेप घेणारी पत्र पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवण्याची मोहीम आपण सर्वांनी सुरू केलेली आहे. 10 ऑगस्टपूर्वी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाखो लेखी आक्षेप मंत्रालयापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मा. आमदार कपिल पाटील साहेब व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या पुढील टप्प्यात पुढीलप्रमाणे नियोजन ठरवण्यात आलेले आहे.
1) राज्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्याची मोहीम ठरवण्यात आली आहे. रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी नियोजन करून आपापल्या मतदारसंघातील मंत्री अथवा स्थानिक आमदारांना वरील निवेदन द्यावयाचे आहे.
2) निवेदन देताना फोटो काढायचा आहे व ते फोटो Whatsapp आणि Facebook ला शेअर करायचे आहेत.
3) निवेदन दिल्यानंतर मंत्री अथवा स्थानिक आमदार यांना मा. शिक्षणमंत्री वर्षातही गायकवाड यांना प्रत्यक्ष फोन करायची विनंती करावयाची आहे.
4) आमदार कपिल पाटील आणि राज्य पदाधिकारी लवकरच मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मा. शरद पवार साहेब, मा. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि मा. संजयजी राऊत यांची भेट घेणार आहेत. अन्यायकारक अधिसूचनेबाबत माहिती देऊन ती रद्द करणेबाबत कार्यवाही करण्याची विनंती करणार आहेत.
5) राज्याध्यक्ष श्री अशोक बेलसरे राज्यातील सर्व शिक्षक आमदार व सर्व पदवीधर आमदार यांना फोन करून 10 जुलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करण्याबाबत एकत्र येवून पाठपुरावा करण्याचे आवाहन करतील.
वेळ फार कमी आहे. गाफिल राहून चालणार नाही. आपल्या सर्वांना अधिसूचना रद्द करण्यासाठी वरील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. आम्हाला खात्री आहे आपण ते कराल.
लड़ेंगे ! जीतेंगे !!
आपले स्नेहांकित,
अशोक बेलसरे, अध्यक्ष
सुभाष मोरे, कार्याध्यक्ष
संजय वेतुरेकर, जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह
प्रकाश शेळके, कार्यवाह
संगिता पाटील, महिला अध्यक्ष
आर. बी. पाटील, ज्युनिअर कॉलेज अध्यक्ष
धनाजी पाटील उपाध्यक्ष
कल्पना शेंडे, मुंबई अध्यक्षा